
पदवीधरांचे व शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबीत आहेत. हे प्रश्न सोडविण्यासाठी सत्ताधारी पक्षाचे आमदार असण्याची गरज आहे.
इचलकरंजी (कोल्हापूर) : चंद्रकांतदादा पाटील हे गेली 12 वर्षे पदवीधर मतदार संघाचे नेतृत्व करीत आहेत. गेली पाच वर्षे सत्तेत होते. त्यांनी पदवीधरांचे प्रश्न का सोडविले नाहीत. उलट त्यांच्या कालावधीत बेरोजगारीमध्ये वाढ झाली. त्यामुळे त्यांना पदवीधरांच्या प्रश्नावर बोलण्याचा अधिकारच नाही, अशी टिका पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली.
येथील तोष्णीवाल गार्डनमध्ये पूणे पदवीधर व शिक्षण मतदार संघातील महाविकास आघाडीचे अनुक्रमे उमेदवार अरुण लाड व प्रा.आसगांवकर यांच्या प्रचारार्थ संस्थाचालक व शिक्षकांचा मेळावा पार पडला. यावेळी मंत्री पाटील बोलत होते. या दोन्ही उमेदवारांना पसंती क्रमांक 1 चे मतदान देवून निवडून आणण्याचा यावेळी निर्धार करण्यात आला.
मंत्री पाटील म्हणाले, पदवीधरांचे व शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबीत आहेत. हे प्रश्न सोडविण्यासाठी सत्ताधारी पक्षाचे आमदार असण्याची गरज आहे. शिक्षक मतदार संघातून कोल्हापूर जिल्ह्याला आमदार होण्याचा पहिल्यांचा मान मिळणार असल्यांने प्रा.जयंत आसगांवकर यांना निवडून देवूया, असे आवाहनही त्यांनी केले.
हेही वाचा- राज्यभरातील विणकरांनी विणलेल्या पंधरा लाखांहून अधिक साड्या पडूनच -
खासदार धैर्यशील माने म्हणाले, कोरोनाच्या संकट काळात शिक्षकांनी रस्त्यावर उतरुन चांगले काम केले आहे. पण त्यांची पिळवणूक थांबविण्यासाठी शिक्षण अधिकाऱ्यांचे अधिकार कमी करण्याची गरज आहे. शिवसेनेचा भक्कम पाठिंबा असल्यांने महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांच्या विजयाचा शिल्पकार हा कोल्हापूर जिल्हा असणार आहे.
उमेदवार प्रा.आसगांवकर यांचेही भाषण झाले. शिक्षकांच्या प्रलंबीत प्रश्नांना न्याय देण्याचा आपला प्रयत्न राहणार असून विरोधकांच्या बुध्दीभेद आणि भूलथापांना बळी पडू नका, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी आमदार राजू आवळे, मदन कारंडे, महादेव गौड, बाबा पाटील, वि.ह. सपाटे, दादासाहेब लाड, शशांक बावचकर यांची भाषणे झाली. स्वागत पी.डी. शिंदे यांनी तर प्रास्ताविक अशोक हुबळे यांनी केले. व्यासपिठावर रविंद्र माने, राहूल खंजीरे, संजय कांबळे, नितीन जांभळे, मुरलीधर जाधव, शेखर शहा आदी उपस्थीत होते.
संपादन - अर्चना बनगे