हापूस आंबा घेताय ? अशी होऊ शकते तुमची फसवणूक...

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 13 May 2020

बॉक्‍स देवगडी आंब्याचा. त्यावर "देवगड हापूस" असे मराठी भाषेत मोठ्या अक्षरात नाव देखिल कोरले आहे. मात्र आतमधील आंबा हा देवगड मधूनच आलेला असेल याची खात्री मात्र नाही.

बेळगाव - हापूस आंब्याची चवच न्यारी, त्यामुळेच आंब्याच्या सिझनमध्ये हापूसला आंबाप्रेमी प्राधान्य देतात. रत्नागीरी, देवगडी हापूस आंबा जगप्रसिद्ध असल्याने सध्या बेळगावमध्ये लॉकडाऊनचे नियम अंशत शिथिल झाल्याने आंबा खरेदी वाढली आहे. पण, देवगड हापूसच्या नावाखाली स्थानिक कर्नाटकी आंब्याची विक्री होत असल्याने आंबाप्रेमींची फसवणूक सुरू झाली आहे. नेमका आंबा कसा ओळखावा, याची माहिती नसल्याने अनेकजण फशी पडत आहेत.

बॉक्‍स पाहून फसगत...

बॉक्‍स देवगडी आंब्याचा. त्यावर "देवगड हापूस" असे मराठी भाषेत मोठ्या अक्षरात नाव देखिल कोरले आहे. मात्र आतमधील आंबा हा देवगड मधूनच आलेला असेल याची खात्री मात्र नाही. अगदी पायरी आंबा देखिल देवगडी हापूस आंब्याच्या बॉक्‍समध्ये ठेवून विक्री केले जात असून ज्यांना आंब्याची जाणीव आहेत, अशांकडून आंब्याची विचारणा केली जाते. सौंदत्ती, रामदूर्ग आणि शहरातील झोपडपट्टी परिसरातून रस्त्यावर आंब्याची विक्री करणारे लोक असे स्थानिक आंबे खरेदी करून त्याची रस्त्यावर विक्री करतीत आहेत. देवगडमधून बेळगावात आंबा येतोच. मात्र तो आंबा दाखल झाल्यानंतर स्थानिक पातळीवर त्याची विक्री होताना अनेक ग्राहक बॉक्‍स ऐवजी पिशवीत पॅकिंग करून घेतात. त्यानंतर असे रिकामे बॉक्‍स स्थानिक रस्त्यावरील विक्रेते घेत असून त्यातच स्थानिक आंबा घालून पुन्हा त्याची देवगड हापूस म्हणून विक्री केली जात आहे. त्यातच काहींनी स्थानिक पातळीवरच असे देवगडी हापूस आंब्याचे बॉक्‍स प्रिंट करून घेतले असून त्यात स्थानिक आंबा ठेवून विक्री होत आहे. केवळ बॉक्‍स पाहून अनेक ग्राहक फसत आहेत.

हापूस आंबा ओळखावा कसा..?

हापूस आंब्याचा आकार इतर आंब्यापेक्षा वेगळा असून देठाकडे हा आंबा वरच्या दिशेने थोडा फुगीर असतो. आंबा त्याच्या सुगंधाने देखिल ओळखला जातो. त्यातच आंबा कापल्यानंतर आंब्याची साल अगदी पातळ असतो तर आंब्याचा गर केशरी रंगाचा असतो. त्यामुळे हापूस आंबा लवकरच ओखळा जाऊ शकतो. ग्राहकांनी ही साधी बाब जरी लक्षात ठेवली तरी केवळ बॉक्‍स पाहून ग्राहक फशी पडणार नाहीत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: the idea of identify hapus mango