कोल्हापुरातील जुन्या राजवाड्याचे वैभव!

Heritage of Kolhapur old palace information by uday gaikwad
Heritage of Kolhapur old palace information by uday gaikwad

कोल्हापूर : छत्रपतींचे तख्‍त, कुलदैवत भवानी, आजही दिमाखात फडकत असलेला स्वराज्याचा भगवा ध्वज, मराठा राजवटीची राजधानी असलेल्‍या राजवाड्याच्‍या वास्तूमध्ये महाराज छत्रपतींच्या परंपरागत तखताला मुजरा करतात तेव्हा ‘छत्रपती महाराजोंका ताज त्खत दायमा सर सब्जता, बाण द्रक्षान रही जियो, महाराज छत्रपती हिंदुपद पातशहा’अशी ललकारी घुमते, ते महाराष्ट्रातील हे एकमेव ठिकाण आहे. कोल्हापुरात वारसास्थळ म्हणून त्याला अनेक महत्त्‍वाचे पैलू आहेत, ते समजून घेऊन जपले, मिरवलेच पाहिजेत.
 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत १६५९ च्या सुमारास कोल्हापूर मराठ्यांच्या ताब्यात आले. १७३१ मध्ये कोल्हापूर स्वतंत्र झाल्यानंतर १७८२ मध्ये राजधानी पन्हाळ्यावरून कोल्हापूरला आणली. त्याच दरम्यान जुन्या राजवाड्याची इमारत १५ लाख रुपये खर्च करून बांधण्यात आली. अंबाबाई मंदिराच्या आग्नेय दिशेला हा दुमजली वाडा सहा चौक असलेला साध्या पद्धतीने बांधलेला आहे.


मोठ्या दरवाजाच्या दोन्ही बाजूला व्हरांडा नी खोल्यानंतर उंबरा ओलांडून आत मधल्या मोठ्या चौकात चार नक्षीदार अशा भव्य खांबांवर काचेचे छत, झुंबर आणि गॅलरी राजवाडयाचे वैभव इथे नजरेस भरते. दगडी चौथऱ्यावर असलेले खांब चौकाला खुलेपणा देतात.समोर छत्रपतींचे कुलदैवत भवानीचे मंदिर आणि देवघर आहे. डाव्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचे तख्त व विद्यमान छत्रपतींचे तख्त आहे. याच चौकात दरबाराचे कामकाज होत असे.


दक्षिणेस चौकात हौद असून, मोठ्या दगडी कासवाच्या पाठीवर मंदिर आहे. त्या समोरचे दालन ओलांडून इंदुमती हायस्कूलमधील चौक लागतो. त्यानंतर प्रांत कार्यालय असलेल्या चौक व पोलिस स्टेशन असलेला चौक असे सहा चौक असलेला राजवाडा प्रत्येक चौका सभोवती दालने असलेला आहे. सध्याच्या पोलिस स्टेशनमध्ये  टांकसाळ व खजिना खोली होती. आजही तेथे गणपती बसवला जातो. पश्‍चिमेच्या दिशेने राजाज्ञा वाड्याकडे जाणारा रस्ता आहे.

आजच्या पोलिस स्टेशनपासून शेतकरी संघ किंवा त्या काळातील खरडेकर वाड्या (सध्या सरलशकर भवन )पर्यंत राजवाड्याच्या फरास खाना होता. त्या दरम्यान अंबाबाई मंदिराकडे जाणारा दरवाजा होता. ही इमारत १८१३ मध्ये सदिल्ला खानाने केलेल्या आक्रमणात आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.


या परिसरात संस्थानाची हुजूर ट्रेझरी, हुजूर खासगी, जुने दप्तर, दप्तरदार व नोंदणी कार्यालय, लष्‍कर व धान्यविषयक कार्यालये होती. उत्तर बाजूला आजची शेतकरी संघाची इमारत ही कार्यालयाची होती. त्या नंतर नगारखाना व राजाराम कॉलेजची इमारत आहे. नगारखाना ही इमारत पाच मजली असून, काळ्या फरसबंदी दगडातील उत्कृष्ट असा भारतीय मध्ययुगीन वास्तू शिल्पाचा नमुना आहे. बुवासाहेब महाराजांनी १८२८ ते१८३३ च्या दरम्यान पाच लाख रुपये खर्च करून ही इमारत बांधून एक मानचिन्ह प्रस्थापित केले. दोन्ही बाजूला हत्ती बांधण्याची जागा असून, दुसऱ्या मजल्यावर नगारखाना आहे. छत्रपतीची वाड्यात ये जा होताना इशारेवजा चौघडा वाजत असे.


तिसऱ्या मजल्यावरील गुळगुळीत काचेसारख्या भिंती असलेले दालन हे आरसा महाल म्हणून ओळखले जाते. सर्वात वर भगवा ध्वज आहे. आतील रिकाम्या चौकात खेळाडूंचा कीर्ती स्तंभ आहे. पूर्व बाजूला पागा, त्यामागे महाराणी लक्ष्मीबाई विद्यालय असून, त्याकडे जाणाऱ्या कमानी दरम्यानची इमारतही उत्कृष्ट स्थापत्य नमुना आहे. उत्तरेकडील नगारखाण्याच्या आवाजाचा त्रास राजाराम कॉलेजला होवू नये म्हणून हा नवा नगारखाना वाड्यासमोर बांधला. तो थेट रविवार वेशीकडून येणाऱ्या मार्गासाठी असावा. दक्षिणेला चव्हाण, कागलकर वाडा (सध्या भवानी चेंबर) आणि त्याला लागून मोतीबाग तालीम आहे. त्यामागे गुरुमहाराजांचा वाडा असा हा परिसर आहे. आज फेरीवाले, इतर व्यावसायिक, जाहिरातींचे फलक, पार्किंग, वीज वाहिन्या यामुळे विद्रूपीकरण झाले आहे. वारसास्थळ म्हणून त्या सर्व बाबी काढूनच टाकल्या पाहिजेत. रंगरंगोटी, देखभालही आज केली जाते. मात्र राज्य सरकारने त्याला नियमित संरक्षण व संवर्धन करण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे.

संपादन- अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com