शेतकऱ्यांच्या पाठिंब्यासाठी इचलकरंजीत आंदोलन

पंडित कोंडेकर
Friday, 4 December 2020

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शहरातील विविध राजकीय पक्ष, संघटना आक्रमक झाल्या. रस्त्यावर उतरून केंद्र सरकारच्या शेती विधेयकाचा निषेध केला.

इचलकरंजी : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शहरातील विविध राजकीय पक्ष, संघटना आक्रमक झाल्या. रस्त्यावर उतरून केंद्र सरकारच्या शेती विधेयकाचा निषेध केला. आणि मोदी सरकार चलेजावोच्या जोरदार घोषणा दिल्या. कामगार संघटना कृती समिती, कॉंग्रेस, भारतीय कम्युनिष्ट पक्षाने आंदोलन करत दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला. 

कामगार कृती समितीचा रास्ता रोको 
मोदी सरकारने शेतीविषयक तीन विधेयके मागे घ्यावीत, अशी मागणी करत देशातील शेतकरी आंदोलनाला कामगार कृती समितीने पाठिंबा दर्शविला. केंद्र सरकार विरोधी जोरदार घोषणाबाजी करत मलाबादे चौकात निदर्शने केली. आचारसंहितेच्या कारणास्तव पोलिसांनी परवानगी नाकारूनही संतप्त आंदोलकांनी रास्ता रोको केला. घोषणा देत मलाबादे चौकात चक्काजाम केला. काही काळानंतर पोलिसांनी रास्ता रोको रोखला.

केंद्र सरकारच्या अमानुष धोरणामुळे गेले सात दिवस झाले दिल्लीत शेतकऱ्यांना न्याय हक्कासाठी झगडावे लागत आहे. हे आंदोलन मोडून काढणाऱ्या मोदी सरकारने जबाबदारी न झटकता शेतकरी विरोधी धोरणे मागे घ्यावीत, अशी मागणी आंदोलकांनी केली. आंदोलनात ए. पी. पाटील, सदा मलाबादे, शिवगोंडा खोत, दत्तात्रय माने, आनंदा गुरव, नारायण गायकवाड, बसगोंडा पाटील, शिवाजी साळुंखे, सुभाष कांबळे, शामराव कुलकर्णी, आनंदा चव्हाण, बंडोपंत सातपुते, बजरंग लोणारी, सुनील बारवाडे सहभागी झाले. 

कॉंग्रेसचे धरणे आंदोलन 
शहर कॉंग्रेस कमिटीच्या बाहेर कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिल्लीतील शेतकऱ्यांच्या पाठिंब्यासाठी धरणे आंदोलन केले. कृषी विधेयकातील तीन कृषी विषयकाविरोधात जोरदार निदर्शने केली. दिल्लीतील आंदोलन मोडून काढणाऱ्या केंद्र सरकारचा निषेध केला. केंद्र सरकारने शेतकरी विरोधातील काळे कायदे तातडीने मागे घ्यावेत, अशी मागणी करण्यात आली. या वेळी नगरसेवक शशांक बावचकर, बाबासाहेब कोतवाल, राजन मुठाणे, बंडू नेजे, सतीश कांबळे, संग्राम घुले, किशोर जोशी, अजित मिणेकर, प्रविण फगरे, रवी वासुदेव यांसह कार्यकर्ते उपस्थित होते. 

भाकपची प्रांत कार्यालयावर निदर्शने 
कृषी कायद्याविरोधात दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी व केंद्रीय कृषी कायदे रद्द व्हावेत यासाठी भाकपने प्रांत कार्यालयावर निदर्शने केली. केंद्र सरकारने या आंदोलनात लक्ष घालून शेतकऱ्यांना त्वरित न्याय द्यावा अन्यथा आंदोलनाची तीव्रता वाढवून रस्त्यावर उतरू असा इशारा देण्यात आला. मागणीचे निवेदन प्रांत कार्यालयात दिले. या वेळी हणमंत लोहार, मारुती आजगेकर, महेश लोहार, शिवाजी जाधव, दादासाहेब जगदाळे, शशिकांत सदलगे, राजश्री तगारे, मंगल तावडे, रंजना मुळे, हैदरअली मुजावर, राजाराम बोडके, आदम मुल्ला आदी उपस्थित होते. 

 

संपादन - सचिन चराटी

kolhapur


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ichalkaranji Agitation For Support Of Farmers Kolhapur Marathi News