'शिक्षक, पदवीधरच्या निकालाने चंद्रकांतदादांना सणसणीत चपराक'

सदानंद पाटील
Friday, 4 December 2020

महाविकास आघाडीला पराभूत करण्यासाठी जनता आतूर झाले असल्याचे वक्‍तव्यही त्यांनी केले होते. मात्र आजच्या निकालाने त्यांना सणसणीत चपराक बसली असल्याचे ना. मुश्रीफ यांनी सांगितले. 

कोल्हापूर : गेली 55 वर्षे पुणे पदवीधर मतदार संघ भाजपकडे आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांनी 12 वर्षे या मतदार संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. मात्र गेली काही महिने सुशांतसिंह राजपूत, कंगना राणावत, अर्णब गोस्वीम प्रकरणात भाजपने महाविकास आघाडी, ठाकरे सरकार व महाराष्ट्राला खूप बदनाम केले. ही बदनामी पदवीधरांना मान्य नसल्यानेच त्यांनी पदवीधर व शिक्षक निवडणुकीत भाजपला सणसणीत चपराक दिली आहे, अशा शब्दांत राज्याचे ग्रामिवकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्‍त केली.

पदवीधर व शिक्षक मतदार संघात महाविकास आघाडीला मिळालेला विजय पाहता इतर निवडणुकांचा भाजपने केवळ विचारच केलेला बरा, असा टोलाही ना. मुश्रीफ यांनी लगावला. पुणे पदवीधर व शिक्षक व मतदार संघातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या विजयानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ना. मुश्रीफ बोलत होते. ते म्हणाले, गेली वर्षभर चंद्रकांत पाटील हे महाविकास आघाडीच्या कारभारावर टीका करत आहेत. महाविकास आघाडीला पराभूत करण्यासाठी जनता आतूर झाले असल्याचे वक्‍तव्यही त्यांनी केले होते. मात्र आजच्या निकालाने त्यांना सणसणीत चपराक बसली असल्याचे ना. मुश्रीफ यांनी सांगितले. 

हेही वाचा - चंद्रकांत दादांचा एक चेहरा दुसऱ्याला मदत केल्याचा, तर दुसरा काटा काढण्याचा -

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर सहा महिन्यातच नागपूर जिल्हा परिषदेची निवडणूक झाली. राज्याचे पाच वर्षे मुख्यमंत्री राहिलेल्या देवेंद्र फडणवीस यांना राज्यातील सत्ता बदलानंतर ही जिल्हा परिषद राखता आली नाही. आता पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातही भाजपला पराभूत व्हावे लागले आहे. विजय हा नेहमी समंजसपणाने घ्यायचा असतो. विजयाच्या उन्माद करुन चालत नाही. भाजपने जर ऑपरेशन लोटस करण्याचा प्रयत्न करत आमच्यातील एखादा आमदार फोडला तरी जनता त्यांना त्यांची जागा दाखवेल. त्यामुळेच पदवीधरच्या निकालानंतर त्यांनी आत्मचिंतन करावे, असा सल्लाही ना. मुश्रीफ यांनी यावेळी दिला. 

कसं लढायचं ते आम्ही ठरवू 

पदवीधर व शिक्षक मतदार संघात पराभूत झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांनी वेगवेगळे निवडणूक लढावे, असे विरोधक सांगत आहेत. मात्र निवडणुका कशा लढायच्या हा आमचा प्रश्‍न आहे. आम्ही कसं लढावं हे सांगणारे ते कोण, असा सवालही ना. मुश्रीफ यांनी केला. 

हेही वाचा -  58 वर्षानंतर लाडांच्या घरात आमदारकी -

बॅलेट पेपरर निवडणूक घेण्याची वेळ आली 

इव्हीएमवर मतदान घेण्याची मागणी विरोधक करत आहेत. जगातील शक्‍तीशाली राष्ट्र असलेल्या अमेरिकेतही बॅलेट पेपरवर मतदान झाले आहे. लोकांना इव्हीएमवर शंका आहे. आपण दिलेले मत ईव्हीएममध्ये कोणाला जाईल याची लोकांना खात्री नाही. त्यामुळेच आता बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची वेळ आली आहे. या पध्दतीत निकालाला वेळ लागत आहे. मात्र त्याने फारसा फरक पडत नसल्याचे ना.मुश्रीफ यांनी सांगितले.  
 

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: hasan mushrif said to BJP on situation of lose election in press conference in kolhapur