
कोल्हापूर - मिरजकर तिकटी म्हणजे मंगळवार पेठेच्या तोंडाला असलेला मिरजकर यांचा वाडा. वाडा चौसोपी, दगडाचा. दगडी चौकट. उंबराच्या झाडाचा भक्कम दरवाजा. त्याला एक दिंडी दरवाजा. वाड्याच्या चौकात दगडी फरशी. तिन्ही बाजूंनी ओवऱ्या. यात ओळीत ५० हून अधिक सुवर्ण कारागीर खाली मान घालून काम करत बसलेले आणि मिरजकर सावकार म्हणजे हरी बापू मिरजकर हे हुंडी म्हणजे आताच्या चेक, डीडीसारख्या व्यवहारात गुंतलेले. मिरजकरांची हुंडी इतकी विश्वासू आणि भरवशाची, की देशात कोठेही ती वटायची आणि संबंधिताला डोळे झाकून रक्कम मिळायची. अशा व्यवहारामुळे मिरजकर यांचे नाव देशात प्रसिद्ध आणि त्यांचा वाडा या तिकटीला म्हणून ‘मिरजकर तिकटी’ हेच नाव या परिसराला पडले.
तुतूची बागही मिरजकर तिकटीलाच
खासबाग, मंगळवार पेठ आणि बिनखांबी गणेश मंदिराकडून येणाऱ्या तीन रस्त्यांच्या या तिकटीला असलेला हा मिरजकरांचा वाडा कोल्हापुरातील असंख्य घडामोडींचा साक्षीदार ठरला. किंबहुना मिरजकर तिकटी म्हणूनच हा सारा परिसर ओळखला जाऊ लागला. रस्ता रुंदीकरणात या वाड्याचा बराचसा भाग गेला. मिरजकरांच्या पुढच्या पिढीने तेथे व्यापारी संकुल बांधले. आजही मिरजकरांची एक पिढी मागच्या बाजूस राहते.
मिरजकर तिकटी म्हणजे कोल्हापूरकरांच्या दृष्टीने मध्यवर्ती ठिकाण. जे काही महत्त्वाचे ते या मिरजकर तिकटीजवळच. कोल्हापुरातली पहिली सिनेमा टॉकीज मिरजकर तिकटीच्या पुढे फक्त एका वळणावर. आज तेथे गणेश मंगल कार्यालय आहे. खासबाग कुस्ती मैदानाचे एक गेट मिरजकर तिकटीलाच. तिकटीपासून अंबाबाई मंदिर आणि महाद्वार रोड केवळ हाकेच्या अंतरावर. कोल्हापुरातली १८५५ मध्ये बांधलेली पहिली धर्मशाळा मिरजकर तिकटीच्या विठ्ठल मंदिरातच. तुतूची बागही मिरजकर तिकटीलाच.
बिन ड्रायव्हरची एक रिक्षा चौकात फिरत राहायची
कळंबा तलावातून १२५ वर्षांपूर्वी नळ घालून गावात पाणी आणले त्या पाण्याचा सार्वजनिक हौद मिरजकर तिकटीलाच. साडेतीन रुपयांत मटणाचे ताट देणारे रविराज हॉटेल आणि कोल्हापुरात झालेल्या १८५७ च्या उठावाची स्मृती जागवणारा हुतात्मा स्तंभही मिरजकर तिकटीलाच. महापालिकेच्या चौकांच्या यादीत मात्र या तिकटीचे नाव नेताजी सुभाषचंद्र बोस चौक. पण मिरजकर तिकटी हे नावच अजूनही कोल्हापूरकरांच्या तोंडात. गणेशोत्सवात या मिरजकर तिकटीला बिन ड्रायव्हरची एक रिक्षा चौकातल्या हुतात्मा स्तंभाला फेऱ्या घालत रात्री उशिरापर्यंत फिरत राहायची. बिन ड्रायव्हरची रिक्षा एका विशिष्ट वेगात फिरते कशी, हे पाहायला लोकांची गर्दी उसळायची. अर्थात ही तांत्रिक करामत मिरजकर तिकटीच्या रिक्षावाल्यांची असायची.
मिरजकर तिकटीचा जुना थाट पुन्हा ताजातवाना होतो
अलीकडच्या काळात मिरजकर तिकटी आणि तिकटीवरचे शाहू तरुण मंडळ म्हणजे कोल्हापूरच्या सामाजिक चळवळीचे केंद्र झाले. देशभरात गाजलेल्या टोलविरोधी आंदोलनाची ठिणगी मिरजकर तिकटीलाच पडली. मंगळवार पेठेतील संयुक्त शिवजयंतीची सुरवात मिरजकर तिकटीला झाली. गणेश विसर्जन मिरवणुकीचा सेन्सिटिव्ह कोपरा म्हणून मिरजकर तिकटीची नोंद झाली. मिरजकर तिकटीपुढे मिरवणूक शांतपणे गेली की पोलिस खात्याने समाधानाचा सुस्कारा टाकायचा ही पद्धतच झाली. आता शिवजयंतीला मावळा ग्रुप या तिकटीला मोठ्या प्रमाणात शिवजयंती साजरा करतो आणि शिवकालीन नाटके पाहण्यासाठी कोल्हापूरकरांना मिरजकर तिकटीकडे खेचून आणतो. मिरजकर तिकटीचा जुना थाट पुन्हा ताजातवाना होतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.