सर्वसामान्यांना दुःख देण्यात  भाजप सरकारला सुख : पालकमंत्री सतेज पाटील 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

कोरोनाच्या संकटातून कसे सावरायचे याचे उत्तर लोकांना सापडत नाही, उद्योग-व्यवसाय पूर्वपदावर आलेले नाहीत, यातच आता प्रत्येक दिवशी पेट्रोल-डिझेलची दरवाढ केली जात आहे. भाजप सरकारला सर्वसामान्य लोकांना त्रास देणे, यातच सुख वाटत असल्याची टीका पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज केली.

कोल्हापूर : कोरोनाच्या संकटातून कसे सावरायचे याचे उत्तर लोकांना सापडत नाही, उद्योग-व्यवसाय पूर्वपदावर आलेले नाहीत, यातच आता प्रत्येक दिवशी पेट्रोल-डिझेलची दरवाढ केली जात आहे. भाजप सरकारला सर्वसामान्य लोकांना त्रास देणे, यातच सुख वाटत असल्याची टीका पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज केली. जिल्हा आणि शहर कॉंग्रेस कमिटीतर्फे इंधन दरवाढीविरोधात निदर्शने केली, त्यावेळी ते बोलत होते. त्यानंतर याचे निवेदन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना दिले. मंत्री पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शने केली. 
मंत्री पाटील म्हणाले, "स्पीकअप इंडियाद्वारे पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या विरोधात कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी देशव्यापी धरणे आंदोलन करण्याची सूचना पदाधिकाऱ्यांना दिली आहे. कोरोनामुळे देश आर्थिक संकटात आहे. मध्यमवर्गीयांचे कंबरडे मोडण्याचे काम केंद्र सरकार करत आहे. मात्र, सर्वसामान्य लोकांच्या दुःखात सुख मानणारे सरकार केंद्रात आहे. कोरोनामुळे लाखो लोकांचे रोजगार गेले. इंधन दरवाढीने दुहेरी संकटाचा सामना सर्वसामान्यांना करावा लागत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात महिन्याभरात 78.33 ते 87.35 रुपयांपर्यंत वाढ झाली. लोकांना खाण्याचे वांदे झाले असताना इंधन दरवाढ झाल्यास महागाई वाढणार आहे.'' 
दरम्यान, कोल्हापूर शहर आणि जिल्हा कॉंग्रेस कमिटीतर्फे धरणे आंदोलन करुन इंधन दरवाढीचा निषेध केला. त्यानंतर आमदार राजू आवळे, आमदार चंद्रकांत जाधव, महापौर निलोफर आजरेकर यांनीही जिल्हाधिकारी देसाई यांना निवेदन दिले. यावेळी प्रल्हाद चव्हाण, नगरसेवक शारंगधर देशमुख, गुलाबराव घोरपडे, संध्या घाटणे, सुरेश कुऱ्हाडे, संजय पोवार आदी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Happiness to BJP government in giving grief to common people: Guardian Minister Satej Patil