लॉकडाउननंतर सोने गुंतवणूक फायद्याचीच...! 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 20 April 2020

जागतिक पातळीवर भावात झालेली घसरण, डॉलरच्या तुलनेत वधारलेला रुपया या साऱ्या पार्श्‍वभूमीवर सध्या सोने आणि चांदीच्या भावाची झळाळी उतरली आहे. मात्र, प्रत्यक्षात व्यवहार सुरू झाल्यानंतर दर काही अंशी स्थिर होण्याची शक्‍यता आहे, तरीही लॉकडाउननंतरच्या काळात सोन्यातील गुंतवणूक हीच खऱ्या अर्थाने फायदेशीर ठरणार आहे. 

कोल्हापूर : जागतिक पातळीवर भावात झालेली घसरण, डॉलरच्या तुलनेत वधारलेला रुपया या साऱ्या पार्श्‍वभूमीवर सध्या सोने आणि चांदीच्या भावाची झळाळी उतरली आहे. मात्र, प्रत्यक्षात व्यवहार सुरू झाल्यानंतर दर काही अंशी स्थिर होण्याची शक्‍यता आहे, तरीही लॉकडाउननंतरच्या काळात सोन्यातील गुंतवणूक हीच खऱ्या अर्थाने फायदेशीर ठरणार आहे. 

दरम्यान, स्थानिक बाजारपेठेचा विचार केला तर सध्या साडेसातशेहून अधिक पेढ्या बंद आहेत आणि त्यावर अवलंबून दहा हजारांहून अधिक कामगारांना लॉकडाउनचा फटका बसला आहे. जिल्ह्यातील ही संख्या 35 हजारांहून अधिक आहे. 
लॉकडाउनमुळे गुढीपाडव्याचा मुहूर्त आणि आता अक्षय्य तृतीयेचा मुहूर्तही कोरडा जाणार आहे. लग्नसराईचा विचार केला तर यंदाचा उर्वरित हंगाम फार फायद्याचा ठरेल, याची शाश्‍वती नक्कीच नाही. स्थानिक सराफ व्यावसायिक आणि कामगारांबरोबरच बंगाली कामगारांची संख्याही शहरात मोठी आहे. दीड हजारहून अधिक कामगारांचा उदरनिर्वाह एकट्या गुजरी आणि परिसरावर अवलंबून आहे.

लॉकडाउनच्या पहिल्या टप्प्यापर्यंत त्यांना फारशी अडचण जाणवली नाही. मात्र, आता दुसऱ्या टप्प्यात त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते आहे. या पार्श्‍वभूमीवर बंगाली कामगार संघटनेच्या माध्यमातून सुमारे अडीचशे कुटुंबांना जीवनावश्‍यक साहित्याची मदत देण्यात आली आहे. आणखी काही कुटुंबांना मदत द्यावी लागणार असल्याचे इंद्रजित सामंत यांनी सांगितले. दरम्यान, कोल्हापूर सराफ संघाच्या माध्यमातूनही गरजू कामगारांच्या कुटुंबीयांसाठी जीवनावश्‍यक साहित्याची कीट दिली जाणार आहेत. 

गुंतवणूकदार कोण? 
लॉकडाउननंतर सराफ व्यवसाय सुरळीतपणे सुरू होण्यासाठी काही अवधी जाणार आहे. दरम्यान, लगेचच सामान्य ग्राहक खरेदीसाठी येईल, ही शक्‍यता कमी असली तरी येत्या तीन वर्षांत सर्वाधिक परतावा देणारी गुंतवणूक म्हणून सोन्यालाच प्राधान्य दिले जाणार आहे. मात्र, अशी खरेदी करणाऱ्यांमध्ये आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम असणाऱ्या ग्राहकांचीच संख्या मोठी राहणार आहे. 

पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर सराफ व्यवसायाला फटका बसला आहे. त्यातून सावरायला काही अवधी नक्कीच जाईल. पण, तरीही लॉकडाउननंतर सोन्यातील गुंतवणूक हीच सर्वाधिक फायद्याची राहणार आहे. त्यातूनच भविष्यात अधिक चांगला परतावा मिळणार आहे. 
-भरत ओसवाल, सराफ व्यावसायिक 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Investing in gold after lockdown is worth it!