हातकणंगले तालुक्यातील निम्मे क्षेत्र ऊस पिकाखाली

ऋषिकेश राऊत
सोमवार, 1 जून 2020

हातकणंगले तालुक्‍यात शेतीतील निम्मे क्षेत्र या वर्षी ऊस पिकाखाली व्यापून जाणार आहे. तालुक्‍यात सर्वाधिक 49.63 टक्के क्षेत्रात उसाची पेरणी तर त्या खालोखाल 23.44 टक्के क्षेत्रात सोयाबीनचा पेरणी होणार असल्याचा अंदाज कृषी विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. तालुक्‍यात एकूण 44 हजार 830 हेक्‍टरवर खरीप पेरणीचे नियोजन केले आहे. 

इचलकरंजी : हातकणंगले तालुक्‍यात शेतीतील निम्मे क्षेत्र या वर्षी ऊस पिकाखाली व्यापून जाणार आहे. तालुक्‍यात सर्वाधिक 49.63 टक्के क्षेत्रात उसाची पेरणी तर त्या खालोखाल 23.44 टक्के क्षेत्रात सोयाबीनचा पेरणी होणार असल्याचा अंदाज कृषी विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. तालुक्‍यात एकूण 44 हजार 830 हेक्‍टरवर खरीप पेरणीचे नियोजन केले आहे. 

सोयाबीनचे क्षेत्र घटणार 
दरम्यान, तालुक्‍यात सोयाबीनच्या पीकात या वर्षी मोठी घट होणार आहे. भुईमुगाच्या पिकात काही प्रमाणात वाढ होईल. खरीप हंगाम तोंडावर आला आहे. त्यामुळे कृषी विभागाकडून हातकणंगले तालुक्‍यातील खरीप हंगामात होणाऱ्या पेरणीचे नियोजन केले होते. मागील वर्षातील महापुराच्या भीतीने सोयाबीन पिकाचे क्षेत्र हे मोठ्या प्रमाणात ऊस पिकाकडे वर्ग होत आहे. चालू खरीप हंगामात तालुक्‍यातील एकूण 5 हजार 166 हेक्‍टर सोयाबीनचे क्षेत्र कमी होणार आहे. अनिश्‍चित बाजारभाव व काढणीवेळी होणारे नुकसान यामुळेही सोयाबीन क्षेत्रात घट होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 

बाजरी पेरणीस निरुत्साह 
तृणधान्य, कडधान्य, अन्नधान्य, तेलबिया या पिकांच्या क्षेत्रात कमालीची घट होऊन इतर पिकांच्या क्षेत्रात वर्ग होणार असल्याची बाब खरीप नियोजनात दिसून आली. बाजरीच्या पेरणीला शेतकऱ्यांचा निरुत्साह आहे. भुईमुगाच्या पेरणीचे प्रमाण चांगले राहणार असून अधिकचे 318 हेक्‍टर क्षेत्र वाढणार आहे. मका, तूर, मूग, उडीद ही पिके काही प्रमाणात शेताच्या बांधावर व आंतरपीक म्हणून घेतली जाणार आहेत. हातकणंगले तालुक्‍यात प्रत्यक्ष पेरणीनुसार अपेक्षित पिकनिहाय असे 44 हजार 830 हेक्‍टर सर्वसाधारण क्षेत्र खरीप हंगामासाठी निश्‍चित केले आहे. 
2 हजार 900 हेक्‍टर चारा भाजीपाल्यासाठी हातकणंगले तालुक्‍यात जनावरांची संख्या 40 हजारहून अधिक आहे. त्यामुळे खरीप हंगामातील निश्‍चित क्षेत्र वगळून 2 हजार 970 हेक्‍टर क्षेत्रात चारा, नगदी पिके व भाजीपाला घेतला जाणार आहे. यामुळे आपत्तीच्या काळात चाऱ्याचा तुटवडा भासणार नाही. 

खरीप हंगाम स्थिती 
एकूण क्षेत्र (हेक्‍टर) - 50,474.27 
खरीप लागवडीखालील क्षेत्र - 44,830 

शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन
खरीप हंगामाचे पूर्ण नियोजन केले जात आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतीचे सर्वेक्षण व मार्गदर्शन केले जात आहे. शेतकऱ्यांना पेरणी, बी-बियाणे संदर्भात काही अडचणी, तक्रार असल्यास कृषी विभागाशी संपर्क साधावा. 
- गोरखनाथ गोरे, तालुका कृषी अधिकारी 

kolhapur


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hatkanangale taluka will be covered with sugarcane crop Kolhapur Marathi News