कोल्हापुरात इतिहासातील घटनांचा स्पर्श झालेले हळदी गाव

haldi village touched by historical events story by sainath patil
haldi village touched by historical events story by sainath patil

 कोल्हापूर : महाराष्ट्राच्या ऐतिहासिक संस्कृतीचा विचार करता कोल्हापूर जिल्ह्याच्या इतिहासाचा ठसा प्रकर्षाने जाणवतो. प्राचीन काळापासून इतिहासाचा वसा आणि पाऊलखुणा जपत आजही कोल्हापूर जिल्हा स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत आहे. 
कोल्हापूर च्या इतिहासातील पाऊलखुणांचा मागोवा घेत असताना शहरा बरोबरच जिल्ह्यातील ग्रामीण भागातही इतिहासातील घटनांचा स्पर्श झालेला आपल्याला दिसून येतो. यापैकी एक ठिकाण म्हणजे करवीर तालुक्यातील हळदी गाव.


गाव आजही पंचक्रोशीतील एक मध्यवर्ती ठिकाण आणि बाजारपेठ म्हणून ओळख टिकवून असलं तरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासापासून मागोवा घेतला तर हळदी गावचं वेगळेपण प्रकर्षाने जाणवते. छत्रपती शिवाजी, छत्रपती शाहूंच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमी मध्ये हळदी गावचा उल्लेख करावा लागेल. 


घटना आहे २८ नोव्हेंबर १६५९ ची. प्रतापगडाच्या पायथ्याला १० नोव्हेंबर १६५९ ला शिवाजीराजांनी अफजलखानाचा वध केल्यानंतर महाराजांनी विजापूरच्या आदिलशाहीकडे कूच केली. महाराजांनी आपल्या सैन्याच्या तीन तुकड्या केल्या. एक तुकडी नेताजी पालकर यांच्या नेतृत्वाखाली विजापूरकडे पाठवली त्यांनी चिकोटा, अथनी सर करुन पुढे दौड केली. दुसरी तुकडी दोरोजी नावाच्या सरदाराच्या नेतृत्वाखाली कोकणात पाठवली. ज्यांनी राजापूरपर्यंत मजल मारली आणि तिसऱ्या तुकडीचं नेतृत्व स्वतः शिवाजी महाराजांनी केले. महाराजांनी सातारा, खटाव, कराड, मायणी, शिराळा घेत आदिलशाहीचं महत्वाचं ठाणे असलेल्या कोल्हापूरकडे कूच केले आणि नेर्ले ठाणे जिंकत २७ नोव्हेंबर १६५९ ला महाराजांनी कोल्हापूर जिंकले. लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे २८ नोव्हेंबर ला पन्हाळा जिंकला. जेव्हा महाराजांनी कोल्हापूर जिंकले तेव्हा कोल्हापूरच्या आसपास असणारी अनेक गावे महाराजांनी आपल्या नेतृत्वाखाली ताब्यात घेतली. ज्यामध्ये हळदी हे एक गाव होते.


महाराजांच्या या पराक्रमाचा उल्लेख शिवकालीन इतिहासाचे अस्सल आणि तत्कालीन साधन असलेल्या कवी परमानंद यांच्या "शिवभारत"  या संस्कृत ग्रंथात आहे. सदर ग्रंथ संस्कृत मध्ये असल्यामुळे हळदी नावाच्या संस्कृतीकरणामुळे ते "हलजयंती" झाले आणि याच "हलजयंती" ला महाराजांनी ताब्यात घेतलेला स्पष्ट उल्लेख आजही शिवभारत मध्ये आढळतो. या महत्वपूर्ण ऐतिहासिक साधनात उल्लेख झाल्याने हळदी गावचे ऐतिहासिक महत्व स्पष्ट होते. यानंतर खूप दिवस महाराजांच्या हालचाली याच परिसरात होत्या, कारण विजापूरहून पन्हाळा गडावर जाण्याच्या दोन मार्गापैकी एक मार्ग मिरजकडून होता तर दुसरा मार्ग निपाणी मुरगूड मार्गे हळदीतून कसबा बीड, यवलूज मार्गे पन्हाळा गड असा होता. यावरून शिवकाळात हळदी एक नावाजलेले ठाणे होते हे पण स्पष्ट होते.

यानंतर हळदी गावाचा एका छत्रपतींपासून आपण बघत असलेला उल्लेख कोल्हापूर गादीच्या छत्रपती शाहूंच्या इतिहासात पुन्हा येतो. शाहूंनी १९०८ मध्ये राधानगरी धरणाच्या बांधकामाचं काम सुरु केले. तत्पूर्वी, दाजीपूर अभयारण्य भेटीला जाताना आणि नंतर धरणाच्या कामावरील देखरेखीसाठी महाराज नेहमी कोल्हापूरहून हळदी मार्गे जात होते. त्याकाळी असणाऱ्या दळणवळणाच्या साधनांचा विचार करता कोल्हापूर - राधानगरी अंतर तसे जास्त वाटे. त्याचा विचार होऊनच साधारणतः १००-१२५ वर्षांपूर्वी हळदी गावामध्ये शाहूंनी विश्रांतीसाठी एक धर्मशाळा बांधली. त्याच्याच मागे घोड्यांचा तबेला होता. याच इमारतीत पंचक्रोशीतील तलाठी, पाटील, शेतकरी आणि इतर लोक कामानिमित्त किंवा निवाड्यानिमित्त जमत असत. नदीच्या काठावर असणाऱ्या मोठ्या वडाच्या झाडांखाली सोबतचे लोक आणि जनावरे काही काळ विश्रांती घेत आणि पुन्हा पुढच्या प्रवासाला लागत.


जुन्या काळात कोकणातून फोंडा घाटमार्गे आलेल्या मीठ, मासे, बांबू यांच्या "गाड्यांचा तळ" असा जुन्या कागदांमध्ये हळदीचा उल्लेख सापडतो.स्वातंत्र्यानंतर काही वर्षांनी १८ फेब्रुवारी १९५६ ला हळदी मध्ये ग्रामपंचायतची स्थापना झाली आणि शाहूकालीन इमारतीत ग्रामपंचायत सुरु झाली. सदर सागवानी लाकडातील जुन्या इमारतीच्या जागीच आज हळदी गावचं ग्रामसचिवालय उभे राहिलेले आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये आज छत्रपती शाहूंच्या इतिहासातील पाऊलखुणा देखील गावच्या ऐतिहासिक संस्कृतीमध्ये भर घालत आहेत.

संपादन - अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com