ब्रेकिंग - आरोग्य विभागाच्या १७ हजार जागा भरणार ; ओरोग्य मंत्री राजेश टोपे यांची घोषणा

धर्मवीर पाटील
Monday, 17 August 2020

कोरोना लढाईत ज्या खासगी डॉक्टरांचा मृत्यू होईल, त्यांनाही 50 लाखांचे कवच

इस्लामपूर (जिल्हा सांगली) : कोरोना महामारीमुळे आलेल्या संकटाचा सामना करण्यासाठी येत्या आठवड्यात राज्यात आरोग्य विभागाच्या १७ हजार जागा मेरिट पद्धतीने भरल्या जातील, अशी घोषणा सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे केली. शिवाय कोरोना लढाईत ज्या खासगी डॉक्टरांचा मृत्यू होईल, त्यांनाही 50 लाखांचे कवच दिले जाईल, त्यामुळे आयएमएच्या डॉक्टरांनी सक्रिय व्हावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. 

येथील उपजिल्हा रुग्णालयात टाटा ट्रस्टने उभारलेल्या अद्यावत कोविड हॉस्पिटलच्या लोकार्पण सोहळाप्रसंगी ते बोलत होते.  जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील अध्यक्षस्थानी होते. राज्यमंत्री विश्वजित कदम, खासदार धैर्यशील माने, आमदार मानसिंग नाईक, आमदार सदाभाऊ खोत, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. डूडी, जिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर्मा प्रमुख उपस्थित होते.

यावेळी मंत्री राजेश टोपे म्हणाले, "उपजिल्हा रुग्णालयाचा चेहरा पूर्ण बदलला आहे. सरकार आणि आरोग्य विभाग टाटा ट्रस्टचे ऋणी आहे. कारण या निधीव्यतिरिक्त व्हेंटिलेटर, पीपीई कीट, रुग्णवाहिका, मास्क यासाठी टाटांनी मोठी मदत दिली आहे. मराठवाडा भागातही जालना, अंबड परिसरात अशा सुविधेची मदत अपेक्षित आहे. जयंत पाटील आणि आमचे विश्वासाचे नाते आहे. त्यांनी या भागात चांगले नियंत्रण प्रस्थापित केले. आपणाला दूरदृष्टी असलेले नेतृत्व लाभले आहे. या सेंटरसाठी त्यांनी बेस्ट डॉक्टर्स द्यावेत. सरकार लागेल ती मदत करेल. यापूर्वी आरोग्य विभाग दुर्लक्षित राहिला होता, परंतु, आता त्यावरील खर्च वाढण्याला प्राधान्य राहील. विकसित देशात आरोग्य सुविधा महत्त्वाच्या असतात, कोरोनाने आपणाला त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही हे शिकवले आहे. सरकार अत्यंत अद्यावत आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी आग्रही आहे. लोकांना झळ पोहोचू नये, असे दूरगामी निर्णय घेतले जात आहेत. खासगी रुग्णालये ताब्यात घेत आहोत, जिल्हाधिकाऱ्यांना दिले जाणारे अधिकार, मोफत रुग्णवाहिका, पोलीस कर्मचाऱ्यांना 50 लाखाचा विमा हे महत्त्वाचे निर्णय घेतलेत.'' 

''खासगी डॉक्टर्सनाही 50 लाखाचे कवच देणार आहोत. लस येईपर्यंत आपणाला मास्क, सॅनिटायझर वापरत कोरोनासोबत जगावे लागणार आहे, त्यामुळे त्याशी संबंधितअनधिकृत खर्चावर नियंत्रण आणले जाईल. लोकशाही आघाडीचे सरकार प्रामाणिकपणे लोकहिताचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहे. कोरोनाच्या महामारीत कुणाकडेही दुर्लक्ष होणार नाही. ट्रेसिंग आणि अलगिकरण महत्त्वाचे आहे. टेस्टिंग करण्यात कमी पडू नका. 

आपणाला मृत्युदर एक टक्क्यांच्या खाली आणायचा आहे. तपासणी वाढवून नियंत्रण आणणे शक्य आहे. मुंबई, मालेगावात त्याचा चांगला अनुभव आला आहे. कुणालाही लक्षण दिसले तर एक टक्काही हयगय करू नका. अंगावर काढू नका, ताबडतोब रुग्णालयात दाखल व्हा." असे आवाहन मंत्री टोपे यांनी केले. 

जयंत पाटील म्हणाले, "मार्चमध्ये कोव्हिडने धडकी भरवली होती. त्यावर इस्लामपूरकरांनी मात केली. सध्याच्या वाढत्या संख्येच्या धोक्यात सांगली जिल्हा प्रशासन जबाबदारीने काम करत आहे. आरोग्य विभागाने त्यावेळेस इस्लामपूरची जी परिस्थिती होती, ती विचारात घेऊन पुढाकार घेतला आणि टाटा ट्रस्टच्या मदतीने आठ कोटी रुपये मंजूर केले. त्यामुळे टाटा कुटुंबियांचे ऋणी आहोत. "राजेश टोपे हे आमच्या सरकारचा चेहरा आहेत, ते प्रत्येक ठिकाणी पोहचत आहेत आणि घरात दुःखद घटना घडूनही ते राज्याच्या सेवेत सक्रिय आहेत, अशा भावना मंत्री टोपे यांच्याविषयी व्यक्त केल्या. 

हे पण वाचामोठी बातमी; कोल्हापूरमध्ये होणार मूसळधार पाऊस

जिल्हाधिकारी म्हणाले, "मार्चमध्ये इस्लामपुरात रुग्ण सापडले, त्यावर पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली नियंत्रण मिळवता आले. गंभीर रुग्णांसाठी व्यवस्था नसल्यामुळे टाटा ट्रस्टच्या सहकार्याने हे अद्यावत सेंटर उभारले. आंतरराष्ट्रीय दर्जाचे इन्फ्रास्ट्रक्चर जलद कालावधीत उभारणी केली आहे. आता डेडिकेटेड सुविधांचा लाभ होईल. उद्यापासून चांगल्या दर्जाची सेवा त्याठिकाणी उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केली आहे." 

टाटा ट्रस्टचे एन. श्रीनाथ म्हणाले, "टाटा समूह मदत नव्हे तर आपले कर्तव्य करत आहे. राज्याच्या लोकांसाठी काहीतरी करतोय याचे समाधान आहे. आम्ही सरकारसोबत विविध कार्यात नेहमी सोबत राहू. प्रांताधिकारी नागेश पाटील यांनी स्वागत केले. जिल्हा शल्यचिकित्सक संजय साळुंखे यांनी आभार मानले. तहसीलदार रविंद्र सबनीस, गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे,  डॉ. राणोजी देशमुख, डॉ. साकेत पाटील, सभापती शुभांगी पाटील, देवराज पाटील, अरुण लाड, विजय पाटील, संग्रामसिंह पाटील, शहाजी पाटील, विश्वनाथ डांगे, नेताजी पाटील आदी उपस्थित होते. 

 

संपादन- धनाजी सुर्वे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Health Minister Rajesh Tope announces to fill 17 000 posts in health department