उसाच्या रसापासून आता होणार थेट इथेनॉलची निर्मिती

with the help of sugarcane creation of ethanol start in kagal kolhapur said samarjitsinh ghatge in press conference
with the help of sugarcane creation of ethanol start in kagal kolhapur said samarjitsinh ghatge in press conference

कागल (कोल्हापूर) : येथील श्री. छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याने चालू गळीत हंगामामध्ये ब्राझील पॅटर्नच्या धर्तीवर ऊसाच्या रसापासून थेट इथेनॉल निर्मिती सुरू केली असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण उपस्थित होते.

यावेळी घाटगे म्हणाले, कारखान्याचे संस्थापक स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांनी शाहू साखर कारखाना चालविताना साखर उद्योगाच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आधुनिकतेचा स्विकार करीत नवनवीन प्रयोग केले. तीच परंपरा कायम ठेवीत केंद्र सरकारचे इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन देण्याच्या धोरणाचा लाभ घेण्याच्या दृष्टीने कारखान्याने उसाच्या रसापासून थेट इथेनॉल निर्मिती करणे सुरू केले आहे. त्यासाठी आवश्यक असणारी कारखान्याची दैनंदिन गाळप क्षमता 1000 मेट्रिक टनांनी वाढवून ती प्रतिदिनी 8000 मे. टन केली आहे. 

कारखान्याचा चालू गळीत हंगामात प्रतिदिनी ८ हजार मेट्रिकटन ऊसाचे गाळप होत आहे. यापैकी उत्पादित रसाचा काही भाग साखर निर्मितीसाठी व काही भाग इथेनॉल निर्मितीसाठी वापरण्यात येत आहे. त्यानुसार उसाच्या रसापासून दैनंदिन 60 हजार लिटर इथेनॉल निर्मिती केली जात आहे. यापासुन तयार झालेल्या इथेनॉलला 62 रुपये 65 पैसे प्रति लिटर असा दर मिळतो. त्याचे बील इथेनॉल पुरवठा झाल्यानंतर 21 दिवसात मिळते. याचा कारखान्याला आर्थिक फायदाही होतो. शिवाय देशाचे पेट्रोलियम पदार्थ आयात करणेसाठी खर्च होणारे परकीय चलन वाचते. इथेनॉलला पर्यावरणपूरक इंधन म्हणून मान्यता आहे. अशा पद्धतीने इथेनॉल निर्मिती केल्यामुळे साखर कारखान्यास आर्थिक लाभ होणार आहे. शिवाय उसाच्या अतिरिक्त उत्पादनामुळे देशांतर्गत संभाव्य साखरेच्या अतिरिक्त साठ्यामुळे उद्भवणारे संकटही काही प्रमाणात कमी होईल, असेही घाटगे म्हणाले.

थेट रसापासून इथेनॉल निर्मितीमुळे साखर निर्मिती कमी होते. सरासरी साखर उतारा कमी राहतो. पण एफ. आर. पी. आदा करण्यासाठी, निर्माण झालेली साखर आणि इथेनॉल निर्मितीकडे गेलेली साखर असा एकूण साखर उतारा गृहीत धरला जातो. हे शेतकऱ्यांसाठी लाभदायकच आहे. शासनाने पेट्रोलमध्ये १० टक्के इथेनॉल मिसळण्याचा निर्णय घेतला आहे. भविष्यात डिझेलमध्येही इथेनॉल वापरण्याचा विचार शासन करत आहे. भविष्याचा विचार करता साखर उद्योगाला इथेनॉलकडे वळावे लागेल. ऊसापासून थेट इथेनॉल निर्मिती करणारे मोजकेच कारखाने आहेत. शाहू कारखान्यास ६५ लाख लिटर इथेनॉल निर्मितीचे टेंडर मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले.

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com