इचलकरंजीत जैविक कचरा उघड्यावर 

ऋषीकेश राऊत
Wednesday, 20 January 2021

इचलकरंजी येथील आरगे भवनलगत असणाऱ्या थेट काळ्या ओढ्यात जैविक कचऱ्यासह वापरलेली पीपीई किट टाकत असल्याचा गंभीर प्रकार दिसून आला.

इचलकरंजी : येथील आरगे भवनलगत असणाऱ्या थेट काळ्या ओढ्यात जैविक कचऱ्यासह वापरलेली पीपीई किट टाकत असल्याचा गंभीर प्रकार दिसून आला. ओढ्यालगत इतरत्र पडलेल्या जैविक कचऱ्याची स्थिती पाहता हा ओढा म्हणजे जैविक कचऱ्याचा अड्डाच बनल्याचे चित्र आहे. पालिका प्रशासनाकडून विल्हेवाटासाठी स्वतंत्र यंत्रणा असतानाही जैविक कचरा उघड्यावर टाकला जात आहे. त्यामुळे शहरात पुन्हा एकदा जैविक कचरा विल्हेवाटाची समस्या गुंतागुंतीची होत आहे. 

शहरातील रूग्णालयामध्ये दररोज मोठ्या प्रमाणात जैविक कचरा निर्माण होत असतो. त्याची विल्हेवाट लावण्यासाठी पालिकेकडून स्वतंत्र यंत्रणा राबवण्यात येत आहे. कचरा डेपोवर विशिष्ठ कार्यप्रणालीद्वारे जैविक कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते. शहरातील बहुतांश मेडिकल, सुपर स्पेशालिटी, शासकीय रूग्णालयात जैविक कचरा विल्हेवाट लावण्याची स्वतंत्र व्यवस्था नाही. त्यामुळे पालिकेकडून हा कचरा जास्तीत जास्त 48 तासाच्या आत गोळा करून आधुनिक यंत्रणेच्या सहाय्याने त्याची सुरक्षित विल्हेवाट लावली जाते.

कचरा डेपोवर 800 ते 1000 अंश तापमान असलेल्या इंसिलेटर भट्टीमध्ये हा कचरा जाळून भस्मसात केला जातो. परंतू शहरात हा जैविक कचरा विल्हेवाटाविना ओढ्याचा आसरा घेऊन उघड्यावर टाकला जात आहे. कापूस, गॉज, प्लास्टिकच्या सिरिंज, औषधाची पाकिटे, हॅण्डग्लोज, सलाईन बाटल्या, काचेच्या वस्तू आदी जैविक कचरा थेट ओढ्यात टाकण्याचा प्रकार वाढत आहे.

आरगे भवननजीक असणाऱ्या सांडपाण्याच्या ओढ्यातील जैविक कचरा नागरिकांच्या आरोग्याशी खेळणारा आहे. ओढ्यालगत वसाहत व नागरिकांची वर्दळ असल्याने याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. नियम धाब्यावर बसून जैविक कचरा उघड्यावर टाकून सर्रासपणे नियमांचे उल्लंघन केले जात आहे. बायोवेस्ट नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचा शोध घेऊन कठोर कारवाई करणे गरजेचे आहे. 

जैविक कचऱ्याबाबत नेहमीच पालिका सतर्क आहे. स्वच्छता निरीक्षकांना याबाबत सक्त सूचना दिल्या आहेत. पालिकेची जैविक कचरा विल्हेवाटासाठी स्वतंत्र यंत्रणा आहे. शहरात उघड्यावर अथवा ओढ्यात जैविक कचरा टाकणाऱ्यांचा शोध घेऊन कडक कारवाई केली जाईल. 

- डॉ. सुनीलददत्त संगेवार,आरोग्याधिकारी, नगरपालिका 

 

संपादन - सचिन चराटी

kolhapur


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Ichalkaranji Medical Waste In The Open Place Kolhapur Marathi News