
म्हाकवे : हळदी (ता. कागल, जि. कोल्हापूर) येथे अतिसाराच्या साथीने 175 रुग्ण बाधित झाले आहेत. त्यापैकी काही रुग्ण चिखली आरोग्य केंद्राच्या देखरेखीखाली तर मोठ्या संख्येने हमिदवाडा, हळदी, मुरगूड, कोल्हापूर येथे खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. हळदी येथील उपकेंद्रात पुरेशी जागा नसल्याने सरपंच श्रीमती मंगल गणपती भारमल यांच्या खासगी शेडमध्ये रुग्णांवर उपचार केले आहेत.
येथील नळ पाणीपुरवठा योजनेच्या नळांना अनेक ठिकाण गळती लागून गटारीतील पाणी या नळांमध्ये जाते. असे दूषित पाणी नळाला आल्याने येथील नागरिकांना या साथीची बाधा मोठ्या प्रमाणात झाली.
24 जुलैपासून अतिसाराची साथ सुरू झाली. गावातील रुग्णांची संख्या 175 असल्याचे आरोग्य अधिकारी डॉ. एस. जे. सावंत यांनी सांगितले. मात्र रुग्ण तीनशेहून अधिक असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
दूषित पाण्याबाबत दक्ष राहण्यासाठी चिखली आरोग्य केंद्राने 17 जुलै रोजी ग्रामपंचायतीला लेखी कळवले होते. त्यावर योग्य वेळी कार्यवाही न झाल्याने रुग्ण वाढू लागले. त्यांच्यावर येथील उपकेंद्रात उपचार करण्यात आले; मात्र रुग्णांची संख्या इतकी वाढली की रुग्णांना हमिदवाडा, मुरगूड आणि हळदी येथे खासगी डॉक्टरांकडे उपचार घ्यावे लागले. चिखली आरोग्य केंद्राकडे 175 रुग्ण नोंद झाले. आजही सरपंच श्रीमती भारमल यांच्या खासगी शेडमध्ये रुग्णांवर उपचार सुरू आहेत. लॉकडाउनमुळे साथीची शेजारच्या गावात माहिती नाही.
"आरोग्य विभागाने सूचना देऊनही ग्रामपंचायतीने पाण्याचे निर्जंतुकीकरण केले नाही, टीसीएलचा योग्य प्रमाणात वापर केला नाही. साथीची संपूर्ण जबाबदारी ग्रामपंचायतीची आहे. इतकी मोठी साथ असताना सर्व कर्मचारी, अधिकारी यांच्यावर दबाव आहे का? चौकशी व्हावी.' - अनिल माने, अभियंता, नागरिक.
"एका गल्लीत नव्हे, संपूर्ण गावात साथ आहे. ती आटोक्यात आली आहे. आता फिल्टर आणि क्लोरीनयुक्त पाणी दिले जाते. यापुढे असा प्रश्न येणार नाही.' - संतोष गणपती भारमल ( सरपंच मंगल गणपती भारमल यांचे पुत्र)
-संपादन ः यशवंत केसरकर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.