महाराष्ट्रीय नेत्यांची धास्ती ; नोंद करूनच सीमाभागात प्रवेश

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 1 November 2020

काळ्या दिनाच्या कार्यक्रमात महाराष्ट्रातील नेते उपस्थित राहू नयेत. यासाठी पोलिस खात्याकडून प्रयत्न केले जात आहेत.

बेळगाव : कर्नाटकच्या पोलिसांना काळ्यादिनाची धास्ती लागली आहे. काळ्या दिनाच्या कार्यक्रमात महाराष्ट्रातील नेते सहभागी होतील, या भीतीने पोलिसांनी सीमावर्ती भागात तपासणी नाके उभारले आहेत. महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रत्येक वाहनांची चौकशी करून क्रमांक नोंदवून घेतले जात आहेत.

सीमाभागाची नाळ महाराष्ट्राशी जोडली असल्याने येथील मराठी भाषिक जनता आपल्या मातृराज्यात जाण्यासाठी गेल्या ६५ वर्षांपासून लढा देत आहे. पण, केंद्र सरकारने भाषावार प्रांतरचना करताना सीमाभागावर केलेल्या अन्यायाविरोधात निषेध नोंदविण्यासाठी मराठी भाषकांकडून दरवर्षी १ नोव्हेंबरला शहरात मूक सायकल फेरीचे आयोजन केले जाते. यादिवशी अंगावर काळे कपडे, दंडावर काळ्या फिती बांधून लोक आपला निषेध नोंदवतात. पण, यंदा कोरोनाचे कारण पुढे करत पोलिसांनी सायकल फेरीला परवानगी नाकारली आहे. तरीदेखील मराठा मंदिर मंगल कार्यालयात आंदोलन केले जाणार आहे, तर तालुक्‍यातील गावागावांत निषेध फेरी काढली जाणार आहे.

हेही वाचा- महाराष्ट्रात बसून काळ्यादिनाबाबत वक्तव्य करणाऱ्यांनी बेळगावात येऊन बोलावे -

काळ्या दिनाच्या कार्यक्रमात महाराष्ट्रातील नेते उपस्थित राहू नयेत. यासाठी पोलिस खात्याकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे, सीमावर्ती भागात पोलिसांनी तपासणी नाके उभारले आहेत. महाराष्ट्राकडून येणाऱ्या प्रत्येक वाहनांची तपासणी करुन वाहन क्रमांक नोंद करुन घेतल्यानंतर त्यांना प्रवेश देण्यात येत आहे. पोलिसांच्या या दंडेलशाहीबद्दल मराठी भाषकांतून संताप व्यक्‍त केला जात आहे.

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Inspection of vehicles coming from Maharashtra