esakal | समाजाच्या दातृत्वातून अंधाला निवारा 
sakal

बोलून बातमी शोधा

समाजाच्या दातृत्वातून अंधाला निवारा 

पती-पत्नी, दोन मुलींचे चौकोनी कुटुंब. सारे काही सुरळीत चालले होते. पण, सुखी संसाराला दृष्ट लागावी अशी घटना घडली.

समाजाच्या दातृत्वातून अंधाला निवारा 

sakal_logo
By
अवधूत पाटील

गडहिंग्लज : पती-पत्नी, दोन मुलींचे चौकोनी कुटुंब. सारे काही सुरळीत चालले होते. पण, सुखी संसाराला दृष्ट लागावी अशी घटना घडली. कर्त्या कुटुंबप्रमुखाचीच दृष्टी गेली. डोळ्यापुढेच नाही तर आयुष्यात अंधार पसरला. गेल्या 20-25 वर्षांपासून त्यांचा परिस्थितीशी संघर्ष सुरू आहे. जिथे पोटाची खळगी भरणे मुश्‍किल तिथे कोलमडलेला निवारा उभारणे दूरची गोष्ट. पण, समाजातील दातृत्वाचे हात पुढे आले अन्‌ एका असहाय्य अंधाचे घरकुल साकारू लागले. येथील लकी खिदमत फौंडेशनने त्यासाठी पुढाकार घेतला आहे. 

अल्लीसाहेब बापूसाहेब पिंजार यांचे मूळ गाव माद्याळ कसबा नूल (ता. गडहिंग्लज). पण, गेल्या तीन दशकापासून ते गडहिंग्लज येथेच स्थायिक झाले आहेत. पत्नी शैणाजबी यांच्यासह शेंद्री रोडवर त्यांचे वास्तव्य आहे. दोन्ही मुलींचा विवाह झालेला आहे. डोळ्यांना रक्तपुरवठा करणाऱ्या शिरा कमकुवत झाल्याचे निमित्त झाले अन्‌ त्यांची दृष्टी गेली. अनेक ठिकाणी उपचार घेतले पण, आयुष्यात प्रकाश किरण काही आले नाहीत. लग्न समारंभात चौघडा वाजविण्यासह जमेल ती कामे ते करू लागले. पत्नी चार घरची धुणी-भांडी करुन संसाराचा गाडा चालवते. पोटाची खळगी भरण्यासाठी समाजातील दानशूरांचीही मदत होत आहे. 

दरम्यान, पिंजार यांचे घर कधी कोसळेल याचा अंदाज बांधणे मुश्‍किल झाले. ही परिस्थिती लक्षात घेऊन येथील लकी खिदमत फौंडेशनच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला. ज्याच्या त्याच्या ऐपतीप्रमाणे निधी जमा होऊ लागला. पिंजार यांच्या घरकुलाच्या बांधकामाला सुरवात झाली. सुन्नी जुम्मा मस्जिद व मोहमदीया अरबी मदरसा यांनीही आपला वाटा उचलला आहे. सुहास डांग यांनी आपल्या व्यवसायाच्या ओळखीतून सवलतीत साहित्य उपलब्ध करुन दिले. दोन्ही मुलींनीही हातभार लावला. समाजातील दानशूरांनीही जमेल तशी मदत दिली आहे. महिनाभरात घरकुलाचे जवळपास 90 टक्के काम पूर्ण झाले आहे. 

चाचांची परिस्थिती पाहून मदत

नदाफ चाचांची परिस्थिती पाहून यापूर्वीदेखील मदत केली होती. त्यांच्या राहत्या घराचा प्रश्‍न निर्माण झाला होता. फौंडेशनच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली. त्यामध्ये सर्वांनीच बांधकाम करण्याला संमती दिली. 
- इम्रान चॉंद, अमजद मीरा, लकी खिदमत फौंडेशन, गडहिंग्लज 

संपादन - सचिन चराटी

kolhapur