गडहिंग्लजला चिंचेची आवक वाढली

अजित माद्याळे
Monday, 15 February 2021

गडहिंग्लज येथील आठवडा बाजारात चिंचेची आवक वाढली आहे. किलोला तीस रुपये असा भाव आहे. भाजी मंडईत वाढत्या उन्हाळ्यामुळे कलिंगड, काकडीला मागणी जास्त आहे.

गडहिंग्लज : येथील आठवडा बाजारात चिंचेची आवक वाढली आहे. किलोला तीस रुपये असा भाव आहे. भाजी मंडईत वाढत्या उन्हाळ्यामुळे कलिंगड, काकडीला मागणी जास्त आहे. पालेभाज्या, कोथिंबिरीचे दर तेजीत आहेत. फळांच्या बाजारात द्राक्षे, पपई यांची वाढलेली आवक टिकून आहे. सोयाबिनला क्विंटलचा 4800 रुपये असा या हंगामातील सर्वाधिक भाव मिळाला आहे. जनावरांच्या बाजारात मागणीमुळे बकऱ्यांचे दर वाढले आहेत. 

गेल्या पंधरा दिवसापासून चिंचेची आवक सुरू झाली. शेतकरी आपल्या बांधावरील झाडांच्या चिंचा बाजारात विक्रीसाठी आणत आहेत. खासकरुन ग्रामीण भागातून आवक सुरु असुन किलोला तीस रुपये भाव असल्याचे व्यापारी रसुल नदाफ यांनी सांगितले. येथुन चिंचा गुजरात, कर्नाटकला पाठविल्या जातात. पुर्वी चिंचा फोडून बी वेगळी करुन पाठवली जायची. चिंच प्रकिया उद्योगांना येथील चिंच पाठविली जाते. आठवड्याला सुमारे पाच क्विंटल चिंच पाठविली जाते. गडहिंग्लजसह लगतच्या आजरा, चंदगड, कागल तालुक्‍यातुनही चिंच विक्रीला येते. 

उन्हाच्या तडाख्याने कलिंगडाला मागणी असून नगानुसार 20 ते 100 रुपयापर्यंत दर आहेत. काकडीही 60 रुपये किलो आहे. भाजीमंडईत पालेभाज्यासह फळभाज्यांची आवक तुलनेत कमी असल्याने सरासरी 10 टक्‍क्‍यांनी दर वाढले आहेत. पालेभाज्या 5 ते 7 रुपये पेंढी तर कोथिंबिर 10 रुपये पेंढी असा दर आहे.

गवार, ढब्बू, हिरवी मिरची यांचा दर जास्त आहे. फळबाजारात सांगली जिल्ह्यातून येणाऱ्या द्राक्षांची आवक वाढली आहे. किलोला 80 ते 100 रुपये दर आहे. स्थानिक पपईची आवक चांगली असुन आकारानुसार 20 ते 50 रूपयापर्यंत दर आहे. जनावरांच्या बाजारात मागणीमुळे बकऱ्यांचे दर 15 ते 20 टक्‍यांनी वाढले आहेत. बाजार समितीत दिडशेहून अधिक शेळ्यांमेंढ्याचीं आवक झाली. 5 ते 20 हजारापर्यंत दर होते. 

रोपांची आवक ओसरली 
गेल्या दोन महिन्यापासुन सुरू असलेली फळभाज्यांची रोपांची आवक ओसरली आहे. कर्नाटकातील बेळकूड (ता. चिकोडी) येथील रोप उत्पादक कांदा, मिरची, टोमॅंटो यांची रोपे विक्रीसाठी आणतात. ऊस तोडणीचा हंगाम संपत आल्यानेच रोपांची आवक कमी झाली असल्याचे विक्रेते शंकर पाच्छापुरे यांनी सांगितले. 

 

संपादन - सचिन चराटी

kolhapur


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Inward Of The Tamarind To Gadhinglaj Kolhapur Marathi News