
हिरण्यकेशी नदीवर सुमारे 130 वर्षांपूर्वी व्हिक्टोरिया पूल उभारण्यात आला. या पुलामुळे कोल्हापूर ते कोकण व गोवा जोडले गेले व अंतर कमी झाले. या पुलाची मुदत संपली आहे. तशी सुचना ब्रिटिश सरकारने दिली आहे.
आजरा : आजऱ्याजवळ हिरण्यकेशी नदीवर "व्हिक्टोरिया ज्युबीली' या जुन्या पुलाला पर्यायी पूल उभारण्याबाबत चर्चा झाल्या पण त्याबाबत पुढे काय? हे अजूनही अनुत्तरीत आहे. या पुलावरील वाहतूक साळगावमार्गे वळवणे शक्य होते. येथील हिरण्यकेशी नदीवरील साळगावजवळ पूल उभारण्यासाठी निधीही मंजूर झाला होता. पण जागा उपलब्ध नसल्याने हा पूलही रखडला आहे. हिरण्यकेशीला महापूर आला की "व्हिक्टोरिया' वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येतो. यामुळे आजरेकरांबरोबर कोकणवासीयांचीही वारंवार कोंडी होते. यंदाही हे दुखणे कायम आहे.
हिरण्यकेशी नदीवर सुमारे 130 वर्षांपूर्वी व्हिक्टोरिया पूल उभारण्यात आला. या पुलामुळे कोल्हापूर ते कोकण व गोवा जोडले गेले व अंतर कमी झाले. या पुलाची मुदत संपली आहे. तशी सुचना ब्रिटिश सरकारने दिली आहे. तीन वर्षांपूर्वी कोकणातील सावित्री पूल वाहून गेल्यावर राज्यातील जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट शासनाने केले. यामध्ये आजऱ्यातील व्हिक्टोरिया पुलाचा समावेश होता. त्याची डागडुजी करण्यात आली. हा पूल वाहतुकीसाठी आजही वापरण्यात येत आहे, पण या पुलावरून अवजड वाहतूक करणे धोकादायक मानले जाते.
अतिवृष्टीमध्ये हिरण्यकेशीला महापूर आल्यावर हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात येतो. त्यावेळी या मार्गावरून होणारी वाहतूक ठप्प होते. वाहनधारकांचे हाल होतात. या पुलाला पर्यायी पूल व्हावा यासाठी गेली अनेक वर्षे प्रयत्न सुरू आहेत. काही पक्ष संघटनांनी आंदोलन केली आहेत. पण त्याबाबत विशेष पाठपुरावा होतांना दिसत नाही.
या तीन वर्षांत आंबोली संकेश्वर रस्त्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणाकडे हस्तांतरण झाले आहे. त्यांनी नव्या पर्यायी पुलाचा आराखडा वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवल्याचे समजते पण तांत्रिक अडचणीमुळे कार्यवाही झालेली नाही. या पुलावरील वाहतूक साळगाव मार्गे वळवणे शक्य आहे. साळगाव येथील पुलासाठी अर्थसंकल्प आराखड्यात 3. कोटी 60 लाखांचा निधी मंजूर झाला. पण जागा मिळाली नसल्याने हा पूलही रखडला आहे. त्यामुळे कागदी घोडे व लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यात सातत्य नसल्याने हे पूल रखडलेच आहेत.
5 ऑगस्ट "मच्छिंद्री'चा योगायोग
गतवर्षी अतिवृष्टीमुळे 5 ऑगस्टला पहिल्यांदा व्हिक्टोरिया पुलाची मच्छिंद्री झाली. त्यामुळे प्रशासनाने पुढील धोका ओळखून या पुलावरील वाहतूक रोखली होती. यंदाही याच तारखेला मच्छिंद्री झाली व पुलावरील वाहतूक रोखण्यात आली.
संपादन - सचिन चराटी