
. ग्रामपंचायतीची दोन वर्षापासूनची तब्बल 60 लाख रुपयांच्या आसपास थकबाकी शिल्लक आहे. यावर कसा मार्ग काढायचा ही चिंता सतावत असताना ग्रामपंचायतीकडून अभिनव योजना जाहीर केली.
सिद्धनेर्ली(कोल्हापूर) : ग्रामपंचायतीचा कर भरा आणि चक्क सोने जिंका, अशी अभिनव योजना येथील ग्रामपंचायतीकडून जाहीर केली आहे. कोरोना संसर्गामुळे गतवर्षीसह यावर्षीही ग्रामपंचायतीच्या कर वसुलीला नागरिकांकडून थंड प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीचे अर्थकारणच कोलमडून पडण्याची वेळ आली आहे. येथील ग्रामपंचायतीकडे बाराशेहून अधिक मिळकतधारक आहेत. ग्रामपंचायतीची दोन वर्षापासूनची तब्बल 60 लाख रुपयांच्या आसपास थकबाकी शिल्लक आहे. यावर कसा मार्ग काढायचा ही चिंता सतावत असताना ग्रामपंचायतीकडून अभिनव योजना जाहीर केली. यामुळे गावात चर्चेला उधान आले आहे. काय आहे घ्या जाणून
सिद्धनेर्ली ग्रामपंचायतीची वसुलीसाठी योजना
निवडणुकीनंतर झालेल्या पहिल्याच मासिक सभेत या विषयावर चर्चा झाली. कोरोना परिस्थितीमुळे पहिल्यांदाच वसुलीसाठी टोकाचे पाऊल उचलणे संयुक्तिक होणार नाही, अशी चर्चा झाली व नागरिकांकडून कर वसूली करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी कर भरा आणि चक्क सोने जिंका, अशी अभिनव योजना जाहीर करण्यात आली. यामध्ये पहिल्या तीन क्रमांकासाठी अनुक्रमे सात, पाच व तीन ग्रॅम सोने जाहीर केले आहे. याशिवाय वाशिंग मशीन, फ्रीज, टीव्ही, पाच पैठणी साड्या, सात सायकली अशी आकर्षक बक्षिसे जाहीर केली आहेत.
ग्रामपंचायतीवर भार नाहीच
कर भरणाऱ्या नागरिकांसाठी ड्रॉ पद्धतीने ही बक्षिसे काढण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे ही सर्व बक्षिसे सरपंच उपसरपंच व सदस्यांनी पुरस्कृत केली आहेत. या बक्षिसांचा कोणत्याही प्रकारचा खर्च ग्रामपंचायतीवर टाकण्यात येणार नाही.
याबाबत महिला सभाही घेण्यात येणार येणार आहे. वसुलीबाबत वस्तुस्थिती त्यांच्यासमोर मांडण्यात येणार आहे. तसेच त्यांच्या अपेक्षा अडीअडचणी जाणून घेऊन त्यांचे निराकरण करण्याचा निर्धार सरपंच दत्तात्रय पाटील यांनी व्यक्त केला.
संपादन- अर्चना बनगे