esakal | इचलकरंजीला समूह संसर्गाचा धोका?
sakal

बोलून बातमी शोधा

Ichalkaranji At Risk Of Group Infection Kolhapur Marathi News

उद्योगाच्या निमित्ताने देशभर कनेक्‍टेड असलेल्या या शहरात विविध प्रांतातून मोठ्या प्रमाणात नागरिक व कामगार येत असल्याने आता या शहराला अधिक दक्ष राहण्याची गरज आहे.

इचलकरंजीला समूह संसर्गाचा धोका?

sakal_logo
By
संजय खूळ

इचलकरंजी : देशातील अनेक भागांशी कनेक्‍टेड असलेल्या मॅंचेस्टरनगरीला समूह संसर्गाचा धोका पोचण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. उद्योगाच्या निमित्ताने देशभर कनेक्‍टेड असलेल्या या शहरात विविध प्रांतातून मोठ्या प्रमाणात नागरिक व कामगार येत असल्याने आता या शहराला अधिक दक्ष राहण्याची गरज आहे.

लॉकडाउनच्या काळात कडक निर्बंध पाळून शहराला सुरक्षित ठेवलेल्या एकूणच प्रशासनाला पुन्हा एकदा आता कडक धोरण अवंलबण्याची गरज निर्माण झाली आहे. 
सोमवारी रात्री शहरातील एका यंत्रमाग कारखान्यातील कामगारालाच कोरोनाचा संसर्ग झाला आहे, तर आज शहरातील एक उद्योजक व्यापारी आणि बाहेरच्या देशातून आलेल्या एका युवकास कोरोना संसर्ग झाला आहे. यामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

वस्त्रनगरी असलेल्या या शहरात देशातील विविध प्रांतातील कामगार काम करतात. त्याचबरोबर कापडाच्या व्यापाऱ्याच्या निमित्ताने येथील नागरिकांचाही देशातील विविध केंद्राबरोबर नियमित संपर्क राहतो. राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेश, कर्नाटक यासह विविध राज्यांतील नागरिक मोठ्या संख्येने या ठिकाणी राहतात. वेगवेगळ्या निमित्ताने अशा नागरिकांचे त्यांच्या गावाकडे जाण्याचे व गावाकडून या शहरात येण्याचे प्रमाणही हळूहळू वाढू लागले आहे. लॉकडाउनच्या काळात तीन महिने विस्कळीत झालेला यंत्रमाग उद्योग पुन्हा एकदा स्थिर होत आहे.

विविध कारखान्यांमध्ये यंत्रमाग कामगार मोठ्या संख्येने काम करतात. हे कामगार विविध भागांतून आले असल्याने अशा ठिकाणी संसर्ग अधिक वाढण्याची शक्‍यता निर्माण होत आहे. व्यापार, उद्योगाच्या निमित्ताने एकत्र येणारे अनेकजण सध्या कोणत्याच नियमाचे पालन करत नाहीत. अशा ठिकाणीही संसर्ग अधिक वाढण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. 
लॉकडाउनच्या काळात कडक निर्बंध पाळलेल्या या शहरात येणाऱ्या व जाणाऱ्यांची संख्या वाढू लागल्याने कोरोना संसर्ग वाढण्याची भीती अधिक आहे. त्यामुळेच प्रशासनाने आता ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. 

शहराला याची भीती 
- विविध प्रांतातून येणारे यंत्रमाग कामगार 
- माल वाहतूक करणारे ट्रक व चालक 
- मोठ्या संख्येने असणाऱ्या टपऱ्या 
- समूहाने काम करणारे कामगार 
- व्यापाराच्या निमित्ताने दररोज एकत्र येणारे व्यापारी 
- खबरदारी न पाळता सुरू असलेले उद्योग