कोल्हापुरातील बिंदू चौक-बुरुज आणि‌ तटबंदी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

heritage of kolhapur information by uday gaikwad

कोल्हापूरला भुईकोट किल्ला समजून विचार केला तर ते मराठा राजवटीचा वारसा समजून घ्यायला सोपे आहे

कोल्हापुरातील बिंदू चौक-बुरुज आणि‌ तटबंदी

कोल्हापूर : बुरुज आणि भक्कम दरवाजा असलेले कोल्हापूरचे प्रवेशद्वार इतिहासाची साक्ष देते, तो आजचा बिंदू चौक. इथे दिसणारी दरवाजाची कमान, दोन बुरुज व तटबंदी दक्षिणेला तशीच पुढे आहे. त्यापुढे दोन बुरुज आणि तट आहे. त्याची मोठ्या प्रमाणात पडझड झालेली दिसते. अनेकांना याबद्दल माहिती नाही. कोल्हापूरला भुईकोट किल्ला समजून विचार केला तर ते मराठा राजवटीचा वारसा समजून घ्यायला सोपे आहे.


छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत १६५९ च्या सुमारास कोल्हापूर मराठ्यांच्या ताब्यात आले. १७३१ मध्ये कोल्हापूर स्वतंत्र झाल्यानंतर १७८२ मध्ये राजधानी पन्हाळ्यावरून कोल्हापूरला केली. त्यानंतर पटवर्धनाच्या बरोबर संघर्ष तीस-पस्तीस वर्षे सुरू होता. या काळात कोल्हापूरच्या संरक्षणासाठी शहराभोवती ९.१४ मीटर उंच आणि ३ ते ७.९२ मीटर रुंद असा दगडी कोट बांधण्यात आला. कोटाच्या भिंतीला समान अंतरावर ४५ बुरुज होते. भिंतीच्या बाहेर सभोवती खोल खंदक होता.

गंगावेस, रंकाळावेस, वरुणतीर्थवेस, आदितवार (रविवार) वेस, मंगळवारवेस, शनिवारवेस अशी प्रवेशद्वारे होती. या दारातून आत जाताना खंदक ओलांडून जाण्यासाठी हलते पूल होते. अस्वच्छता, अरुंद रस्ते, दुर्गंधी, कचरा आणि प्लेगची साथ यामुळे शहरात अवकळा पसरली. तेव्हा ही तटबंदी पाडून टाकण्याचा निर्णय ब्रिटिश आधिकाऱ्यांच्या दबावाखाली झाला.


तट पाडून खंदक बुजवला गेला, वेशी पाडल्या आणि रस्ता केला. आज बिंदू चौक-छत्रपती शिवाजी पुतळा-पापाची तिकटी-गंगावेस-रंकाळा वेस-वरुणतीर्थ- मिरजकर तिकटी बालगोपाल तालीम असे हे तट आणि बुरुज होते, त्यावर रस्ता झाला. आता फक्त बालगोपाल तालीम ते बिंदुचौक अशा भागात चार बुरुज शिल्लक राहिले आहेत. अगदी किंचित बांधकाम विठ्ठल मंदिराच्या मागील बाजूस दिसते. अगदी अलीकडे येथील खंदक बुजवला. स्वातंत्र्याच्या लढ्यादरम्यान घटनेनंतर बिंदू चौक हे नाव उर्वरित भागाला असले तरी त्याचा या तटबंदीशी तसा संबंध नाही. आज महात्मा जोतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे व स्तंभ येथे दिसतो. यापैकी बाबासाहेबांचा पुतळा ते कोल्हापूर दौऱ्यावर असताना  शिल्पकार बाळ चव्हाण यांनी त्यांना समोर बसवून तयार केलेला देशातील एकमेव पुतळा आहे. वेशीवर मारुतीचे मंदिर ही संकल्पना आजही काही ठिकाणी मारुती मंदिरांनी अधोरेखित होते. आज शिल्लक राहिलेला भाग जपला पाहिजेच. त्यावरील झाडे काढणे, डागडुजी करणे, पडझड रोखणे आवश्‍यक आहे. मात्र, त्याचे अवशेष असलेल्या भागाचे महत्त्वही पुढच्या पिढीला कळेल, असे प्रयत्न केले पाहिजेत.

इतिहासात डोकावताना...
      संरक्षणासाठी शहराभोवती ९. १४ मीटर उंच, ३ ते ७.९२ मीटर रुंद असा दगडी कोट बांधला
      कोटच्या भिंतीला समान अंतरावर ४५ बुरुज होते आणि भिंतीच्या बाहेर सभोवती खोल खंदक 
      अस्वच्छता, अरुंद रस्ते, दुर्गंधी, कचरा प्लेगची साथ यामुळे तटबंदी पाडून टाकण्याचा निर्णय
      आता फक्त बालगोपाल तालीम ते बिंदुचौक या भागात चार बुरुज शिल्लक

... तर वारसा येईल संपुष्टात
विकासाच्या वाटेवर या तटबंदीला पाडून टाकण्याचा घाट घातला जात आहे किंवा त्याचे महत्त्व समजून न घेता त्यालगत पार्किंग व कमर्शियल कॉम्प्लेक्‍स बांधण्याचा प्रयत्न आहे. त्याला आवर नाही घातला तर मराठा राजवटीचा हा भव्य वारसा संपुष्टात येणार आहे.

संपादन - अर्चना बनगे

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Kolhapur
loading image
go to top