
गडहिंग्लज : येथील तरुण उद्योजक, हॉटेल साई प्लाझाचे मालक तथा प्रियदर्शिनी नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष राहुल विश्वनाथ पाटील (वय 40) यांचा आज वाढदिवस. पहाटेपासूनच सोशल मीडियावर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू होता. परंतु, काही वेळानंतरच नागरिक आणि मित्र परिवाराच्या या शुभेच्छांचे रूपांतर श्रद्धांजलीत झाले.
हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने त्यांचे आज पहाटे दुर्दैवी निधन झाले. पाटील यांच्यावर काळाने ओढवलेल्या या घटनेने गडहिंग्लजकरांचे मन सुन्न झाले.
तालुका खरेदी-विक्री संघ, गडहिंग्लज अर्बन बॅंकेचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक ऍड. विश्वनाथ पाटील यांचे ते सुपुत्र तर नगरसेविका शुभदा पाटील यांचे ते पती होत. त्यांच्या मागे वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ, बहीण असा परिवार आहे. आज दुपारी येथील नदीवेसमधील श्री नंजय्या मठाच्या आवारातील दफनभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. विविध क्षेत्रातील मान्यवर या वेळी उपस्थित होते.
वडील ऍड. विश्वनाथ यांच्या सहकार क्षेत्रातील योगदानाची परंपरा पुढे चालवण्यासाठी त्यांनी प्रियदर्शिनी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. हॉटेल्स ऍण्ड परमीट रूम असोसिएशनचे ते अध्यक्ष म्हणूनही कार्यरत होते. ग्रामविकास मंत्री व राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली त्यांची राजकीय वाटचाल सुरू होती. आज पहाटे साडेचारच्या सुमारास त्यांच्या छातीत अचानक दुखू लागले. ते स्वत:हून हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आले. परंतु, हृदयविकाराचा तीव्र धक्का आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली.
कोरोना लढ्यासाठी योगदान
कोरोना लढ्यात रात्रंदिवस राबणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी वाढदिवसानिमित्त पीपीई किट व इतर साहित्य वाटप करण्याची इच्छा त्यांनी वडील व मित्रांना बोलून दाखविली होती. तत्पूर्वीच त्यांचे निधन झाले. त्यामुळे ऍड. विश्वनाथ यांनी मुलगा राहुल यांची ही इच्छा पूर्ण करत आजच एक लाख 11 हजार रुपये किमतीचे साहित्य प्रशासनाकडे सुपूर्द केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.