वीज बिल माफीसाठी इचलकरंजीत आक्रोश मोर्चा 

पंडित कोंडेकर
Wednesday, 25 November 2020

भरणार नाही, भरणार नाही, वीज बिल भरणार नाही, अशा प्रचंड घोषणांच्या गदारोळात शहरात वीज बिल माफीसाठी आक्रोश मोर्चा काढला. कोविडच्या नावाखाली भरमसाट भ्रष्टाचार करणाऱ्या राज्य सरकारने वीज बिल माफीचा प्रश्‍न संपवायला हवा होता.

इचलकरंजी : भरणार नाही, भरणार नाही, वीज बिल भरणार नाही, अशा प्रचंड घोषणांच्या गदारोळात शहरात वीज बिल माफीसाठी आक्रोश मोर्चा काढला. कोविडच्या नावाखाली भरमसाट भ्रष्टाचार करणाऱ्या राज्य सरकारने वीज बिल माफीचा प्रश्‍न संपवायला हवा होता. या भ्रष्टाचाराचे वाभाडे काढण्याची वेळ आली आहे. तीनचाकी सरकारमधील विजेची सवलत न देणारा शुक्राचार्य कोण? असा सवाल करत वीज बिल माफीसाठी सर्वसामान्यांपुढे ठाकरे सरकारला झुकावेच लागेल, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला. 

सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने लॉकडाउनमधील घरगुती वीज बिले माफ करावीत, या मागणीसाठी प्रांत कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला. यावेळी श्री. शेट्टी यांनी मोर्चाला संबोधित केले. वीज तज्ज्ञ प्रताप होगाडे म्हणाले, ""ऊर्जा मंत्री नितीन राऊत हे जनतेला आमिष दाखवून फसवणूक करत आहेत. वीज बिले दुरुस्त करण्याच्या नावावर ग्राहकांना मात्र तात्पुरता दिलासा दिला जात आहे. मंत्रिमंडळात यावर पोकळ चर्चा होते, मात्र ठोस निर्णय होत नाही. महाविकास आघाडी सरकारच्या अंतर विरोधामुळे जनतेचा बळी जात असून, वीज बिले माफ होईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही.'' 

गांधी पुतळा चौकातून मोर्चाला सुरवात झाली. मलाबादे चौक, शिवाजी पुतळामार्गे प्रांत कार्यालयावर मोर्चा धडकला. लॉकडाउननंतर शहरात प्रथमच असा मोर्चा निघत असल्याने मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. वीज बिल माफीसाठी टाळाटाळ करणाऱ्या राज्य शासनाचा अनेक शेतकऱ्यांनी आसूड ओढत निषेध केला. मागणीचे निवेदन प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांना दिले. मोर्चात आमदार प्रकाश आवाडे, सदा मलाबादे, नगरसेवक सागर चाळके, राजू बोंद्रे, संजय केंगार, प्रकाश मोरबाळे, सावकार मादनाईक, रवी रजपुते, दत्ता माने, प्रकाश दत्तवाडे, भरमा कांबळे, बजरंग लोणारी, प्रसाद कुलकर्णी, संजय बिडकर, राहुल आवाडे, आण्णासाहेब शहापुरे, जयकुमार कोले, सतीश कोष्टी आदी सहभागी झाले होते. 

महाविकास आघाडीचे पदाधिकारी गैरहजर 
वीज बिल माफीसाठी सर्वपक्षीय मोर्चा असल्याने महाविकास आघाडीचे पदाधिकारीही मोर्चात सहभागी होणार होते, मात्र कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेचे पदाधिकारी मोर्चात अजिबात फिरकले नाहीत. खासदार धैर्यशील माने, मदन कारंडे, शशांक बावचकर, संजय कांबळे यांच्या गैरहजेरीची चर्चा मोर्चात होती. 

राज्य सरकारने काहीच दिले नाही 
कोरोनात केंद्र सरकारने विविध पॅकेज देऊन जनतेला धीर दिला आहे, मात्र महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडी सरकारने काहीच दिले नाही. जनसामान्यांसाठी हे सरकार दुबळे बनले आहे. अशी टीका माजी खासदार श्री. शेट्टी यांनी केली. 

 

संपादन - सचिन चराटी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ichalkaranji Morcha For Electricity Bill Waiver Kolhapur Marathi News