जागर व्हाया गुगल मीट : ज्येष्ठ महिलांची घरातूनच ऑनलाईन आराधना

संभाजी गंडमाळे
Thursday, 22 October 2020

मंदिर भाविकांसाठी बंद 
 

कोल्हापूर : माया पाटील यांचा मुलगा अमेरिकेत आहे आणि दोघेही पती-पत्नी येथेच राहतात... मनीषा जोशी यांची एकुलती मुलगी ऑस्ट्रेलियात आहे. जोशी दाम्पत्य नोकरीनिमित्त पुण्यात होते. मात्र, निवृत्तीनंतर रुईकर कॉलनीत स्थायिक आहे. स्मिता बापट यांचा मुलगा फ्रान्सला आहे, तर अलका चक्रदेवांची एकुलती मुलगी जर्मनीत आहे... मुलं नोकरी-व्यवसायानिमित्त परदेशात असली तरी अशी कैक दाम्पत्यं सध्या कोल्हापुरात स्थायिक आहेत.

सारी मंडळी साठीच्या पुढची. त्यातील अकरा जणींनी संकल्प केला आणि उत्सवकाळात रोज देवीच्या आराधनेला ऑनलाईन माध्यमातून प्रारंभ केला आहे. अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी ज्येष्ठांसाठी स्वतंत्र रांग असते. मात्र, यंदा मंदिरच बंद असल्याने दर्शनासाठी जाता येत नाही. या पार्श्‍वभूमीवर त्यांनी ‘गुगल मीट’च्या माध्यमातून अंबाबाईचा अनोखा जागर मांडला आहे.

तशी ही सारी मंडळी एनआरए पॅरेंटस्‌ असोसिएशनच्या माध्यमातून एकवटली आहेत. सध्या या संघटनेचे सुमारे सव्वाशे सभासद आहेत. लॉकडाउनमध्ये सारेच व्यवहार ठप्प झाले. त्यातही ज्येष्ठांसाठी अनेक बंधने असल्याने त्यांनी ऑनलाईन माध्यमातून एकमेकांशी संवाद ठेवला. नवरात्रोत्सवात दर्शनासाठी मंदिरे बंद आहेत आणि सर्व प्रकारच्या स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांवरही बंदी आहे. खरं तर नवरात्रोत्सव म्हणजे स्त्रीशक्तीचा जागर आणि साठी ओलांडली म्हणून घरी गप्प बसून राहायचे का, असा सवाल पुढे येताच ऑनलाईन आराधनेचा उपक्रम त्यांना सूचला. त्यात शुभदा केसकर, विद्या पाटील, माधुरी देशपांडे, संगीता मुदगल, उषा कुलकर्णी, विजया तारळेकर, रंजना इंग्रोळे आदींचा सहभाग आहे. 

हेही वाचा- कोल्हापुरात आता 23 मजली इमारत -

असा चालतो उपक्रम
रोज दुपारी साडेतीन ते साडेचार या वेळेत हा उपक्रम होतो. माया पाटील, अलका चक्रदेव देवीचा जोगवा सादर करतात. स्मिता बापट नऊ दिवस ५१ पीठांची माहिती सांगणार असून रोज सहा पीठांची माहिती त्या देतात. कुणी देवी माहात्म्य पठण करतात, कुणी भजन-भावगीत सादर करतात तर कुणी रेणुकास्तोत्राचे पठण करतात.

संपादन - अर्चना बनगे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Interacted with each other through online