गॅसच्या सबसिडीसाठी इचलकरंजीत निदर्शने

ऋषीकेश राऊत
Saturday, 24 October 2020

गॅसवरील बंद झालेली सबसिडी पूर्ववत मिळावी या मागणीसाठी कॉंग्रेसच्यावतीने प्रांत कार्यालयासमोर निदर्शने केली. मोदी सरकार विरोधात घोषणाबाजी करत गॅस सिलिंडरला पुष्पहार अर्पण करत बंद सबसिडीचा निषेध नोंदवला.

इचलकरंजी : गॅसवरील बंद झालेली सबसिडी पूर्ववत मिळावी या मागणीसाठी कॉंग्रेसच्यावतीने प्रांत कार्यालयासमोर निदर्शने केली. मोदी सरकार विरोधात घोषणाबाजी करत गॅस सिलिंडरला पुष्पहार अर्पण करत बंद सबसिडीचा निषेध नोंदवला. गॅस सबसिडी ग्राहकांना पूर्ववत सुरू करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. मागणीचे निवेदन प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांना दिले. 

एप्रिल 2020 पासून घरगुती गॅसधारकांच्या बॅंक खात्यामध्ये केंद्र शासनाकडून जमा होणारी सबसिडी बंद झाली आहे. लॉकडाउनमुळे बंद झालेल्या सबसिडीबाबत ग्राहकांना समजले नाही. सध्या सर्वच जनजीवन पूर्वपदावर येत असताना शासनाने नागरिकांना सबसिडी पूर्ववत करून आधार देणे गरजेचे आहे.

या सर्व बाबींचा विचार करून केंद्र शासनाने गॅस सबसिडी पूर्ववत करावी आणि जनतेला आर्थिक आधार द्यावा अशी मागणी उपस्थितांनी केली. नगरसेवक संजय कांबळे, राहुल खंजिरे, शशांक बावचकर, शशिकांत देसाई, बाबासो कोतवाल, शेखर पाटील, राजन मुठाणे, सौ. वेदिका कळंत्रे, अजित मिणेकर, शिवाजी चव्हाण, धनंजय भाट, नामदेव कोरवी, विद्या भोपळे, योगेश कांबळे आदी उपस्थित होते. 

 

संपादन - सचिन चराटी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Ichalkaranji Protests For Gas Subsidy Kolhapur Marathi News