धक्कादायक : आईचा मृत्यू झाल्याय, मग पुरावे द्या... 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जून 2020

देवदूताप्रमाणे भेटलेल्या व्यक्तिच्या मोटारीतून माहेरी निघाल्या; पण दुर्दैवाचा फेरा उदगाव टोल नाक्‍यावरही सुटला नाही.

जयसिंगपूर : आईचे निधन झाले, असा निरोप मिळताच "त्या' तातडीने पतीसह माहेरी निघाल्या. रस्त्यात मोटारसायकलला अपघात झाला. पतीला दवाखान्यात सोडून जखमी अवस्थेत त्या देवदूताप्रमाणे भेटलेल्या व्यक्तिच्या मोटारीतून माहेरी निघाल्या; पण दुर्दैवाचा फेरा उदगाव टोल नाक्‍यावरही सुटला नाही. महिला पोलिस अधिकाऱ्याने चक्क आईच्या मृत्यूचे पुरावे त्यांच्याकडे मागितले. अखेर माजी आमदार उल्हास पाटील यांच्या रुद्रावताराने महिला अधिकारी नरमली आणि आईविना पोरक्‍या झालेल्या लेकीला अंत्यदर्शनासाठी सोडले. 

बेडग (जि. सांगली) येथून मोटारसायकलवरून कुटवाड (ता. शिरोळ) येथील माहेरी "ती' महिला निघाली. दुर्दैवाने अपघात झाला. पायाला गंभीर दुखापत झाली. कोणी तरी देवमाणूस त्यांच्या मदतीला धावला. मात्र, उदगाव टोल नाक्‍यावर आईच्या मृत्यूचेच पुरावे मागितले. तेथील महिला अधिकाऱ्याच्या हातापाया पडले, तरी "त्या' महिलेची दया आली नाही. तासभर सुरू असलेल्या या प्रकारामुळे नाक्‍यावर मोठी गर्दी जमली. गर्दीतील एकाने ही बाब माजी आमदार उल्हास पाटील यांना कळविली.

महिला अधिकारी त्यांचाही कॉल घेण्यास तयार नसल्याने श्री. पाटील यांनी शिरोळमधून तडक उदगाव टोल नाका गाठला. महिलेच्या आईचा मृत्यू झाला असताना पुरावे कसले मागता? नाक्‍यावरून सगळेच पास घेऊन जातात काय? अपघात होऊनही आईचे अंत्यदर्शन घेणाऱ्या महिलेची तुम्हाला दया का येत नाही? असे अनेक प्रश्‍न विचारत श्री. पाटील यांनी महिला अधिकाऱ्याचा चांगलाच समाचार घेतला.

यावेळी गर्दीतील काहींनी टोल नाक्‍यावर पोलिसांकडून अरेरावीची भाषा बोलली जात असल्याच्या तक्रारी केल्या. यानंतर श्री. पाटील यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी किशोर काळे यांना मोबाईलवरून घटना सांगितल्यानंतर त्यांनी महिलेला सोडण्याचे आदेश दिल्यानंतर वाद निवळला. 

महिला अधिकाऱ्याला महिलेच्याच भावना कळत नसतील तर दुर्दैव आहे. संबंधित अधिकाऱ्याची वरिष्ठांकडे तक्रार केली आहे. त्यांच्या येथून बदलीची मागणी केली आहे. यासाठी पाठपुरावा करू. 
- उल्हास पाटील, माजी आमदार 

कोल्हापूर 

कोल्हापूर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: If mother dies, then give proof ...