आधीच कामधंदा नाही, त्यात वीज बिल कसे भरायचे ? 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

देश कोरोनामुळे संकटात असताना महावितरणने चुकीच्या पद्धतीने बिलाची आकारणी केली आहे.

जयसिंगपूर : देश कोरोनामुळे संकटात असताना महावितरणने चुकीच्या पद्धतीने बिलाची आकारणी केली आहे. त्यामुळे जादा दराने आलेली बिले दुरुस्त करावीत. महावितरणने वीज बिले तक्रार निवारण कक्ष तत्काळ सुरु करावे यासह विविध मागण्यांसाठी सोमवारी (ता. 29) दुपारी बारा वाजता जयसिंगपूर येथील महावितरणच्या कार्यकारी अभियंता कार्यालयावर आंदोलन अंकुशने ठिय्या आंदोलन करून घोषणाबाजी केली. 

निवेदनातील मागण्या मान्य करुन कार्यवाही करण्याचे लेखी पत्र कार्यकारी अभियंता मंकरद आवळेकर यांनी आंदोलकांना दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. शिरोळ तालुक्‍यात घरगुती अथवा व्यावसायिक वीज ग्राहकांना विभागामार्फत कोणतेही रिडींग न घेता जादा दराने बिले दिली आहेत. कोरोनामुळे सर्व कामधंदे बंद असल्याने हे बिल कोठून भरायचे? त्यामुळे मागील तीन महिन्याचे रिडींग घेऊन त्याचे प्रत्येक महिन्याचे युनिट आकारावेत. 

ग्राहकांची दुकानेच बंद असल्यामुळे त्यांनी वीज वापरली नसून त्याचा स्थिर आकार व जादा आलेली बिले भरुन घेऊ नयेत. प्रत्येक विभागात तक्रारीचे निवारण करावे. तीन समान हप्ते पाडून नव्याने बिल घ्या, ग्राहकांचे वीज कनेक्‍शन तोडू नये... अशा मागण्या आंदोलन अंकुशतर्फे करून महावितरण कार्यालयात ठिय्या मारला. त्यानंतर अंकुशचे धनाजी चुंडमुगे त्यांनी अधिकाऱ्यांना चुकीची आलेल्या बिलाची माहिती दिली. त्यानंतर कार्यकारी अभियंता मंकरद आवळेकर यांनी कार्यवाही करण्याचे पत्र दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. 

आंदोलनात राकेश जगदाळे, दीपक बंडगर, दिलीप माणगांवे, सुधाकर उदगांवे, मनोज राजगिरे, विकास शेषवरे, संपत मोडके, रघुनाथ पाटील, अभिजित पाटील, आशाराणी पाटील, महावीर माने, अशोक पाटील, धनाजी डकरे, वीरभद्र मठपती, विजय परीट, सत्यजित सोमण आदी उपस्थित होते. 

दृष्टिक्षेप 
- आंदोलन अंकुशचे जयसिंगपुरात ठिय्या आंदोलन 
- ग्राहकांच्या तक्रारींसाठी तक्रार निवारण कक्ष सुरू करा 
- मागील तीन महिन्यांचे रिडींग घ्या 
- ग्राहकांचे वीज कनेक्‍शन तोडू नये 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: how to pay the electricity bill?