
इचलकरंजी शहरातील वाहतुकीचा जटिल प्रश्न सद्या भेडसावत आहे. वाहने पार्किंग, फेरीवाल्यांचे अतिक्रमण, फूटपाथमुळे रस्त्याचे झालेले अकुंचन, सिग्नल यंत्रणेतील घोळ असे अनेक वाहतुकीसंदर्भातील प्रश्न प्रलंबित आहेत.
इचलकरंजी : शहरातील वाहतुकीचा जटिल प्रश्न सद्या भेडसावत आहे. वाहने पार्किंग, फेरीवाल्यांचे अतिक्रमण, फूटपाथमुळे रस्त्याचे झालेले अकुंचन, सिग्नल यंत्रणेतील घोळ असे अनेक वाहतुकीसंदर्भातील प्रश्न प्रलंबित आहेत. या पार्श्वभमीवर तब्बल वर्षभरानंतर उद्या (मंगळवार) शहर वाहतूक सल्लागार समितीची बैठक होत आहे. या बैठकीत नेहमीप्रमाणे केवळ चर्चा होणार की ठोस उपाय योजना होणार याबाबत उत्सुकता असणार आहे.
शहरातील रस्त्यावर धावणारी वाहने वाढली. पण रस्ते तेच राहिले. किंबहुना विविध कारणांनी रस्त्यांचेच अस्तित्व शोधण्याची वेळ अनेकवेळा येते. वाहतुकीचा प्रश्न सुटण्या ऐवजी तो दिवसेंदिवस जटील होत आहे. वास्तविक वाहतूक व्यवस्थेत सकारात्मक बदल होण्यासाठी पालिका आणि वाहतूक नियंत्रण शाखेमध्ये समन्वयाची गरज आहे. पण तेच होतांना दिसत नाही. अनेकवेळा शहर वाहतूक शाखेकडून पालिकेला विविध कारणांस्तव पत्रे पाठवली जातात. पण त्यांच्याकडून अपेक्षीत प्रतिसाद मिळतांना दिसत आहे. तर बऱ्याच वेळा वाहतूकीला शिस्त लावण्याची प्रमुख जबाबदारीच नियंत्रण शाखेकडून विसरली जाते.
शहरात आजही अवजड वाहनांच्या वाहतुकीचा प्रश्न गंभीर आहे. या वाहनांना शहरात दिवसा मनाई करण्यात आली आहे. पण त्यानंतरही ही वाहने बिनधिक्कतपणे येतात. शहरात अनधिकृत रिक्षा स्टॉप वाढत आहेत. सिग्नल यंत्रणा तर सोयीचा विषय बनला आहे. कधीतरी सुरू तर कायमचा बंद असतो.
अन्य कांही महत्त्वाच्या चौकात सिग्नल यंत्रणा बसविण्याचे नियोजन आहे. पण त्या कामाला गती येत नाही. फेरीवाल्यांचा तर सर्वात गंभीर विषय आहे. पालिकेकडून अभय दिले जाते. त्यामुळे वाहतूक पोलिसांना कारवाई करताना मर्यादा पडतात. परिणामी वाहतूक ही गुंतागुंतीची होत चालली आहे. अतिक्रमण निर्मूलन पथक हे हंगामी न राहता बारमाही कार्यान्वित असण्याची गरज आहे; पण तसे होताना दिसत नाही.
सध्या शहरात अनेक ठिकाणी नव्यांने फूटपाथ बांधण्यात आले आहेत; पण त्याचे नियोजन फसले आहे. अनावश्यक ठिकाणी फूटपाथ बांधल्यांने पार्किंगचा प्रश्न अधिकच जटिल झाला आहे. फूटपाथमुळे वाहने कोठे लावायची हा गंभीर प्रश्न सध्या शहरात निर्माण झाला आहे. या प्रकाराला जबाबदार कोण, हा खरा प्रश्न आहे. शहरातील अंतर्गत रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी रिंग रोड तयार करण्यात आले आहेत. त्याचा क्षमतेने वापर करण्याची गरज आहे. त्याबाबत धोरण ठरविण्याची गरज आहे.
प्रमुख प्रश्न
- फेरीवाल्यांचे अतिक्रमण
- अनावश्यक ठिकाणी फूटपाथ
- ढिसाळ सिग्नल यंत्रणा
- पार्किंगसाठी नियोजनाचा अभाव
- प्रमुख चौकांतील बजबजपुरी
- अवजड वाहनांची वाहतूक
- रस्तावरच भरणारा बाजार
संपादन - सचिन चराटी
kolhapur