छत्रपती शाहू महाराजांनी सर्वांत मोठे कृषी प्रदर्शन ''या'' वास्तूत भरवून हरितक्रांतीचा घातला पाया

उदय गायकवाड
Monday, 28 December 2020

आयर्विन ॲग्रिकल्चर म्युझियम ते स्वराज्य भवन

कोल्हापूर :  आजचे जिल्हाधिकारी कार्यालय सर्वांना परिचयाचे असले तरी त्याला वारसास्थळ म्हणून महत्त्वपूर्ण वारसा आहे. तो कृषी संग्रहालय व कृषी विद्यालय या वास्तूमध्ये सुरू होतो. सर्वांत मोठे कृषी प्रदर्शन आयोजित करून हरितक्रांतीचा पाया घातल्याचे एका अर्थाने हे स्मारक आहे. जगभर शेती व औद्योगिक क्रांतीची सुरवात स्वातंत्र्योत्तर काळात झाली, असे असले तरी कोल्हापूरमध्ये मात्र ती शतकाच्या सुरवातीलाच छत्रपती शाहू व छत्रपती राजाराम महाराजांच्या दूरदृष्टीने झाली होती.

छत्रपती शाहू महाराजांनी १९०४ मध्ये गोरगरीब शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी राणी व्हिक्‍टोरिया फंड व १९१२ मध्ये कोल्हापूर रेसिडेंट कर्नल हावूस यांच्या अध्यक्षतेखाली किंग एडवर्ड मेमोरियल फंडची निर्मिती करून शास्त्रीय शेती पद्धतीचा अवलंब करण्यासाठी व्याख्याने, प्रात्यक्षिके, प्रदर्शने आयोजित करण्याचे ठरवले. याच कल्पनेतून शेती संग्रहालय व विद्यालय 
सुरू झाले. 

छत्रपती शाहू महाराजांच्या काळात १९१४ मध्ये सर्वांत मोठे कृषी प्रदर्शन भरवण्यात आले होते. त्यापुढील टप्पा म्हणजे १९२७ मध्ये आयर्विन म्युझियमची इमारत डोराईक शैलीमध्ये दोन लाख रुपये खर्च करून बांधण्यात आली. स्टेट इंजिनिअर डी. जी. वैंगणकर यांनी ते काम पाहिले. रचना साधी असली तरी त्याचा राजेशाही थाट दिसतो. सध्या असलेल्या या वास्तूमध्ये कोणतेही अडथळे ठेवलेले नाहीत. त्यामुळे मूळ सौंदर्य कायम राहिले आहे. या वास्तूचे उद्‌घाटन लॉर्ड आयर्विन व्हाईसरॉय यांनी १९२९ मध्ये केल्यानंतर त्यांचेच नाव देण्यात आले.

या काळात ही इमारत प्रशासकीय काम, सचिवालय, विधानसभा यासाठी होती. त्यास राजाराम असेम्ब्ली चेंबर्स म्हणून ओळखले जात होते. म्हणूनच आजही हा रस्ता असेम्ब्ली रोड म्हणून ओळखला जातो. इमारतीसभोवती उत्तम बाग व हिरवळ तयार केली होती. मागील बाजूस मोगल पद्धतीचे भौमितिक रचना असलेले उद्यान होते. समोरील भागात कृषी देवतेचे मंदिर बांधले होते. त्याच ठिकाणी एम्फी थिएटर व मांडव उभे करण्याची जागा होती. आज यांपैकी उद्यान, मंदिर, थिएटर या बाबी अस्तित्वात नाहीत.

हेही वाचा- मीच लढणार यावर एखादा ठाम राहिला, तर दुसरा दुखवण्याची संधी अधिक 
 

१९ नोव्हेंबर १९२९ रोजी या परिसरात भव्य प्रदर्शन भरवण्यात आले. प्रदर्शनात शेतीसाठी यंत्र, अवजारे, साधने, खत, बियाणे, पोल्ट्री, कुटिर उद्योग, सहकार, पशुधन, कीड नियंत्रण, दूध व्यवसाय, जमीन मशागत, ग्रामीण आरोग्य विकास, वन उपज, खडक आणि माती, व्यापार, विणकाम आणि सिंचन साधने समजून घेण्यासाठी तात्पुरता हौद केला होता. अशी मांडणी या संग्रहालयात केली होती. एका भव्य हॉलची रचना पेंटिंग आणि कला यांच्या मांडणीसाठी होती.  शाळेतील अभ्यासक्रमात शेती हा विषय नव्हता. त्यासाठी छत्रपती राजाराम महाराज यांनी याच ठिकाणी स्वतंत्र शेती विद्यालय सुरू केले होते. अशी शाळा सर्व पेठांमध्ये व्हावी, अशी अपेक्षा होती.

विकासातील महत्त्वाचे केंद्र 
आज याच वास्तूमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय सुरू असून, काही बदल केले आहेत. नव्याने विस्तारीकरण केले असून, मूळ वास्तूशी सुसंगत ठेवण्याचा प्रयत्न झाला आहे. आज स्वराज्य भवन म्हणून ही इमारत ओळखली जात असली तरी कोल्हापूरच्या विकासातील महत्त्वाचे केंद्र ठरले आहे. वास्तुचा पूर्व इतिहास आजच्या आणि पुढच्या पिढीला समजावा म्हणून तो इथे प्रदर्शन करण्याबरोबरच वारसास्थळ म्हणून टिकविण्याचा कटाक्षाने प्रयत्न झाला पाहिजे.

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: heritage of kolhapur Irwin Agricultural Museum information by uday gaikwad