
गडहिंग्लज बाजारपेठ परिसरासह व तेथील बॅंकेत जायचे तर, नेहरू चौकात वाहन पार्कींग करा हा अलिखित नियमच जणू वाहनधारकांच्या अंगवळणी पडला आहे.
गडहिंग्लज : बाजारपेठ परिसरासह व तेथील बॅंकेत जायचे तर, नेहरू चौकात वाहन पार्कींग करा हा अलिखित नियमच जणू वाहनधारकांच्या अंगवळणी पडला आहे. गडहिंग्लजचे आद्य शिक्षक काळू मास्तरांचा पुतळा या पार्कींगमध्ये दडत असतानाही याकडे पोलिस अथवा नगरपालिका प्रशासनाचे लक्ष गेलेले नाही. परिणामी या पार्कींगमुळे लक्ष्मी रोड आणि मुख्य बाजारपेठेत होणाऱ्या वाहतूक कोंडीने व्यापाऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे.
तीन ते चार रस्ते एकत्र आल्यानंतर वाहनांचा अपघात होवू नये यासाठी चौकांची संकल्पना अस्तित्वात आली. नेहरू चौक ही त्याच पद्धतीचा आहे. बाजारपेठ, शिवाजी चौक, लक्ष्मी रोड आणि स्टेट बॅंकेसमोरचा रस्ता हे सर्व रस्ते चौकात एकत्रित येतात. विशेष म्हणजे हे सर्व रस्ते अरूंद आहेत. दोन्ही बाजूला पार्कींग होत असल्याने एखादी चारचाकी जाणेही जिकीरीचे ठरत आहे. बॅंकेच्या कामानिमित्त येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनाही दुचाकी लांब लावून चालत यावे लागते. इतकी गर्दी या रस्त्यावर असते.
मुळात अपघात घडू नये म्हणून चौकाची निर्मिती केली असताना त्याच चौकाचा दुरूपयोग होत असून अस्ताव्यस्त पार्कींगद्वारे अपघाताला निमंत्रण देण्याचा प्रकार सर्रास घडत आहे. गेल्या वर्षीच्या दसरा सणादिवशी पालखीच्या पारंपारिक सोहळ्यातही या अस्ताव्यस्त पार्कींगमुळे अडथळा निर्माण झाला. महत्वाचे कोणतेही कार्यक्रम असोत या चौकातून प्रवास करणे म्हणजे मोठी कसरत करावी लागते. पादचाऱ्यांनासुद्धा ये-जा करता येत नाही, अशी अवस्था या चौकाची सध्या तरी दिसत आहे. या पार्कींगचा परिणाम चारही रस्त्यांवरील वाहतूक कोंडीवर होत आहे.
सणांच्या पार्श्वभूमीवर खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना या वाहतूक कोंडीचा त्रास होत आहे. किंबहुना व्यापारावरही परिणाम होत असल्याने त्यांची डोकेदुखी वाढली आहे. या परिसरातील व्यापाऱ्यांनी वेळोवेळी पोलिस व नगरपालिकेकडे दाद मागितली. या प्रश्नावर उपाय योजना करण्याचा आग्रह धरला. परंतु, याकडे कोणाचेच लक्ष नाही. येथील पार्कींग बंद करत असताना त्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्याचीही गरज आहे. त्यासाठी पालिका व पोलिस प्रशासनाने समन्वयाने मार्ग काढण्याची गरज आहे. त्याच प्रतिक्षेत आता व्यापारी व नागरिक आहेत.
कडक धोरण राबविण्याची गरज
कोरोना कालावधीत लक्ष्मी रोड परिसरातील भाजी विक्री बंद केली होती. पालिकेने नियोजन केलेल्या 23 ठिकाणी हे विक्रेते बसत होते. अनलॉक झाल्यानंतरही हा नियम काही दिवस लागू राहिला. परंतु जसे सण सुरू झाले तेंव्हापासून लक्ष्मी रोड हाऊसफूल्ल होत आहे. सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडतो. मास्क, ग्लोज नसतात. विक्रीची बैठक व्यवस्थाही बेशिस्तीची आहे. कधी-कधी चारचाकी वाहनही जात नाही, इतकी गर्दी या रोडवर असते. सातत्याने वाहतूक कोंडीमुळे नागरिकांचे हाल होताहेत. भडगाव रोडवरच्या भाजी मार्केटमधील व्यापाऱ्यांनी कितीही टाहो फोडला तरी या विक्रेत्यांना एका छताखाली आणण्यात अपयश येत आहे. याप्रश्नावरही कडक धोरण पालिकेने राबविण्याची गरज आहे.
संपादन -सचिन चराटी
kolhapur