
इचलकरंजी : यंत्रमाग उद्योजकांच्या कर्जावरील व्याज दरात 5 टक्के सवलतीसाठी आलेल्या सर्व अर्जांची येत्या मार्चपर्यंत निर्गत करून त्यांना अनुदान देण्यात येईल. त्याचबरोबर 27 एचपी खालील यंत्रमागासाठी एक रुपयांची वीज सवलत, 27 एचपीवरील यंत्रमागासाठी जाहीर 75 पैशांची अंमलबजावणी, हे प्रश्नही मार्गी लावण्यात येतील, अशी ग्वाही वस्त्राद्योग मंत्री अस्लम शेख यांनी सोमवारी मुंबई येथे झालेल्या बैठकीत दिली.
राज्यातील सूत गिरण्या, वस्त्रोद्योग प्रकल्प व रेशीम उद्योगातील समस्या, तसेच यंत्रमाग- हातमागधारकांच्या समस्यांबाबत वस्त्रोद्योग मंत्री शेख यांनी मुंबईत सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक आयोजित केली होती. त्यामध्ये विविध भागांतील उपस्थित प्रतिनिधींची मते जाणून घेतली.
आमदार प्रकाश आवाडे यांनी यंत्रमाग व्यवसायासाठी आवश्यक काही मुद्दे उपस्थित केले. मागील चार-पाच वर्षांपासून हा उद्योग अडचणीतून मार्गक्रमण करीत आहे. त्याला शासनाकडून पाठबळ देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
यंत्रमाग उद्योजकांच्या कर्जावरील व्याजदरात 5 टक्के व्याज दराची अधिसूचना काढलेली आहे; परंतु त्यामध्ये अनेक त्रुटी व जाचक अटीमुळे त्याची अंमलबजावणी करताना अडचणी येत आहेत. मागील 3 वर्षांपासून अनेक अर्ज प्रलंबित असून त्रुटी व जाचक अटी दूर करून यंत्रमागधारकांना 5 टक्के व्याज अनुदान त्वरित देण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली.
सुताच्या दरात सातत्याने होणारी दरवाढ आणि सट्टेबाजारामुळे यंत्रमाग व्यवसाय अडचणीत सापडला आहे. सुताच्या वजनात व काउंटमध्ये फरक, खरेदी केलेल्या सुताचे बिल न देता दुसऱ्या काऊंटचे बिल देणे, लेट पेमेंटवर भरमसाट व्याज आकारणी, असे गैरप्रकार टाळण्यासाठी शासनाने सूत व्यापाराची स्वतंत्र नियमावली तयार करण्याची सूचना आमदार आवाडे यांनी केली.
मंत्री शेख यांनी येत्या मार्चअखेरपर्यंत 5 टक्के व्याज अनुदानासाठी आलेल्या सर्वच अर्जांची निर्गत करून त्याचा लाभ मिळवून दिला जाईल. तसेच वीज बिल सवलतीसह उर्वरित प्रश्नांबाबतही शासन सकारात्मक असून लवकरच त्यासंदर्भात निर्णय घेऊन मार्ग काढला जाईल, असे सांगितले. सूत दरातील सट्टेबाजार व दर यासंदर्भात वजनमापे निरीक्षकांसह संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या जातील, व या संदर्भात तक्रार आल्यास संबंधित व्यापाऱ्यावर तत्काळ कारवाई करण्याचे आदेश देण्यात येतील, असे मंत्री शेख यांनी स्पष्ट केले.
बैठकीस वस्त्रोद्योग राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष सतीश कोष्टी, संचालक रफिक खानापुरे, नारायण दुरुगडे, राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी आदी उपस्थित होते.
संपादन - सचिन चराटी
kolhapur
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.