...आणि पन्हाळवासियांनी अनुभवले भयकंपित करणारे आँखो देखा हाल   

heavy rain on panhala fort
heavy rain on panhala fort

पन्हाळा - दिवसभर मागमूसही नाही... सायंकाळी अचनाक आकाशात ढग दाटून येतात काय... सुरुवातीला टपटप पडणारा पाऊस नंतर मात्र सुपाने पडतो काय... नि अवघ्या दोनेक तासांत रस्त्यांना, दगड-मातीला कवेत घेऊन लालभडक पाणी वाट मिळेल तिकडे धावते काय... याचा भयकंपित करणारा आँखो देखा हाल काल पन्हाळवासीयांना अनुभवला. अर्थात जे उंचावर होते ते मजा बघत राहिले; पण ज्यांची घरे सखलात आहेत ते मात्र घरात शिरलेले पाणी बादलीने बाहेर काढण्यात आणि साहित्याची आवराआवर करण्यात गुंतले. 

140 मिमी पडलेल्या पावसाने खरे नुकसान केले ते तीन दरवाजातील रस्त्याचे. निमाजगी माळ, गोपाळतीर्थ परिसरातून आलेले पाणी तीन दरवाजाबाहेर असलेल्या मोरीला आवरले नाही. पूर्वी फरसबंदी असलेल्या तीन दरवाजा परिसरातील अंतर्गत मोरीतून हे पाणी वरून केलेला डांबरी मुलामा फोडून बाहेर आले आणि डांबरी रस्त्याची कवचे काढत उताराच्या दिशेने वाहू लागले. साहजिकच तीन दरवाजाच्या मधल्या चौकातील डांबरीकरणाला भेगा पडल्या. दरवाजाबाहेरील मोरीबरोबरच रस्त्यावरून पाण्याचे लोट वाहू लागल्याने रविवारपेठेच्या वरच्या बाजूस नव्याने बांधलेल्या संरक्षक कठड्याशेजारील रस्ता वाहून गेला आणि तीन दरवाजातून पश्‍चिम भागातील नांदगाव, कोतोली, कळे भागाकडे जाणारी वाहतूक बंद झाली. 

नुकताच केलेला बुधवारपेठ-पन्हाळा रस्ता दरडीकडील बाजूने गटार काढल्याने सुरक्षित राहिला असला तरी दरडीवरून वाहत येणाऱ्या पाण्यामुळे काही ठिकाणी मुरुम-माती रस्त्यावर आली आणि रात्री बरेच दुचाकीस्वार घसरले. गुरुवारपेठेत हॉटेल ग्रीन पार्कसमोरील दोन बंगलेवाल्यांनी वरचा मुरुमाचा भाग खोदून बांधकाम केल्याने मार्तंड, रेडेघाट परिसरातून येणारे पाणी पूर्वीच्या ओढ्यातून जाण्याऐवजी मार्तंडकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर आले आणि दगड, मातीसह मुख्य डांबरी रस्त्यावर आले. पाण्याचा जोर मोठा असल्याने ते ग्रीनपार्क हॉटेलमध्ये शिरले. हॉटेलमध्ये चार फुटांपर्यंत पाणी साचल्याने संरक्षक भिंत फोडून पाण्याला वाट करून दिल्याने इमारत वाचली. साधोबा तलावातील पाणी वाढल्याने मंगळवार पेठेतील घरात पाणी घुसले. 

पर्यायी मार्ग अधोरेखित 
पन्हाळगडावर येणारा मुख्य मार्ग दरवर्षी खचतोय. त्यामुळे मार्गाला भवितव्य नाही. अडचणीच्या वेळी तीन दरवाजातून दुचाकीवरून खाली जायला रस्ता होता; तो पण आता खचून गेला आहे. साहजिकच गडावर येण्यासाठी पुसाटीमार्गे सर्व्हे झालेला पर्यायी मार्ग होणे गरजेचे बनले आहे. 

 2020 सालच खराब 

गतवर्षी ऑगस्टमध्ये मुख्य रस्ता खचला. दोन महिने वाहतूक बंद राहिली. दीपावलीचा पर्यटक हंगाम झालाच नाही. फेब्रुवारीपासून कोरोनाने गडाचे दरवाजे जे बंद झाले ते आजअखेर उघडले नाहीत. त्यातच पावसाने दैना केल्याने गडावरील बऱ्याच रस्त्यांची दुरवस्था झाली. त्यामुळे 2020 वर्ष बाद निघाल्याची भावना पन्हाळवासीयातून व्यक्‍त होत आहे. 

संपादन - धनाजी सुर्वे 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com