'तो' कर्नाटकातला, 'ती' महाराष्ट्रातली, लग्न करुन त्यांनी संसार थाटला पण...

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 17 May 2020

लॉकडाउनमूळे महाराष्ट्र-कर्नाटक बससेवा बंद. तरीही हुचय्या नामक त्या व्यक्तीने मंडया येथून नागपूरला जाण्याचा निर्णय घेतला.

बेळगाव : 'तो' कर्नाटकातील मंड्या जिल्ह्यातील रहिवाशी. 'ती' महाराष्ट्रातील नागपूरची. लग्न करुन त्यानी मंडया येथेच संसार थाटला होता. ती नऊ महिन्याची गर्भवती, पहिल्या  बाळंतपणासाठी माहेरी नागपूरला जाण्याचा तिचा हट्ट. लॉकडाउनमूळे महाराष्ट्र-कर्नाटक बससेवा बंद. तरीही हुचय्या नामक त्या व्यक्तीने मंडया येथून नागपूरला जाण्याचा निर्णय घेतला. गरोदर पत्नीला सोबत घेऊन दहा दिवसांपूर्वी त्याने मंडया सोडले व बंगळूर गाठले. तेथून थेट नागपूरला जाता आले नाही. कर्नाटक सरकारने बंगळूर येथे अडकलेल्या नागरिकांना विविध जिल्ह्यांमध्ये पाठविण्याचा निर्णय घेऊन बस सुविधा उपलब्ध करून दिली. त्याचा फायदा घेत ते दाम्पत्य बेळगावात आले. महापालिकेचे सहाय्यक कार्यकारी अभियंते व्ही एस हिरेमठ व महांतेश नरसन्नावर यांनी त्यांची चौकशी केली व कोल्हापूर सर्कल येथे असलेल्या युवजन व क्रीडा विभागाच्या वसतिगृहात त्यांना ठेवले. त्यांची भोजनाची व निवासाची व्यवस्था झाली पण त्यांना नागपूर येथे कसे पाठवायचे असा गहन प्रश्न हिरेमठ व नरसन्नावर यांच्यासमोर होता. 

ती महिला ९ महिन्यांची गरोदर असल्यामुळे बसमधून पाठविणे त्यांना योग्य वाटले नाही. महापालिका आयुक्त के. एच जगदीश यांना त्यांनी ही समस्या सांगितली. त्यावर विशेष वाहनातून त्या महिलेला नागपूर येथे पाठविण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला. पण त्या वाहनाचे भाडे कोण देणार? असा प्रश्न उपस्थित झाला. त्यावेळी बेळगावचे ठेकेदार एन. एस. चौगले पुढे आले. त्यांनी वाहनांचे भाडे देण्याची तयारी दाखविली. त्यांनतर नागपूरला जाण्यासाठी एक कार भाडेकराराने घेण्यात आली. रविवारी दुपारी त्या दांपत्याला नागपूर येथे जाण्यासाठी तयार राहण्यास सांगण्यात आले. आयुक्त जगदीश, हिरेमठ, नरसन्नावर, महसूल उपायुक्त एस बी दोडडगौडर यांच्या उपस्थितीत त्या दांपत्याची रवानगी नागपूरकडे करण्यात आली. त्यासाठी आवश्यक पास व अन्य औपचारिकता पूर्ण करण्यात आली. कारचे १६ हजार रुपये भाडे ठेकेदार चौगले यांनी दिले. महापालिका प्रशासन व अधिकाऱ्यांना हृदयपूर्वक धन्यवाद देत त्या दाम्पत्याने नागपूरकडे प्रयाण केले. 

हे पण वाचा - सावधान : होम क्वारंटाईन शिक्क्यामुळे हाताला फोड

गेले आठ दिवस या दांपत्याची देखभाल हिरेमठ व नरसन्नावर हे दोन अधिकारी आपल्या कुटुंबाप्रमाणे करीत होते. तीन दिवसांपूर्वी अचानक त्या महिलेच्या पोटात दुखू लागले. त्यावेळी त्या महिलेला तातडीने रुग्णलयात दाखल करून उपचार करण्यात आले. ती महिला गर्भवती असल्यामुळे तिच्या आरोग्याकडे आठ दिवस विशेष लक्ष्य द्यावे लागले. त्याचा तणाव हिरेमठ व नरसन्नावर यांच्यावर होता. रविवारी ते दांपत्य नागपूरकडे रवाना झाल्यावर त्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. त्या दांपत्याची योग्य देखभाल केल्याबद्दल आयुक्त जगदीश यांनी दोन्ही अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. अडचणीच्या काळात आर्थिक मदत दिलेल्या ठेकेदार चौगले यांचे आभार मानले.

हे पण वाचा -  धक्कादायक ; शाळेतून घरी गेला अन्‌ पॉझिटिव्ह झाला ; कसा घडला हा प्रकार
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: help of administration couple was sent karnataka to Nagpur