esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

if take responsibility dont spread corona virus

जिल्ह्यात येणाऱ्या लोकांच्या तुलनेत स्वॅब संकलन, त्याचा अहवाल, संस्थात्मक अलगीकरणाची व्यवस्था व तज्ज्ञ मनुष्यबळ यात तफावत आहे.

कोरोनाचा प्रसार थांबवायचाय! तर 'अशा' हव्यात उपाययोजना; प्रसाराची ही आहेत प्रमुख कारणे

sakal_logo
By
सदानंद पाटील

कोल्हापूर : जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत आहे. लॉकडाउनच्या ६० दिवसांत जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ५६ पर्यंत गेली आहे. सरासरी रोज एक रुग्ण सापडत आहे. अजूनही २ हजार स्वॅबची तपासणी होणे बाकी आहे. त्यात किती पॉझिटिव्ह सापडणार, याचा कोणालाच अंदाज नाही. रुग्णांच्या वाढत्या संख्येने चिंतेचे वातावरण पसरले आहे. म्हणूनच रेड झोनमधून येणाऱ्या लोकांना नियंत्रित करणे, संस्थात्मक अलगीकरणाची काटेकोर अंमलबजावणी करणे, कमीत कमी वेळात स्वॅबची तपासणी करणे व भेटणारी प्रत्येक व्यक्‍ती ही कोरानाबाधित आहे, असे समजून सोशल डिस्टन्सिंग ठेवले तर कोरोनाला नियंत्रणात ठेवणे शक्‍य होणार आहे. 


जिल्ह्यातील पहिली कोरोना केस २६ मार्च रोजी पॉझिटिव्ह आली. तेव्हापासून कोरोनाचे रुग्ण वाढत गेले. ८ मेपासून  रुग्णांची संख्या ही ४० पेक्षा अधिक झाली आहे. २६ मार्च ते ४ मेपर्यंत जिल्ह्यात कोरोनाचे केवळ १५ रुग्ण होते. ही संख्या आज जवळपास तिप्पट झाली आहे. जेव्हापासून मुंबई, पुणे, ठाणे, रायगड, पालघर, सातारा या जिल्ह्यांतून लोकांनी कोल्हापुरात प्रवेश करण्यास सुरुवात केली तेव्हापासून ही रुग्णसंख्या वाढीला लागली आहे.

जिल्ह्यात येणाऱ्या लोकांच्या तुलनेत स्वॅब संकलन, त्याचा अहवाल, संस्थात्मक अलगीकरणाची व्यवस्था व तज्ज्ञ मनुष्यबळ यात तफावत आहे. त्यामुळेच आज दोन हजारपेक्षा अधिक स्वॅबची तपासणी होऊ शकलेली नाही. या सर्व स्वॅबचे अहवाल घेणे, त्या आधारे बाधितांवर उपचार व इतरांचे संस्थात्मक किंवा घरातच अलगीकरण करणे आवश्‍यक आहे.  ही सर्व परिस्थिती आटोक्‍यात आल्यानंतरच रेड झोनमधील लोकांना प्रवेश देणे आवश्‍यक आहे. असे झाले नाही तर पुन्हा ही सर्व यंत्रणा कोलमडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

कोल्हापुरच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
 

कोरोना प्रसाराची प्रमुख कारणे
 रेड झोनमधून येणारे प्रवासी
 स्वॅब केंद्रावर संशयितांचा वावर 
 लक्षणे नसल्याने सोशल डिस्टन्सचा फज्जा
 अलगीकरण केंद्रात मुक्‍त वावर
काय करणे आवश्‍यक
 संस्थात्मक अलगीकरण हवे काटेकोर
 रुग्णांना कक्षाबाहेर सोडण्यावर निर्बंध
 रेड झोनमधील प्रवाशांना हवा ब्रेक
 संस्थात्मक अलगीकरण व्यवस्था वाढवणे
 उपलब्ध बेडच्या प्रमाणात इनकमिंग
 बेकायदेशीर प्रवाशांना रोखणे

सीपीआर येथे हवा मार्गदर्शन कक्ष
रेड झोनमधून येणाऱ्या बहुतांश लोकांना स्वॅब घेण्यासाठी सीपीआर येथे पाठवले जाते; मात्र सीपीआर येथे आल्यानंतर जायचे कोठे, असा प्रश्‍न असतो. स्वॅबसाठी संबंधित व्यक्‍ती सीपीआर येथे फिरते. जर ती कोरोनाग्रस्त असेल तर त्यापासून अनेकांना धोका होण्याची शक्‍यता असते. त्यामुळे सीपीआरमध्ये प्रवेश केल्यानंतर जायचे कुठे, याचे मार्गदर्शन करण्याची प्रवेशद्वारापासूनच व्यवस्था असणे आवश्‍यक आहे. तसेच ॲपसाठी रांगा लागतात. त्यामुळे या ठिकाणीही मनुष्यबळ वाढवणे आवश्‍यक आहे.ह

हे पण वाचा - 'हम भी शिवाजी महाराज के ऊपर बहोत प्यार करते है,' असं म्हणत तो परप्रांतीय बनारसला रवाना झाला... 


सामाजिक सलोख्याला धोका
जिल्ह्यातील शाहूवाडी, आजरा, चंदगड, गडहिंग्लज, भुदरगड, राधानगरी या तालुक्‍यांतील हजारो लोक मुंबई, पुणे परिसरात नोकरी व व्यवसायानिमित्त स्थिरावले आहेत. मात्र  कोरोनामुळे सर्व उद्योग, व्यवसाय बंद आहेत. त्यामुळे परवानगी व विनापरवानगी लोकांच्या झुंडीच्या झुंडी गावाकडे येत आहेत. त्यामुळे गाव विरुद्ध शहर, असे वातावरण निर्माण झाले आहे. यातून सामाजिक  सलोखा बिघडण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

हे पण वाचा - 'ते' मुंबईतील रेड झोन मधून गावात आले, सोबत आणलेल्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार केले अन् झाले गायब... 

go to top