
‘माझा उपजनिपज या बंगल्यातच झाला आहे. तेव्हा हा बंगला विद्यामंदिर झाले पाहिजे. सगळ्यापेक्षा या जागेचा मला फार अभिमान आहे.’’ असे या वास्तूविषयी छत्रपती शाहू महाराजांनी म्हटले आहे.
कोल्हापूर: कोल्हापूरचा कायापालट करण्याबरोबरच सामाजिक परिवर्तनाची बीजे रुजवणाऱ्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जन्म ठिकाणाबाबत उत्सुकता असणे, साहजिकच आहे. कागलच्या घाटगे या जनक घराण्यातील यशवंतराव ऊर्फ बाबासाहेब हे व्यक्तिमत्त्व दत्तक म्हणून छत्रपती घराण्यात आले. कसबा बावड्याच्या कागलवाडी नावाने ओळखल्या जाणाऱ्या परिसरात लक्ष्मी विलास पॅलेस ही वास्तू म्हणूनच वारसास्थळ ठरली आहे.
नदीच्या लगत थोडे उंचावर असलेल्या या परिसरात कौलारू, मजला नसलेली ही प्रशस्त इमारत वाड्यासारखी आहे. अर्ध गोलाकार व्हरांड्याला षटकोनी आकाराचे खांब, त्याच आकाराला जोडणाऱ्या भव्य खिडक्या आणि मोठे दरवाजे असलेले अर्ध गोलाकार दालन आहे. पश्चिमेकडून पोर्चमधून या दालनात प्रवेश करता येतो. त्यामागे तीन-चार पायऱ्यांवर पुन्हा एक दालन तिन्ही बाजूला दरवाजे आणि खिडक्या असणारे आहे. ही खोली शाहू महाराजांचे जन्म ठिकाण आहे. डाव्या बाजूला एक मोठे दालन आणि उजव्या बाजूस इतर तीन-चार मोठी दालने असणारी जोड इमारत आहे. यात कुस्तीच्या आखाड्याची खोली आहे. या इमारतीचे प्रवेशद्वार लाकडी मंडप असलेले आहे. मुख्य इमारतीच्या आधी लागते. या परिसरात इतर आणखी तीन इमारती असून, त्या या पॅलेसचा भाग आहेत.
हेही वाचा- 22 अधिविभाग अधिक सक्षम करणे आवश्यक ; ना पुरेसे शिक्षक, ना बजेट
ही इमारत नेमकी कधी बांधली, याचा तसा तपशील मिळत नाही. छत्रपती शाहू महाराजांचे आजोबा राजाराम महाराज यांना राजवाड्याच्या बाहेर शिक्षण मिळावे, म्हणून हा बंगला बांधला होता. तो नंतरच्या काळात कागलकर घाटगे यांना देण्यात आला. २६ जून १८७४ रोजी यशवंतराव यांचा जन्म झाला. १८७६ मध्ये त्यांचे बंधू पिराजीराव यांचा जन्म झाला. अवघ्या एका वर्षात १८७७ मध्ये त्यांच्या मातोश्रींचे निधन झाले आणि २० मार्च १८८६ रोजी त्यांचे वडील जयसिंगराव यांचे निधन झाले. यशवंतराव व पिराजीराव यांच्यातील भावांचे नाते अगदी सुरवातीपासून शेवटपर्यंत जवळकीचे व आदर्श राहिले.
हेही वाचा- राधानगरीत ऊर्जा कार्यक्षम ग्रामपंचायत -
१७ मार्च १८८४ रोजी चौथ्या शिवाजी महाराजांच्या पत्नी महाराणी आनंदीबाई राणीसाहेब यांनी यशवंतरावांना दत्तक घेतले आणि ते छत्रपती शाहू म्हणून ओळखले जाऊ लागले. केवळ दहा वर्षांपेक्षा कमी काळ या वास्तूत यशवंतरावांना वास्तव्य करता आले. पुढे कागलकरांकडून तो परत महाराजांनी आपल्याकडे घेतला. १९६२ मध्ये हे ठिकाण राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित झाले. राज्य सरकारने पुरातत्त्व वास्तूबाबत कोणतीही माहिती इथे उपलब्ध नाही आणि ती प्रदर्शित केलेली नाही.
राज्य शासनाने संरक्षित स्मारक असा दर्जा दिल्यानंतर या वास्तूचे पुनरुज्जीवन करण्याचे काम सुरू झाले. हे ठिकाण महाराजांच्या आठवणी, वस्तू, छायाचित्रे, पेंटिंग अशा बाबींनी कितीही सजवले, तरी त्यांच्या विचारांचा अभाव राहणारच आहे. अनेक वास्तूंच्या रूपाने कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहूंचे कार्य स्थायी, शाश्वत स्वरूपात कायम आहे. या परिसरात कोल्हापूरच्या इतिहासाशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण शिलालेख, मूर्ती, शिल्पे संग्रहित करून ठेवली आहेत. यापूर्वी हे शिलालेख त्यांच्या अनुवादासह ठेवले होते. मात्र, अलीकडे ते रिकाम्या पटांगणात ठेवले आहेत. त्यामुळे ते खराब होतील, असे नसले तरी ते योग्य पद्धतीने संग्रहित ठेवणे आवश्यक आहे.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज सांगतात...
‘‘माझा उपजनिपज या बंगल्यातच झाला आहे. तेव्हा हा बंगला विद्यामंदिर झाले पाहिजे. सगळ्यापेक्षा या जागेचा मला फार अभिमान आहे.’’ असे या वास्तूविषयी छत्रपती शाहू महाराजांनी म्हटले आहे. या बंगल्यातील तालीम बुजवावी का, याबाबत महाराजांनी ‘शरीराची आणि बुद्धीची वृद्धी व्हावी, म्हणून ही तालीम तशीच राहू दे. मी येथे काही विद्यार्थी ठेवणार आहे. माझ्या आईने मला येथे जन्म दिला आहे. त्या दृष्टीने या वास्तूमध्ये काही फरक करायचा नाही. ही वास्तू माझे पवित्र श्रद्धास्थान आहे,’’ असेही त्यांनी सांगितले होते. या वारसास्थळाबद्दल यापेक्षा वेगळे काही सांगण्याची गरज नाही.
संपादन- अर्चना बनगे