esakal | बेळगाव, म्हैसूर, बागलकोट मध्ये बालविवाहाच्या घटनेत वाढ ; राज्यात १५० पेक्षा अधिक प्रकरणे
sakal

बोलून बातमी शोधा

Increase in child marriage cases due to lockdown

बेळगावसह बागलकोट व म्हैसूर जिल्ह्यात अधिक

बेळगाव, म्हैसूर, बागलकोट मध्ये बालविवाहाच्या घटनेत वाढ ; राज्यात १५० पेक्षा अधिक प्रकरणे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बेळगाव/बंगळूर : लॉकडाउनचे आर्थिक व सामाजिक परिणाम दिसून येऊ लागले आहेत. लॉकडाउनमुळे अडचणीत आलेल्या ग्रामीण भागातील कुटुंबांत अल्पवयीन मुलींची लग्ने झाल्याचे आढळून आले आहे. मार्च ते सप्टेंबर या काळात कर्नाटकात बालविवाहाची १५० पेक्षा जास्त प्रकरणे नोंदविण्यात आली आहेत. बेळगावसह बागलकोट व म्हैसूर जिल्ह्यात अशी प्रकरणे अधिक असल्याची बाब समोर आली आहे.
 

शाळा बंद राहिल्यामुळे मुलींच्या स्थितीचा मागोवा घेण्याचा कोणताही मार्ग उपलब्ध नव्हता. त्यामुळे बालविवाहांचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले. लॉकडाउनमुळे सुरुवातीला फारशा घटना घडल्या नव्हत्या. परंतु, सरकारने लॉकडाउन शिथिल केल्यावर बालविवाह होऊ लागले आणि काही प्रकरणेही नोंदविण्यात आली. कोविड काळातील या वाढत्या प्रवृत्तीमागील एक कारण म्हणजे बरेच तरुण काम न करता घरी परतले. त्यामुळे, पालकांनी त्यांना लग्नासाठी भाग पाडले. मुलींच्या वयाचा विचार न करता वधूची निवड केली गेली, असे नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा- हद्द झाली ; आता सोने, चांदी नाही तर चक्क चोरट्याचा कांदा, बटाटावर डल्ला -


महिला व बालविकास विभागाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बहुतेक प्रकरणे बेळगाव, म्हैसूर, बागलकोट आणि इतर काही जिल्ह्यात नोंदली गेली. शाळा नसल्यामुळे पालक गावागावांमध्ये आपल्या मुलांचे लग्न लावत असल्याचेही अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. कठोर कायदे असूनही अशी प्रकरणे घडत आहेत. त्यांनी वधू-वर दोघांच्या पालकांवर बाल विवाह प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आणि दोन्ही पक्षांकडून हमीपत्र देखील स्वीकारले. कर्नाटकात पंचायत राज विभागाच्या मुख्य सचिव उमा महादेवन यांनी मुलीचे वय १८ वर्ष होण्यापूर्वीच विवाह होणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

दोन बालविवाह रोखले
एचडी कोटे तालुक्‍यातील दुर्गम गावात आणि कर्नाटकाशी संबंधित आंध्र प्रदेशच्या मदनपल्लेत दोन बालविवाह रोखण्यात आले. एका स्वयंसेवी संस्थेच्या सदस्याने २५ ऑक्‍टोबर रोजी चिक्काबळ्ळापूर जिल्ह्यातील सिदलाघट्टमधील १७ वर्षीय मुलीच्या लग्नाबद्दल आंध्र प्रदेशच्या मदनपल्लेत आयोजित बालविवाहाबद्दल अधिकाऱ्यांना सावध केले. हैदराबाद पोलिसांना टॅग करीत एका पत्रकाराने यासंबंधी ट्विट करताच बाल विवाह रोखण्यात यश आले. त्याचप्रमाणे २० ऑक्‍टोबर रोजी एका ट्‌विटर युजरने म्हैसूर जिल्ह्यातील एचडी कोटे तालुक्‍याजवळच्या दुर्गम गावात एका अल्पवयीन मुलीच्या लग्नाबद्दल पोस्ट केली होती. जिल्हा महिला व बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी लग्नाच्या आधी पोलिसांसह जाऊन हा विवाह रोखला. वधू-वराचे वय केवळ १६ वर्षांचे होते.

संपादन - अर्चना बनगे

go to top