याच्या संकल्पनेतून बांधल्या गेल्या कोल्हापुरातील ऐतिहासिक इमारती

Historical buildings in Kolhapur were built from this concept
Historical buildings in Kolhapur were built from this concept

कोल्हापूर : प्रत्येक शहराची ओळख तिथल्या एखाद्या वास्तूशी जोडली जाते. जसं मुंबईला छत्रपती शिवाजी टर्मिनस, पुण्याला शनिवारवाडा, तसं कोल्हापूरसाठी नवा राजवाडा. नव्या राजवाड्याच्या बांधकामात भारतीय आणि युरोपियन शैलीचा मिलाफ आपल्याला दिसून येतो. यालाच इंडो-सार्सानिक शैली असं म्हटलं जातं. याच धाटणीनं बांधल्या गेलेल्या अजूनही काही इमारती कोल्हापुरात आहेत आणि वैशिष्ट्य म्हणजे या सगळ्या इमारती एकाच व्यक्तीनं घडवलेल्या आहेत, ती म्हणजे मेजर चार्ल्स मॅंट. आधुनिक कोल्हापूरचा हा शिल्पकार मात्र आपल्याला सहसा माहीत नसतो. 
मेजर चार्ल्स मॅंट हा तेव्हाच्या ब्रिटिश इंडियात सनदी अधिकारी असणाऱ्या जॉर्ज मॅंटचा मुलगा. चार्ल्स मॅंटचा जन्म 1840चा, पुण्यातला. तेव्हाच्या पद्धतीप्रमाणे शिक्षण इंग्लंडमध्ये घेऊन तो 1859 मध्ये भारतात परतला आणि बॉम्बे इंजिनिअर्समध्ये त्याने आपली कारकीर्द सुरू केली. 
महाराष्ट्रातले सगळ्यात मोठे संस्थान म्हणून कोल्हापूर संस्थानचा ब्रिटिशांशी वारंवार संबंध येई. यातूनच त्यांच्यात चांगले संबंधही निर्माण झाले. कोल्हापुरात महाविद्यालय सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आणि त्यासाठी नवीन इमारत बांधण्याची जबाबदारी घेऊन मेजर चार्ल्स मॅंट कोल्हापुरात आला. जुन्या राजवाड्याला लागून असलेली मोकळी जागा कॉलेजला दिली होती. वास्तुशिल्पाचा उत्तम नमुना असलेला नगारखाना आणि जुन्या धाटणीच्या राजवाड्याला शोभून दिसेल अशी कॉलेजची इमारत बांधण्याची जबाबदारी आता मॅंटवर होती. त्याने अशा प्रकारे राजाराम कॉलेजची रचना केली, की ही नवी प्रशस्त आणि हवेशीर इमारत जुन्या राजवाड्याचाच भाग वाटावी. यामुळे कोल्हापूर दरबारची मेजर मॅंटवर विलक्षण मर्जी बसली. त्याच्याकडून इतरही काही इमारती बांधून घेण्याचे ठरले. कोल्हापूरला सरकारी दवाखाना 1851 मध्येच उघडलेला होता; पण तो आता अपुरा पडत होता. म्हणून त्याच जागी नवीन दवाखाना (सध्याचे सीपीआर) बांधण्याचे ठरवले. त्याची रचना पूर्णतः मेजर मॅंटने केली होती. सरकारी कामे वेळच्या वेळी आणि ठरलेल्या बजेटमध्ये होण्याचा तो काळ होता. साडेतीन लाख रुपये मंजूर असताना दवाखान्याची इमारत केवळ तीन लाख रुपये खर्चून नियोजित वेळेपूर्वीच पूर्ण झालेली होती. कोल्हापूरच्या टाउनहॉलची रचनाही मॅंटचीच. आपल्याला अपरिचित असणारं मॅंटचं अजून एक काम म्हणजे फ्लोरेन्समधली छत्रपती राजाराम महाराजांची समाधी. 
मॅंट कोल्हापुरात वेळोवेळी येऊन मुक्काम करत असे. त्याची आणि छत्रपती शाहू महाराजांचे जनक पिता आबासाहेब घाटगे यांची चांगली मैत्री होती. 
कोल्हापूरच्या विकासाच्या दृष्टीने 1870 पासून प्रयत्न सुरू झाले. याचाच एक भाग म्हणून शहराची जुनी तटबंदी पाडून त्याबाहेर शहराची वाढ करणे हेही होते. गजबजलेल्या भागात असणाऱ्या जुन्या राजवाड्याऐवजी मोकळ्या आणि प्रशस्त भागात कोल्हापूरच्या छत्रपतींसाठी नवीन राजवाडा बांधण्याचे ठरले आणि अल्पवयीन छत्रपतींसाठी रिजंट म्हणून काम करणाऱ्या आबासाहेब घाटगेंनी त्याची रचना करण्याचं काम विश्वासानं मॅंटवर सोपवलं. हे काम करताना मॅंटने वास्तुशिल्पाचा एक बेहतरीन नमुनाच उभा करून दाखवला. कोल्हापूरच्या मातीतल्याच काळ्या दगडाचा वापर करत मुघल, जैन आणि ब्रिटिश अशा शैलींच्या मिलाफातून त्याने सुरेख आणि रेखीव असा नवीन राजवाडा उभारला. 
मेजर मॅंटने रचना केलेले सर्वात मोठे वास्तुशिल्प म्हणजे बडोद्याचा लक्ष्मीविलास पॅलेस. याशिवाय भारतात दरभंगा, सुरत या ठिकाणीही उत्तमोत्तम वास्तू मॅंटने बांधल्या. या गुणी अधिकाऱ्याला आयुष्य मात्र फारच कमी लाभले. काही नैराश्‍यातून आत्महत्या करून त्याने आपले आयुष्य संपवले; पण त्याच्या प्रतिभेचा आविष्कार असणाऱ्या कोल्हापुरातल्या या देखण्या वास्तू पुढची काही शतकं तरी नक्की त्याची आठवण आपल्याला करून देत राहतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com