जयसिंगपूरला 44 हजार 523 नागरिकांच्या आरोग्याचे सर्वेक्षण

गणेश शिंदे
Tuesday, 13 October 2020

"माझे कुटुंब, माझी जबाबदारी' या शासनाच्या सर्वेक्षण मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात शहरातील 9789 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करून 44 हजार 523 नागरिकांच्या आरोग्याची माहिती संकलित केली. नगरपालिका प्रशासन आणि जयसिंगपूर प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे शहरात ही मोहीम राबविण्यात येत आहे.

जयसिंगपूर : "माझे कुटुंब, माझी जबाबदारी' या शासनाच्या सर्वेक्षण मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात शहरातील 9789 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करून 44 हजार 523 नागरिकांच्या आरोग्याची माहिती संकलित केली. नगरपालिका प्रशासन आणि जयसिंगपूर प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे शहरात ही मोहीम राबविण्यात येत आहे. सोमवारपासून पुन्हा दुसऱ्या टप्प्यातील मोहिमेलाही प्रारंभ करण्यात आला. खासगी आणि नगरपालिकेच्या शाळांमधील 96 शिक्षकांचा मोहिमेत सहभाग आहे. 

मुख्याधिकारी टिना गवळी, उपमुख्याधिकारी पवन म्हेत्रे, जयसिंगपूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पांडुरंग खटावकर, आरोग्य सेवक जावेद मुल्ला, डी. बी. गायकवाड आदींच्या परिश्रमातून पहिल्या टप्प्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यातील मोहिमेला प्रारंभ झाला. जयसिंगपूर शहरातील कोरोनाला रोखण्यात प्रशासनाला यश येत आहे. 

कोरोना रुग्णांचा वाढता आलेख रोखण्यासाठी प्रशासनाला सेवाभावी संस्थांचेही योगदान मिळाले आहे. शासनाच्या "माझे कुटुंब, माझी जबाबदारी' या सर्वेक्षण मोहिमेची प्रभावीपणे अंमलबजावणी केल्याने यात 32 संशयित रुग्ण आढळून आले. त्यांचे स्वॅब तपासणीसाठी घेतले असता यातील एक जण पॉझिटिव्ह आढळला. सर्वेक्षणात प्रत्येक घरातील व्यक्ती आणि त्यांच्या आजारपणाची माहिती घेण्यात आली असून, दुसऱ्या टप्प्यात त्यांच्या आरोग्याबाबत पाठपुरावा केला जाणार आहे. 

दृष्टिक्षेपात 
- घरांचा सर्व्हे .................................. 9789 
- नागरिकांच्या आरोग्याचा सर्व्हे ............. 44523 
- संशयित रुग्ण ............................... 32 
- एकूण कोरोना रुग्ण संख्या ................. 805 
- मृतांची संख्या ............................... 40 
- उपचारानंतर बरे रुग्ण ...................... 729 
- ऍक्‍टिव्ह रुग्ण ................................ 38 

लवकरच कोरोनाला शहरातून हद्दपार करू
पहिल्या टप्प्यातील सर्वेक्षण मोहीम पूर्ण झाली. यात अनेक महत्त्वाच्या बाबी पुढे आल्या. यामुळे शहरातील कोरोनावर नियंत्रण राखणे शक्‍य झाले आहे. दुसऱ्या टप्प्यातील सर्वेक्षण मोहिमेला प्रारंभ झाला असून, नागरिकांनी यालाही सहकार्य करावे. प्रशासनाच्या प्रयत्नामुळे कोरोनावर नियंत्रण राखण्यात यश आले असून, लवकरच कोरोनाला शहरातून हद्दपार करू. 
- टिना गवळी, मुख्याधिकारी, जयसिंगपूर, नगरपरिषद 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Health Survey Of 44 Thousand 523 Citizens In Jaysingpur Kolhapur Marathi News