दबंग स्टार सलमान खानने दत्तक घेतलेल्या गावातील घरांची लवकरच होणार पुनर्बांधणी 

अनिल केरीपाळे
Friday, 14 August 2020

गतवर्षी आलेल्या महाप्रलयकारी महापूरात खिद्रापूर गावाचे खूप नुकसान झाले.

कुरुंदवाड - बॉलिवुडचा दबंग स्टार सलमान खान याने दत्तक घेतलेल्या शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर गावातील महापूरात जमीनदोस्त झालेल्या घरांच्या पुनर्बांधणीच्या कामाला लवकरच सुरूवात होत असून यानिमित्ताने पूरग्रस्तांना हक्काचे घरकुल पुन्हा मिळणार आहे. या घरांच्या बांधणीसंदर्भात ऐलान फाऊंडेशन नवी दिल्ली व जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्यात सामंजस्य करार झाला आहे. पहिल्या टप्प्यातील घरांच्या बांधकामास दोनच दिवसात सुरुवात होत असल्याची माहिती सरपंच हैदरखान मोकाशी यांनी दिली.

गतवर्षी आलेल्या महाप्रलयकारी महापूरात खिद्रापूर गावाचे खूप नुकसान झाले. शेतीवाडीसह शेकडो घरंदारं पाण्याखाली राहिली. असंख्य घरं जमीनदोस्त झाल्याने लोक बेघर झाले. महापूर ओसरल्यानंतर जीवनावश्यक वस्तूंचा महापूर आला. अनेक समाजसेवी संस्था मदतीसाठी पुढे सरसावल्या मात्र भुईसपाट झालेल्या घराचा प्रश्न कसा सोडवायचा? घरांची पुनर्बांधणी कशी करायची? या विवंचनेत असणार्‍या पूरग्रस्तांना बॉलिवुडचा दबंग स्टार सलमान खान याने मदतीचा हात दिला. इचलकरंजी येथील युवा उद्योजक प्रतीक चौगुले हे सलमान खानचे निकटवर्तीय आहेत. त्यांच्या माध्यमातून खिद्रापूर येथील आपत्तीची माहिती सलमान खानला मिळाली. त्यानंतर सलमान खान याने ऐलान फाऊंडेशनला खिद्रापूरला भेट देण्यास सूचित केले. त्यानुसार, प्रतिनिधींनी पाहणी करुन घरांचा व अन्य परिसर विकासाचा आराखडा सादर केला. 

ऐलान फाऊंडेशन खिद्रापूरात जमीनदोस्त झालेली 70 घरं पुन्हा बांधून देणार असून त्यासाठी लाभार्थी निवडीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. 250 चौरस फूट आकाराची आरसीसी स्ट्रक्चर व शौचालययुक्त अशी घरं उभी राहणार आहेत. याबाबत फेब्रुवारी महिन्यात ऐलान फाऊंडेशन व जिल्हा परिषद यांच्यात सामंजस्य करार झाला. मार्च महिन्यात काम सुरु होणार. मात्र त्याचकाळात कोरोनाचा शिरकाव व लॉकडाऊनमुळे काम थांबले होते. या कामाला आता चालना मिळाली असून ऐलान फाऊंडेशन यांनी कामासाठी ठेकेदारही निवडला आहे.

हे पण वाचा - ‘सकाळ’ स्टिंग ऑपरेशन : अन्य रुग्णांचा हकनाक बळी  

पहिल्या टप्प्यांत सात घरांची उभारणी सुरु करण्यात येणार आहे. त्यानंतर उर्वरित घरांचे बांधकाम करण्यात येणार आहे. ऐलान फाऊंडेशन घरांसोबतच ऊर्दू माध्यमाची प्राथमिक शाळा व स्वच्छतागृह यांची उभारणी करुन देणार आहे. त्यादृष्टीने चर्चा सुरु आहे, असे सरपंच मोकाशी यांनी सांगितले. 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: houses will be rebuilt soon in kolhapur khidrapur village