समर्थकांचा जल्लोष : निपाणी नगराध्यक्षपदी जयवंत भाटले

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 31 October 2020


उपनगराध्यक्षपदी निता बागडे बिनविरोध 

निपाणी (बेळगाव) : येथील नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी जयवंत भाटले यांची निवड करण्यात आली. तर उपनगराध्य पदासाठी निता बागडे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक अधिकारी म्हणून चिक्कोडीचे प्रांताधिकारी युकेशकुमार एस. यांनी काम पाहिले. यावेळी महिला व बालविकास मंत्री शशिकला जोल्ले व खासदार अण्णासाहेब जोल्ले उपस्थित होते. यावेळी समर्थक व कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.सकाळी 10.30 वाजता निवडणूक प्रक्रियेला प्रारंभ झाला. नगराध्यक्षपदासाठी भाजपतर्फे जयवंत भाटले तर कॉंग्रेसतर्फे अनिता पठाडे यांनी तर उपनगराध्यक्ष पदासाठी भाजपतर्फे केवळ निता बागडे यांनी अर्ज दाखल केला. 

दुपारी 2.30 पर्यंत अर्ज माघारी न घेतल्याने नगराध्यक्ष पदासाठी हात उंचावून मतदान घेण्यात आले. त्यात भाटले यांना 19 तर पठाडे यांना 13 मते पडल्याने युकेशकुमार यांनी भाटलेंना विजयी घोषित केले. निवडीनंतर नगरपालिकेसमोर कार्यकर्ते व समर्थकांनी फटाक्‍यांची आतषबाजी व गुलालाच्या उधळणीत जल्लोष केला. यावेळी जोल्ले दाम्पत्यासह नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा कार्यकर्त्यांतर्फे सत्कार झाला. उघड्या जिपमधून नगराध्यक्ष-उपनगराध्यक्षांची मिरवणूक काढून महापुरूषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आले.

हेही वाचा- काळ्या दिनी गावागावांत होणार निषेध

 

मंत्री शशिकला जोल्ले म्हणाल्या, "सर्वांच्या सहकार्याने भाजपचे सभागृहात वर्चस्व निर्माण झाले आहे. आपणासह खासदार अण्णासाहेब जोल्ले, केंद्र व राज्य सरकारकडून विकासकामांसाठी निधी आणण्यात कमी पडणार नाही. तळागाळापर्यंत विकासकामे राबविण्यासाठी प्रयत्नशील आहोत. नगराध्यक्ष जयवंत भाटले, उपनगराध्यक्षा निता बागडे यांनी सर्व नगरसेवकांच्या सहकार्याने शहरातील सर्वच प्रभागात विकासकामांसाठी प्रयत्नशील राहण्याची ग्वाही दिली.

यावेळी हालशुगरचे अध्यक्ष चंद्रकांत कोठीवाले, उपाध्यक्ष एम. पी. पाटील, संचालक पप्पू पाटील, दादाराजे निपाणकर सरकार, जि. पं. सदस्य सिद्धू नराटे, सुमित्रा उगळे, शहर भाजपाध्यक्ष प्रणव मानवी, पालिका आयुक्त महावीर बोरण्णावर, नगरसेवक राजू गुंदेशा, सद्दाम नगारजी, कावेरी मिरजे, प्रभावती सूर्यवंशी, सोनल कोठडिया, उपासना गारवे यांच्यासह सत्ताधारी व विरोधी गटातील नगरसेवक आणि कार्यकर्ते उपस्थित होते. 

जोल्ले दाम्पत्याकडून मतदान
निपाणी पालिकेत भाजपचे संख्याबळ पुरेसे होते. तरीही मंत्री शशिकला जोल्ले, खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी निवडणूक प्रक्रियेत सहभाग घेऊन मतदान केले.

बंद घड्याळाकडेच सर्वांचे लक्ष
अधिकाऱ्यांनी निर्धारित वेळेनुसार निवडणूक प्रक्रिया सुरू केली. ते वेळेच्या सूचना देत असताना सर्वच नगरसेवक सभागृहातील घड्याळाकडे पहात होते. पण बंद असलेल्या घड्याळामुळे वेळ समजणे कठीण झाल्याने आयुक्तांनी तात्काळ घड्याळ सुरू करण्याची सूचना केली.

संपादन - अर्चना बनगे

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jaywant Bhatale as Nipani Mayor Anita Bagde unopposed as Deputy Mayor belguam