विद्यापीठाच्या प्रश्‍नांबाबत मुंबईत १५ ला बैठक

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 10 October 2020

उदय सामंत; अंतिम वर्ष परीक्षांचा घेतला आढावा

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ सुवर्णमहोत्सव निधी, बाळासाहेब देसाई अध्यासन यासारखे २५ महत्त्वाचे प्रश्‍न प्रलंबित आहेत. त्यांच्या सोडवणुकीसाठी मुंबईत येत्या गुरुवारी (ता. १५) बैठक घेण्याची ग्वाही उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आज विद्यापीठ प्रशासनाला दिली. 

विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा १७ ऑक्‍टोबरपासून सुरू होणार आहेत. त्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी श्री. सामंत यांनी बैठक घेतली. त्यात विद्यापीठाच्या प्रलंबित प्रश्‍नांवरही चर्चा झाली. विद्यापीठ सुवर्णमहोत्सव निधी, बाळासाहेब देसाई अध्यासन, विद्यापीठाचा उड्डाणपूल, ई सेवार्थ पदे असे सुमारे २५ प्रश्‍न बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित आहेत. या प्रश्‍नांची सोडवणूक करण्यासाठी ही बैठक होईल. यात संबंधित शासकीय विभागाचे अधिकारी, विद्यापीठ प्रशासनातील अधिकारी, कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के उपस्थित असतील, असेही सामंत यांनी सांगितले.

हेही वाचा- ‘चंद्रकांत पाटील यांना सहकार, महसूल, सार्वजनिक बांधकाम खाते समजलेच नाही' -

अंतिम वर्ष परीक्षेच्या तयारीबाबतची माहिती मंत्री सामंत यांनी घेतली. मुंबई आणि सोलापूर येथील विद्यापीठांच्या परीक्षांमध्ये अनेक घोळ झाले. तसे येथे होऊ नयेत, यासाठी विशेष काळजी घेण्याची सूचना त्यांनी दिली. तांत्रिक बाबींची पूर्ण तयारी करून मगच परीक्षेला सामोरे जा, असे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. परीक्षेच्या काळात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी काय केले पाहिजे, पोलिस यंत्रणेने काय केले पाहिजे, याबाबतच्या सूचना त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. सीमा भागातील शैक्षणिक संकुलाच्या तयारीचा आढावाही त्यांनी घेतला


बैठकीला खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर, जिल्हाधिकारी दौलत देसाई, जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, कुलसचिव विलास नांदिवडेकर, प्रभारी परीक्षा नियंत्रक गजानन पळसे यांच्यासह व्यवस्थापन परिषद, अधिष्ठाता मंडळाचे सदस्यही उपस्थित होते.

संपादन -अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Higher and Technical Education Minister Uday Samant information 15th meeting in Mumbai on university issues