कारवाईची धमकी : केंद्रीय विभागाच्या अधिकाऱ्यावर कारवाई; घेतली दहा लाखाची लाच

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 19 December 2020

तुमची तक्रार आम्हाला मिळाली आहे. २५ लाख रुपये दिले नाहीत तर तुमच्यावर कारवाई करू

कोल्हापूर :  प्राप्तिकर न भरल्याप्रकरणी कारवाईची धमकी देऊन दहा लाख रुपयांची लाच घेतल्या प्रकरणी आज प्राप्तिकर निरीक्षकास येथे दुपारी एक वाजता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. प्रताप महादेव चव्हाण (वय ३५, रा. भूमी बंगला, रमणमळा) असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. केंद्रीय विभागाच्या अधिकाऱ्यावर कारवाई होण्याची या वर्षातील पहिलीच घटना आहे. लाचेची मोठी रक्कम आणि प्राप्तिकर विभागातील अधिकारी असल्याने या घटनेची संपूर्ण जिल्हाभर चर्चा रंगली. 

लाचलुचपत विभागाचे उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांनी या कारवाईबाबत दिलेली माहिती अशी 

प्रताप २००७ मध्ये खेळाडू कोट्यातून टॅक्‍स असिस्टंट म्हणून प्राप्तिकर विभागात नोकरीस लागला. तो, क्रिकेट खेळाडू होता. त्यानंतर २०१६ मध्ये त्याला प्राप्तिकर निरीक्षक म्हणून पदोन्नती मिळाली. काही दिवसांपूर्वी प्राप्तिकर विभागामध्ये एका वैद्यकीय व्यावसायिकाबाबत निनावी तक्रार आली होती. या व्यावसायिकाने प्राप्तिकर भरला नाही. त्याचे वैद्यकीय उत्पादने बनवण्याचा व्यवसाय आहे. यातून त्याने भरपूर मालमत्ता कमावली आहे, असे या तक्रारीत नमूद केले होते. प्रतापने संबंधित व्यावसायिकाला चार दिवसांपूर्वी दूरध्वनी केला. तुमची तक्रार आम्हाला मिळाली आहे. २५ लाख रुपये दिले नाहीत तर तुमच्यावर कारवाई करू, अशी धमकी त्याने दिली. दोघांमध्ये चर्चा होऊन १४ लाख रुपये देण्याचे निश्‍चित झाले. 

दरम्यान, या व्यावसायिकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क करून तक्रार दिली. दोघांमध्ये गुरुवारी (ता.१७) रात्री चर्चा होऊन शुक्रवारी (ता. १८) दुपारी दहा लाख रुपये देण्याचे ठरले. लक्ष्मीपुरी येथील विल्सन पुलाजवळ प्रताप येणार होता. त्याप्रमाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला. दुपारी एक वाजता प्रताप त्याच्या मोटारीमधून तेथे आला. संबंधित वैद्यकीय व्यावसायिकही तेथे मोटार घेऊन आले होते. प्रताप पैसे घेण्यासाठी त्यांच्या मोटारीमध्ये जाऊन बसला. त्याने १० लाख रुपयांची रक्कम या व्यावसायिकाकडून स्वीकारली. त्याचवेळी लाचलुचपत अधिकाऱ्यांनी त्याला अटक केली. त्यानंतर त्याला लाचलुचपत प्रतिबंधकच्या कार्यालयात आणून त्याची चौकशी करण्यात आली. तो कार्यरत असलेल्या टाकाळा येथील कार्यालयातील कागदपत्रे जप्त करण्यात आली. त्याच्या रमणमळा येथील भूमी बंगल्याची झडतीदेखील घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. 

हेही वाचा- कोल्हापूर: एकाच दिवशी नऊ सावकारांवर छापे -

ही कारवाई पोलिस निरीक्षक जितेंद्र पाटील, सहायक निरीक्षक शाम बुचडे, अमर भोसले, संजीव बंबर्गेकर, कॉन्स्टेबल अजय चव्हाण, सूरज अपराध, मयूर देसाई, रुपेश माने, संग्राम पाटील, कृष्णात पाटील, छाया पोटाळे यांनी केली. 
चौकट

खोटा पत्ता सांगितला
प्रताप चव्हाण याने सुरुवातीला राजारामपुरी येथील पत्ता सांगितला. पोलिसांनी तेथे जाऊन प्रत्यक्ष पहाणी केल्यावर येथे प्रताप रहात नसल्याची माहितीसमोर आली. त्यानंतर त्याने रमणमळा येथील खरा पत्ता सांगितला. 

आजपर्यंतची सर्वात मोठी रक्कम
प्रताप चव्हाण याने दहा लाख रुपयांची लाच घेतली. ही आत्तापर्यंत सर्वात मोठी रक्कम आहे. यापूर्वी २००७ मध्ये सेल्सटॅक्‍स निरीक्षक व्यंकट गोविंद नेमाळे याच्यावर साडेसात लाख रुपयांची लाच घेतल्या प्रकरणी कारवाई झाली होती. 

उच्च पदस्थ अधिकारी टार्गेटवर
लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाने वर्षभरात २६ कारवाया केल्या. यामध्ये वर्ग एकचे पाच अधिकारी तर वर्ग दोनचे चार अधिकारी आहेत. वरिष्ठांवरही लाचलुचपत विभागाची नजर आहे.

प्रतापला आली चक्कर
अचानक झालेल्या कारवाईने प्रताप गोंधळून गेला होता. त्याला लाचेच्या रकमेसह लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात आणल्यानंतर चक्कर आली. तेथील कर्मचाऱ्यांनी त्याला पाणी आणि साखर दिली. त्यानंतर त्याला टाकाळा येथील त्याच्या कार्यालयात नेण्यात आले. 
 

 

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Income Tax Inspector pratap chawhan Arrested by Bribery Prevention Department officials