इचलकरंजीत कर्नाटकातून गुटखा तस्करी

पंडित कोंडेकर
Wednesday, 20 May 2020

इचलकरंजी शहरात सध्या कर्नाटकातून होणारी गुटखा तस्करी चर्चेत आली आहे. यातून अनेकजण गब्बर होत असून, अवैध धंद्याने वस्त्रनगरीत जम बसविण्यास सुरुवात केली आहे

इचलकरंजी : शहरात सध्या कर्नाटकातून होणारी गुटखा तस्करी चर्चेत आली आहे. यातून अनेकजण गब्बर होत असून, अवैध धंद्याने वस्त्रनगरीत जम बसविण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये मोठी साखळी कार्यरत असल्याचे सांगण्यात येत असून, यातून होणारी उलाढाल डोळे दीपवणारी आहे. यातून शहरात नवीन गुन्हेगारी प्रवृती वाढीस लागत आहे. 

लॉकडाउनमध्ये पानपट्टी व्यवसाय बंद ठेवला होता. त्यामुळे गुटखा मिळणे दुरापास्त झाले. त्यासाठी दुप्पट, तिप्पट रक्कम मोजण्यास सुरवात केली. यातून कर्नाटकातून गुटखा तस्करीला बळ मिळाले. तपासणी नाका सुरू झाल्यानंतर भाजीपाला वाहतूक करणाऱ्या वाहनांतून गुटख्याची तस्करी केली. यातून अनेक वेळा कारवाई केली. नंतर तरुणांची साखळीच तस्करीसाठी कार्यरत झाली. अगदी कमी खोली असलेल्या ठिकाणातून नदीतून पोहत जाऊन गुटखा शहरात पोहचवण्यात आला. 

काही दिवसांपासून गुटखा तस्करी करणारी नव्या गुन्हेगारी प्रवृत्तीने शहरात जम बसवला आहे. यातून होणारी उलाढाल मोठी आहे. कर्नाटकातून आलेला गुटखा शहरातील विविध भागांत पोहोच करणारी छुपी यंत्रणा कार्यरत आहे. प्रत्येक दुकानात हा गुटखा पोहच केला जात होता. गिऱ्हाईकही ठरलेले आहे. त्यामुळे शहरात या अवैध व्यवसायाचा पक्का विळखा बसला आहे. पोलिसांनी अनेकवेळा कारवाई केली, पण गुटखा तस्करी राजरोस सुरूच आहे. 

या गुटखा तस्करीतील पाळेमुळे शोधण्याची गरज आहे. मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचण्याची आवश्‍यकता आहे. मुळात शहरात विविध प्रकारच्या अवैध व्यवसायांचा फैलाव झाला आहे. आता गुटखा तस्करीचाही गंभीर प्रकार पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर उघडकीस येत आहे. कर्नाटकातून दररोज लाखो रुपयांचा गुटखा शहरात येत असल्याची चर्चा आता होत आहे. त्याला पायबंद घालण्याचे आव्हान पोलिस यंत्रणेसह अन्न आणि औषध प्रशासनासमोर आहे. 

चकवा देऊन गुटखा तस्करी 
शहरात सध्या कर्नाटकातून यंत्रणेला चकवा देऊन गुटख्याची तस्करी केली जात आहे. रात्री पोत्यातून गुटखा घेऊन येत असताना तपासणी नाक्‍यावरील कर्मचाऱ्यांनी पाठलाग केला. त्यावेळी चरीमध्ये गुटख्याचे पोते टाकून तस्कराने पलायने केले. अगदी वैरणीच्या भाऱ्यातूनही गुटख्याची तस्करी केल्याचे प्रकार यापूर्वी उघडकीस आले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gutkha Smuggling From Karnataka In Ichalkaranji Kolhapur Marathi News