इतिहास संशोधक डॉ. रमेश जाधव सरांचे असे आहेत संचारबंदीतले दिवस... 

संदीप खांडेकर
शनिवार, 4 एप्रिल 2020

इतिहास संशोधक प्रा. डॉ. रमेश जाधव मूळचे कोल्हापूरचे. ताराबाई रोडवर सरांच्या पूर्वजांचा मोठा वाडा. सरांचा अध्यापनाचा विषय समाजशास्त्र अन् इतिहासावर प्रेम बालपणापासून. न्यू काॅलेजमधून ते २००८ला सेवानिवृत्त झाले. आज सरांच्या घराची बेल वाजवली. सरांनी घरातील सात हजार पुस्तकांच्या ग्रंथालयात बसण्याचा ‌निर्देश केला. सरांच्या लाकडी टेबलवर लिखाणाचे काही कागद होते. 'सर, दिनक्रम काय असतो हल्लीचा?,' असं विचारताच सरांनी हातावर लिखाणाची कागदं ठेवली. 'शिवचरित्र' लिहितोय, सर बोलले. निवृत्तीनंतर एक तप होऊनही सरांचा देह अनोख्या ऊर्जेने व्यापलाय.

डॉ. जाधव सरांचे आजोबा दादोबा जाधव सत्यशोधक विचारधारेचे. वडील बाळकृष्ण जाधव जिल्हा परिषदेत अकाउंटंट होते. आई चौथीपर्यंत शिकल्या होत्या. शैक्षणिक वारसा ‌जाधव घराण्यात पिढ्यान् पिढ्या आहे. अध्यापनाच्या क्षेत्रात सरांची हातोटी विद्यार्थ्यांनी अनुभवली आहे. त्यांच्या पीएच.डी.चा शोधप्रबंध महात्मा फुले व राजर्षी छत्रपती शाहू महाराजांवर आधारित होता.‌ विद्यार्थ्यांना घडवत ते पुस्तके लिहीत राहिले. सेवानिवृत्तीनंतर त्यांची लेखणी थांबली नाही. 'शाहू गौरव ग्रंथ' व 'कर्मवीर भाऊराव पाटील' पुस्तके त्यांनी लिहिली. सरांच रोजच्या कामांचे टाईमटेबल ठरलेलं आहे. 

सरांचा दिवस पहाटे साडे पाचला उजाडतो. चहा घेऊन रंकाळा तलावापलिकडच्या ‌त्यांच्या फ्लॅटमध्ये चालत जातात. शिवचरित्र लिहिण्याची उर्मी त्यांना स्वस्थ बसू देत नाही. सात ते आठ चॅप्टर लिहून पूर्ण झाले आहेत. एक वाजेपर्यंत लिखाणाचं काम आटोपून सर ताराबाई रोडवरच्या घरात जेवणासाठी परततात. कोरोनाने त्यांचे टाइमटेबल बिघडवलंय. फ्लॅटकडे जाणं थांबल्याने सर उठल्यावर टेरेसवरच वाॅकिंग करतात. छोट्या झाडांना पाणी घालून लिखाणावर जोर देतात. शिवचरित्राचं साहित्य फ्लॅटमधून घरात आणलं गेलंय. 
हार्डीची इंग्रजी पुस्तक सरांच्या ग्रंथालयात ठाण मांडून आहेत. 'फार ‌फ्राॅम मॅडिंग क्राऊड,' विल ‌ड्युरंट‌चे 'दि स्टोरी आॅफ सिव्हिलायझेशन,' व‌ 'दि स्टोरी ऑफ फिलाॅसाॅपी,' 'इंटरप्रिटेशन्स ऑफ लाईफ,' पुस्तकांचे वाचन पुन्हा पुन्हा करावे, असे ते सांगतात. सर एका वर्तुळात रमणारे नाहीत. विविध विषयांच्या व्यासंगाने त्यांच्या वाचनाला अनेकांगी पदर आहेत. 

डॉ. एम. एन. श्रीनिवास यांचे 'दि रिमेंम्बर्ड व्हिलेज,'  
वि. स. खांडेकरांचे 'एका पानाची कहाणी,' आत्मचरित्र जयवंत दळवी यांचे 'सारे प्रवासी घडीचे,' रंगनाथ पठारेंचे 'सातपाटील कुलवृत्तान्त,' पाडसचे 'मार्जोरी राॅलिंग्ज,' ऋषी कपूरचे 'खुल्लमखुल्ला,' तर दिलीपकुमारचे 'दि‌ सबस्ट्न्स अॅन्ड दि‌ शॅडोज,' पुस्तके वाचण्याच्या वेळा त्यांनी ठरवल्या आहेत. खुशवंत सिंगांचं 'ट्रूथ, लव्ह अॅन्ड व लिटल मलाईस,' व‌ सरदार कुलवंतसिंग कोहलींच्या 'ये है मुंबई मेरी जान,' पुस्तकांचा परामर्श त्यांनी थोडक्यात घेतला.‌ साहित्य व इतिहास आवडीचे विषय असल्याचे त्यांनी सांगितले. दत्ता हलसगीकर व बा. भ. बोरकर‌ यांच्या कविता त्यांना वाचायला आवडतात. 'सर, टी. व्ही.वरच्या मालिका पाहता का,' सरांच मनोरंजनाचं क्षेत्र जाणून घेण्याचा माझा प्रयत्न. 'फक्त बातम्या काही वेळ पाहतो. शिवचरित्र व शाहू महाराज यांच्या आयुष्यातील काही प्रसंग सांगण्याचा नातवंडांचा आग्रह असतो. रात्री हे काम ‌नेटाने करावे लागते,' सरांनी मोजक्या शब्दांत उत्तर दिलं. सरांचा निरोप घेऊन परतत होतो. सर मात्र टेबलवर शिवचरित्र लिहिण्यात गढून गेले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: History researcher Dr Ramesh Jadhav sir busy in research