कोल्हापूर विमानतळावर नाईट लॅंडिंग सुविधेसाठी दिल्लीची उच्चस्तरीय समिती भेट देणार

निवास चौगले
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

कोल्हापूर विमानतळाच्या प्रलंबित मागण्या व नवीन विमानसेवा सुरू करण्याबाबत लवकरच उच्चस्तरीय समिती कोल्हापूर विमानतळाला लवकरच भेट देत असल्याची माहिती अरविंद सिंह यांनी खासदार मंडलिक यांना दिली. 

कोल्हापूर ः येथील विमानतळावर नाईट लॅंडिंगची सुविधा, कोल्हापूर-मुंबईसाठी सकाळच्या सत्रातील विमान सेवेसह अहमदाबाद व जयपूर या मार्गावर नवीन विमानसेवा सुरू व्हावी, यासह विविध मागण्यांसदर्भात खासदार संजय मंडलिक यांनी भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे अध्यक्ष अजित सिंह यांची त्यांच्या दिल्ली येथील कार्यालयात भेट घेऊन सविस्तर निवेदन देऊन चर्चा केली. 
यावेळी झालेल्या चर्चेनुसार कोल्हापूर विमानतळाच्या प्रलंबित मागण्या व नवीन विमानसेवा सुरू करण्याबाबत लवकरच उच्चस्तरीय समिती कोल्हापूर विमानतळाला लवकरच भेट देत असल्याची माहिती अरविंद सिंह यांनी खासदार मंडलिक यांना दिली. 
कोल्हापूर विमानतळाच्या नाईट लॅंडिंगचा प्रश्न बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असून, कोल्हापूर येथे नाईट लॅंडिंग सुविधा सुरू झाल्यास दररोजच्या उड्डाणांची संख्या वाढणार आहे. विमानतळ टर्मिनल इमारत, रनवे सबस्टेशनचे काम तातडीने पूर्ण होऊन प्रवाशांकरिता आवश्‍यक सोयी-सुविधा पुरविणे गरजेचे असल्याचे खासदार मंडलिक यांनी निदर्शनास आणून दिले. 
कोल्हापूरहून मुंबई येथे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त असून, या प्रवाशांच्या सोयीकरिता सकाळच्या सत्रामध्ये विमान सेवा सुरू केल्यास मुंबई येथे लवकर पोहचून कामाचा निपटारा करून त्याच दिवशी परत येणे शक्‍य होणार आहे. सकाळच्या सत्रातील विमानसेवेमुळे कोल्हापूर येथील व्यापार, उद्योगधंदे व पर्यटनामध्ये वाढ होऊन कोल्हापूरसारख्या टॅलेंट समृद्ध क्षेत्रातील आयटी आणि आयटीच्या व्यवसायासाठी नवीन दरवाजे उघडणार आहेत, असेही श्री. मंडलिक यांनी सांगितले. 
कोल्हापूरची उत्तर भारताशी कनेक्‍टिव्हीटी वाढवण्यासाठी अहमदाबाद व जयपूर या दोन शहरांसाठी तातडीने नवीन विमानसेवा सुरू करावी, अशी मागणीही श्री. मंडलिक यांनी केली. 
बैठकीस विमानतळ प्राधिकरणाचे विभागप्रमुख कुमार पाठक, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे संचालक विज्ञान मुंडे हे उपस्थित होते.

संपादन ः यशवंत केसकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A high level committee from Delhi will visit Kolhapur Airport for night landing facility