
पैलवानांच्या खुराकाबरोबर येथे आखाड्यातील मातीलाही खुराक दिला जातो.
कोल्हापूर : जुना राजवाड्याच्या उत्तरेकडील मोतीबागेचा परिसर कुस्तीचा सराव करणाऱ्या मल्लांना तालीम म्हणून बांधून देण्यात आला. कोल्हापुरात कुस्ती खेळाला राजाश्रय मिळाला. थेट हेलसिंकीला झालेल्या ऑलिम्पिकमध्ये मल्ल कास्य पदकाचे मानकरी ठरले. हा वारसा कोल्हापूरपुरता मर्यादित नव्हे तर जगाला गवसणी घालणारा आहे.
पंजाबमध्ये विकसित झालेला हा खेळ महाराष्ट्रात विकसित करण्याचे श्रेय छत्रपती शाहू महाराजांना आहे. १८९४ मध्ये संस्थानाची सूत्रे हातात घेतल्यानंतर १८९५ मध्ये जुन्या राजवाड्यात मोतीबाग तालीम दसऱ्याच्या मुहूर्तावर सुरू केली. त्यावेळी स्वतःच्या हातांनी लावलेल्या फलकावर ‘पहिली शरीर संपत्ती, तोच पुण्यवान’ अशी वाक्ये होती.
छत्रपती शाहू महाराजांनी स्वतःच्या खासगीतून खाणे, खुराक, निवास व्यवस्था, मालिश, वस्ताद, जेवण करणारा आचारी असा सगळा खर्च देऊन कल्लू गामा, बाबू बिरे, म्हादू हांडे यांना मोतीबाग तालमीत आश्रय दिला होता. देशाच्या वेगवेगळ्या भागातून मल्ल येथे प्रशिक्षण आणि सरावासाठी रहातात. त्यांचा व्यायाम, प्रशिक्षण, सराव, खुराक या साऱ्याची तरतूद छत्रपती शाहू महाराजांनी केली. जुन्या राजवाड्याच्या परिसरात अशी तालीम करण्याबरोबरच मैदानही फरासखाना व राजवाड्याच्या दरम्यान रिकाम्या जागेत (सध्याच्या पोलिस स्टेशनच्या समोरील परिसर) भरवले जात होते.
हेलसिंकीच्या ऑलंपिकमध्ये खाशाबा जाधव यांनी कास्य, माणगावे यांना चौथे स्थान मिळाले. त्याचं कौतुक कोल्हापूरला आहेच. भवानी मंडपात नगारखान्याच्या कमानीतून आत आल्यानंतर विजयश्री मुद्रेत असलेला मल्ल असा स्मृतीस्तंभ उभारला आहे. जुन्या राजवाड्यातील भवानी मंदिरापासून डाव्या कोपऱ्यात मोतीबाग तालमीचा दरवाजा आहे. पैलवान रहाण्याची सुविधा, आखाडा परिसर एकत्र असून मधल्या चौकात भवानी देवीचे उत्कृष्ट असे छोटे मंदिर आहे. त्यांच्या बाजूवर असलेली शिल्पे आज रंग लावल्याने पूर्ण बदलून गेली आहेत. पारंपरिक मातीचा आखाडा आजही सराव व व्यायाम करताना वापरात आहे. आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धा मॅटवर होत असून, नियमही बदलले आहेत. त्यानुसार प्रशिक्षण दिले जाते.करेल फिरवणे, डम्बेल्स, लाकडी फळीवर पैलवान बसवून त्याला आखड्यातून ओढणे, चपाटी मारणे, जोर, बैठका, रोपवर चढणे असा व्यायाम आणि कुस्तीमधले सर्व डाव येथे नियमित शिकवले जातात.
छत्रपतींच्या आश्रयाने ही परंपरा जपली. हे सारे पैलवान दसऱ्याच्या सीमोल्लंघनाला फेटे बांधून लवाजम्यामध्ये सहभागी होवून ती परंपरा जपतात.
हेही वाचा- महापालिकेच्या निवडणुकीत गटबाजी संपवून विधानसभेच्या पराभवाचे उट्टे शिवसेना काढणार का? -
एका तालमीत आज दोन स्वतंत्र आखाडे आहेत. जुने आणि नवे यातील मेळ घालत कुस्ती जपली असली तरी स्वच्छता, देखभाल, डागडुजी, निवास व्यवस्था यात अघळपघळपणा दिसतो. बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना या तालीमसंस्कृतीबद्दल कुतूहल असते. त्यासाठी वारसा जपत काही सकारात्मक बदल आवश्यक आहेत.
थंडाई अन् रबडी...
व्यसन, गुन्हेगारीपासून अलिप्त राहून बदाम, दूध, खारीक, तूप, फळे, लोणी नियमित आहारात घेणारे पैलवान येथे लस्सी किंवा थंडाई बनवतात. एका कुंडात लिंबाच्या लाकडाचा दांडा फिरवून तीळ, खसखस, जायफळ, बदाम, धने, वेलदोडे, बडीशेप घालून दुधात वाटलेली थंडाई हा इथला विशेष पदार्थ आहे. रबडीसाठी मोठ्या कढईत दूध उखळत ठेवून त्यात आरासट, साखर, साबुदाण्याचे पीठ, मैदा घालून जाड खीर बनवली जात असे. कमळ फुले आणि मोगली बेदाणे रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी पाणी पित. मोरावळाबरोबर सोन्याचे वरख आणि जिलेबी असा खुराक महाराजांच्या खासगीतून खर्च केला जात असे.
मातीलाही खुराक
पैलवानांच्या खुराकाबरोबर येथे आखाड्यातील मातीलाही खुराक दिला जातो. वर्षातून एकदा कोकणातून आणलेल्या मातीला मऊपणा यावा, यासाठी तेल, तूप, दही, ताक, काव, लिंबू, हळद घालून घुसळले जाते. मातीचा रंग यामुळेच येतो आणि अंगाला रंग आणि देखणेपणा आणतो. वर्षातून एकदा कंदुरी (सामूहिक जेवण) मातीला शांतता लाभावी, अशा समजातून केली जाते.
संपादन- अर्चना बनगे