छेडछाड रोखण्यासाठी इचलकरंजी विशेष मोहिम

पंडित कोंडेकर
Friday, 23 October 2020

इचलकरंजी शहरातील अवैध धंद्यांना कोणत्याही परीस्थितीत बळ दिले जाणार नाही. याबाबत कठोर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा नूतन अप्पर पोलिस अधिक्षक जयश्री गायकवाड यांनी दिला.

इचलकरंजी : शहरातील अवैध धंद्यांना कोणत्याही परीस्थितीत बळ दिले जाणार नाही. याबाबत कठोर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा नूतन अप्पर पोलिस अधिक्षक जयश्री गायकवाड यांनी दिला. येथील शिवाजीनगर पोलिस ठाणे सभागृहात त्यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. महिला व मुलींच्या छेडछाडीच्या घटना रोखण्यासाठी विशेष मोहिम राबवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

श्रीमती गायकवाड म्हणाल्या, "गुन्हे दाखल होण्यापासून ते त्याचा विविध टप्प्यावरील तपास आणि पुढे दोषारोपत्र सादर करेपर्यंत सातत्याने आढावा घेतला जाणार आहे. गुन्हेगारांना शिक्षा होईल, या दृष्टीने तपासावर भर देण्याच्या सूचना पोलिस अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. विविध गुन्ह्यातील पिडीत महिलांनी निर्भयपणे तक्रार देण्याबाबत त्यांच्यात आत्मविश्‍वास निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. प्रत्येक पोलिस ठाण्यात जप्त मुद्देमाल पडून आहे. तो निर्गत करण्याची प्रक्रिया लकवरच राबविण्यात येणार आहे.' 

दारु आणि गुटखा तस्करीबरोबरच अवैध धंद्यांवर कठोर कारवाई यापुढेही केली जाणार आहे. मोका अंतर्गत गजाआड असलेले गुन्हेगार जामिनावर बाहेर पडू नयेत, यासाठी खास प्रयत्न केले जाणार आहेत. बाहेर असणाऱ्या गुन्हेगारांवर जरब बसण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाईवर भर दिला जाणार आहे. मोका कारवाई झालेल्या फरारी गुन्हेगारांचा आढावा घेतला जाणार आहे, असे श्रीमती गायकवाड यांनी यावेळी सांगितले. कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांचीही गय केली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

वाहतूक प्रश्‍नावर सुधारणा करणार 
शहरातील वाहतुकीचा जटील प्रश्‍न आहे. येथे स्वतंत्र वाहतूक नियंत्रण शाखा आहे. वाहतुकीच्या प्रश्‍नांवर लक्ष घालून त्यामध्ये सुधारणा केली जाईल, असे श्रीमती गायकवाड यांनी सांगितले. 

 

संपादन - सचिन चराटी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ichalkaranji Special Campaign To Prevent Harassment Kolhapur Marathi News