जोतिबाचे दर्शन सुरक्षित अंतर ठेवूनच ; मास्क न वापरणाऱ्यांवर होणार कारवाई 

सुनील पाटील 
Friday, 27 November 2020

जोतिबाची कार्तिकी यात्रेनिमित्त गर्दी नियंत्रीत करण्यासाठी मंदिराच्या सभोवती सर्व बाजुंनी बॅरेकेटींग करुन एकच प्रवेशद्वार सुरु ठेवावे

कोल्हापूर : कोरोना संसर्गामुळे जोतिबाची चैत्र यात्रा यावर्षी रद्द करण्यात आली होती. दरम्यान, रविवार (ता. 29) ते सोमवार (ता. 30) दरम्यान होणाऱ्या जोतिबा कार्तिकी यात्रेनिमित्त भाविकांना जोतिबाचे दर्शन घेता येणार आहे. मात्र, भाविकांच्या तोंडाला मास्क असणे  आणि दोन व्यक्तिंमध्ये सुरक्षित अंतर ठेवणे बंधनकारक आहे. पोलिस यंत्रणेने यावर काटेकोरपणे लक्ष ठेवावे, ज्या भाविकांनी मास्क लावला नसेल तर, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिल्या आहेत. 

जोतिबाची कार्तिकी यात्रेनिमित्त गर्दी नियंत्रीत करण्यासाठी मंदिराच्या सभोवती सर्व बाजुंनी बॅरेकेटींग करुन एकच प्रवेशद्वार सुरु ठेवावे. तसेच जोतिबा डोंगरावर येणाऱ्या भाविकांची मंदिर परिसरात गर्दी होवू नये यासाठी खुल्या जागेमध्ये एल.इ.डी.द्वारे लाईव्ह दर्शनाची सोय करावी. बॅरेकेटिंग क्षेत्राव्यतिरिक्त इतर परिसरातील गर्दी नियंत्रीत करण्यासाठी आवश्‍यक पोलिस बंदोबस्त तैनात करावा. अशाही सूचना श्री देसाई यांनी दिल्या आहेत. याशिवाय, कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर मंदिरात येणाऱ्या भाविकांची गर्दी नियंत्रीत करावी. मास्क व सामाजिक अंतराचे पालन करावे. सुरक्षित अंतर न ठेवणाऱ्या आणि मास्क न वापरणाऱ्यांवा दंडात्मक कारवाई करावी. वाडी रत्नागिरी गावाकडे जाणाऱ्या वाहनांमधून प्रवासी व खाजगी वाहनाच्या एकूण क्षमतेच्या 50 टक्के पेक्षा जास्त व्यक्तिंना प्रवास कऱ्यास प्रतिबंध करावा. यासाठी गावाकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर पोलिस तपासणी नाके उभारण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.

हे पण वाचा - कोल्हापुरात जमिनीच्या वादातून शेतक-याचा खून  

दरम्यान, जिल्हा प्रशासन व पोलिसांकडून दिलेल्या नियमांची उलंघन करणाऱ्यांवर तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशाही सूचना श्री देसाई यांनी दिल्या आहेत. 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jyotibas vision should be kept at a safe distance