
कोल्हापूर : कोव्हिड काळजी केंद्र, कोव्हिड समर्पित आरोग्य केंद्रामध्ये सर्व साधनसामुग्री, औषधे, वैद्यकीय उपकरणे, मनुष्यबळ यासह पूर्ण क्षमतेने सुरू करा, अशा सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातून सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, नगरपालिका मुख्याधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरंसिंगव्दारे आज संवाद साधला. यावेळी महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे समन्वयक संजय शिंदे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. देसाई यावेळी म्हणाले, कोव्हिड काळजी केंद्र आणि कोव्हिड समर्पित आरोग्य केंद्रामध्ये आवश्यक असणारी सर्व उपचारात्मक व प्रतिबंधात्मक सेवा पुरवावी. रूग्णांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. गरम पाणी देण्यासाठी हिटर, केटल याबाबतची सर्व सोय सार्वजनिक बांधकाम विभागाने करावी. रूग्णांना चांगलं जेवण पुरवावे. आवश्यकतेनुसार ॲक्वागार्डची सोय करा. त्याचबरोबर रूग्णांवर उपचार करणारे डॉक्टर्स, कर्मचारी यांची राहण्याची सोय देखील करावी.
निर्जंतुकीकरण त्याचबरोबर स्वच्छता याचे कामकाज सुरळीत पार पडले जाईल याची खात्री करावी. उपचारासाठी दाखल असणाऱ्या रूग्णांचे तपमान, रक्तदाब, शर्करा याची तपासणी वेळेवर करावी. पल्स ऑक्सीमीटरनी तपासणी करावी. त्याच्या नोंदी घेवून संगणक प्रणालीव्दारे नोंद घेवून कामकाज करावे. सुरक्षा व्यवस्था, स्वच्छता, रूग्णवाहिका व्यवस्थापन, भांडार व्यवस्थापन याबाबत नगरपालिका मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी यांनी समन्वय करावे. तालुका आरोग्य अधिकारी यांनी औषध पुरवठा, आरोग्य अधिकारी, वैद्यकीय उपकरणे याबाबत समन्वय ठेवावे, असेही ते म्हणाले.
आवश्यक असणाऱ्या मनुष्यबळाविषयी तहसीलदार, तालुका आरोग्य अधिकारी, मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी, उपअभियंता यांच्या स्वाक्षरीने आदेश काढावेत. तीन सत्रामध्ये कामकाज सुरू झाले पाहिजे. कोव्हिड काळजी केंद्राजवळ संशयित रूग्णांसाठी पूर्वतयारी म्हणून नव्या इमारती शोधून ठेवाव्यात. यामध्ये हॉटेलही पाहून ठेवावे. प्रत्येकाने आपापल्या तालुक्याची जबाबदारी घेवून आदेशाप्रमाणे कार्यवाही करावी. मागणीप्रमाणे आवश्यक त्या साधनसुविधा पुरवल्या जातील, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. साळे यांनी कोव्हिड काळजी केंद्र, कोव्हिड समर्पित आरोग्य केंद्र निहाय आढावा घेवून आलेल्या मागणी प्रमाणे साधनसामुग्रींची नोंद घेतली. 19 केंद्रांसाठी साहित्य पाठवण्यात आले असून 14 केंद्रांसाठी आज साहित्य पाठवत असल्याचे ते म्हणाले.
महापालिका आयुक्त डॉ. कलशेट्टी यांनी आहारविषयक सविस्तर मार्गदर्शन केले. विशेषत: उकडलेली अंडी, फळे, मोड आलेली उसळ यांचा समावेश असण्याबाबत त्यांनी सांगितले. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मित्तल म्हणाले, स्वच्छतेवर अधिक भर द्या. रूग्णांना ऑक्सिजन पुरवण्याबाबत विशेष काळजी घ्यावी. ऑक्सिजनचा जास्तीत-जास्त वापर करा. ऐच्छिक सेवाभावी कार्यकर्त्यांची मदत घ्यावी, असेही ते म्हणाले.
..
डॉ. उत्तम मदने यांचे 24 तास योगदान
संजय घोडावत विद्यापीठामधील कोव्हिड काळजी केंद्रात डॉ. उत्तम मदने हे 24 तास योगदान देत आहेत. गेल्या तीन महिन्यात ते घरी गेले नाहीत. 24 तास केंद्रात उपस्थित राहून रूग्णसेवा करत आहेत. रात्री 2 वा. जरी फोन केला तरी ते त्याला प्रतिसाद देतात. डॉ. मदने यांचे उदाहरण आपल्यासाठी प्रेरणा देणारे आहे. याप्रमाणे सर्वांनी योगदान द्यावे, अशा शब्दात जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी डॉ. मदने यांचे कौतुक केले.
संपादन - धनाजी सुर्वे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.