हेरे पंचक्रोशीत यंदाही कसरतच!

सुनील कोंडुसकर
Friday, 29 May 2020

 हेरे (ता. चंदगड) पंचक्रोशीतील नागरिकांना या वर्षीच्या पावसाळ्यातही रस्त्यावरून प्रवास करताना कसरत करावी लागणार आहे. कोरोनामुळे रस्ता रुंदीकरणाचे काम रखडले आहे. पाऊस संपल्यानंतर काम सुरू करायचे म्हटल्यास सुमारे चार ते पाच महिने जैसे थे स्थिती राहणार आहे. गेली सुमारे दोन दशके रस्ता रुंदीकरणाची मागणी करणाऱ्या या भागातील नागरिकांच्या पदरी पुन्हा प्रतीक्षाच आली आहे. 

चंदगड : हेरे (ता. चंदगड) पंचक्रोशीतील नागरिकांना या वर्षीच्या पावसाळ्यातही रस्त्यावरून प्रवास करताना कसरत करावी लागणार आहे. कोरोनामुळे रस्ता रुंदीकरणाचे काम रखडले आहे. पाऊस संपल्यानंतर काम सुरू करायचे म्हटल्यास सुमारे चार ते पाच महिने जैसे थे स्थिती राहणार आहे. गेली सुमारे दोन दशके रस्ता रुंदीकरणाची मागणी करणाऱ्या या भागातील नागरिकांच्या पदरी पुन्हा प्रतीक्षाच आली आहे. 

महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या बेळगाव परिसराला कोकण व गोव्याला जोडणारा सर्वात जवळचा मार्ग म्हणून चंदगड-तिलारीनगर रस्त्याचा उपयोग केला जातो. सुमारे वीस किलोमीटरच्या या अंतरात चंदगड ते हेरे हे आठ किलोमीटरचे अंतर अत्यंत धोकादायक आहे. निमुळता रस्ता आणि यू आकाराची वळणे यामुळे अनेकदा अपघात झाले आहेत. त्यातच मोहनतळ्यापासून पुढच्या रस्त्याची साईडपट्टी खचली आहे.

मूळ रस्त्यापासून दोन फूट जमीन खचल्यामुळे अरुंद रस्त्यावरुन समोरच्या वाहनाला बाजू देताना गाडी खाली घेणे धोकादायक ठरते. यातून अनेकदा वादाचे प्रसंग उद्भवतात. या रस्त्याच्या साईडपट्टीला भराव टाकून डांबरीकरण करावे, अशी मागणी होती. परंतु या वर्षी शासनाने मलगेवाडी (ता. चंदगड) ते चंदगड- तिलारीनगरपर्यंतच्या रस्त्याचे दुपदरीकरण करण्याचा निर्णय घेतला.

कामाला सुरवातही झाली. रस्त्याच्या दुतर्फा झाडे तोडली. खरंतरं ही झाडे म्हणजे या भागाचे सौंदर्य होते. परंतु रस्ता रुंदीकरण होतय म्हटल्यावर नागरिकांनी त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र कोरोनामुळे अचानकपणे लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. दिवसेंदिवस हा कालावधी वाढत गेला. रस्त्यावर काम करणारे परप्रांतिय मजूरही आपापल्या गावी गेले. त्यामुळे हे काम रखडले आहे. आता तोंडावर पावसाळा आहे. या विभागात पावसाचे प्रमाणही जास्त आहे. त्यामुळे आता या रस्त्याचे काम सुरू करण्यासाठी पावसाळ्यानंतरच मुहूर्त मिळणार आहे. गेली वीस वर्षे रस्ता रुंदीकरणाच्या प्रतिक्षेत असणाऱ्या नागरीकांना या वर्षीही प्रतिक्षेच्या रांगेत उभे रहावे लागणार आहे. 

ती समस्या भेडसावणार? 
गतवर्षी एका खासगी कंपनीने केबल वाहिनी टाकण्यासाठी रस्त्याच्या एका बाजूची साईडपट्टी उखडली. मात्र ती पुन्हा योग्य पद्धतीने न भरल्याने पावसाळ्यात या साईडपट्टीत अनेक वाहने रुतली गेली. जेसीबी, ट्रॅक्‍टर लावून वाहने बाहेर काढावी लागली. यावर्षी पुन्हा ती समस्या भेडसावण्याची शक्‍यता आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Here Villagers Suffer For Narrow Roads Kolhapur Marathi News